दहावीबारावीचा निकाल

उद्या बारावीचा निकाल आहे. लेक बारावीत असल्याने उत्सुकता आहे, नाहीतरी ओळखीतलं कोणी, भाचेकंपनीपैकी एखादं असतंच दहावी बारावीत. या निकालाच्या निमित्ताने आठवण झाली, १५-१७ वर्षांपूर्वीची, जेव्हा गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जात असे. या यादीसाठी निकालाच्या आदल्या दिवशी शालेय शिक्षण मंडळातर्फे एक पत्रकार परिषद घेतली जायची. आणि त्यात मिळायचं निकालाचं पुस्तक. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये असतानाची गोष्ट. निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत रमाकांत दादरकर या आमच्या प्राॅडक्शन मॅनेजरकडे टाइम्स इमारतीतल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ओळखीतले/नात्यातले अनेक नंबर आलेले असत. दद्दूकडे ते नीट लिहिलेले असत. पत्रकार परिषदेनंतर वार्ताहर थेट आॅफिसात यायचा, ते निकालाचं पुस्तक घेऊन दद्दू आणि एखादा मदतनीस एका केबिनमध्ये बसून आपल्या माणसांच्या नंबरचा निकाल शोधून त्या कागदावर लिहीत. तेव्हा मोबाइल नव्हते, त्यामुळे लँडलाइनवरून मार्क कळवणे वा प्रत्यक्ष टाइम्सला येणे एवढे दोनच पर्याय होते. दद्दूचं काम झालं की ते पुस्तक बाहेर येई, सार्वजनिक होई. मग आॅफिसचा लँडलाइन सतत खणखणत राही, off the hook म्हणतात तसा. वाचक नंबर सांगत, आणि त्यांना त्यांचे मार्क सांगितले जात. एक दिवस अगोदर निकाल समजून घ्यायची ही जी काही ओढ होती, ती अलौकिकच होती. कदाचित तेव्हा अकरावीच्या वा बारावीनंतर मेडिकल वा इंजीनिअरिंगच्या प्रवेशासाठी हेच मार्क महत्त्वाचे असल्याने, व प्रवेशाचा अर्ज घेण्यासाठी आदल्या दिवसापासून रांग लावण्याची पद्धत असल्याने मार्क आधी कळल्याचा फायदा होत असावा. कधीकधी हे मार्क चुकीचेही निघत. परंतु असा प्रसंग फारच विरळा.
मंडळाने गुणवत्ता यादीच प्रसिद्ध करण्याचं बंद केल्यामुळे पत्रकार परिषदही होत नसावी. त्यामुळे आदल्या दिवशी मार्क जाणून घ्यायची संधीच आता नाही.
या आधी मार्क कळण्यावरून मी दहावीत असतानाचा किस्सा आठवतो. आपण किती मूर्ख होतो, मूर्खपणा करू शकतो याची नम्र जाणीव यातून होत राहते हे बरीक बरंय.
मी दहावीत असताना, असाच कोणाकडून निकाल आदल्या दिवशी कळला होता. मी आणि अनिता जोशी आम्हा मैत्रिणींना चांगले मार्क होते. आमच्या एका मैत्रिणीला आमच्यापेक्षा बरेच कमी मार्क होते. तरीही आम्ही दोघी उत्साहाने तिच्या घरी निघालो मार्क सांगायला. पहिल्या मजल्यावरच्या तिच्या घरी पोचेस्तो आपण फारच आगाऊ आणि मूर्ख ठरणार आहोत, हे आमच्या लक्षात आलं, म्हणून आम्ही मागे फिरलो. पण तोवर आमचा आवाज ऐकून तिच्या आईने दार उघडलं होतं. मग आम्हाला तिच्याकडे जाण्याशिवाय इलाज नव्हता. आमचे मार्क, तिचे मार्क, त्यावरची चर्चा हे सगळं अत्यंत embarrassing प्रकरण आम्ही कसंबसं पार पडलं आणि पळ काढला.
आता, दहावीच्या वर्गाशी फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपमुळे पुन्हा नाळ जोडल्यानंतर कळतंय की तेव्हाचे मार्क खरंतर इतके महत्त्वाचे नव्हते. तेव्हा आमच्या वर्गातली नापास झालेली वा कमी मार्क मिळवणारी मुलं आता यशस्वी, समाधानी आयुष्य जगतायत. त्यांच्याकडे इतर अनेक गुण होते, क्षमता होत्या, काैशल्यं होती म्हणूनच हे शक्य झालं.
हे ढळढळीत समोर दिसत असलं तरी आमच्याच पिढीतल्या अनेक जणांना अजूनही मुलांचे मार्क, अभ्यास या सर्वावर जीव तोडून बोलताना ऐकलं की कसंसंच होतं. मी तिथून दूर निघून जाते, इतकं मला ते असह्य होतं.

Comments