खून, बलात्कार, चोरी, खोटं बोलणं, वगैरे दुष्कृत्यांबाबत गुप्तता
बाळगणं आपण समजू शकतो. परंतु मासिक पाळीसारख्या निखळ शारीरिक घटनाक्रमाबाबत
इतकी गुप्तता का याचं कारण काहीकेल्या समजून येत नाही. इतक्या पराकोटीची
गुप्तता की मासिक पाळी हा शब्दही कित्येक स्त्रियांनी उच्चारलेला नसतो.
अडचण, गडबड, कावळा शिवणे, तांब्या पालथा घालणे, बाजूला बसणे, बाहेरची असणे,
विटाळशी, पीरियड्स, एमसी असे शब्दच यासंदर्भात स्त्रिया वापरत असतात. कोणी
कोणी तिला मैत्रीण म्हणतं चक्क! जिथे जिच्या शरीराबाबत ही चर्चा सुरू आहे,
तिचीच ही लपवण्याची भूमिका, तिथे पुरुषांचं तर विचारायलाच नको. अनेकांना
तर हे प्रकरण काय असतं, तेच माहीत नसतं. मग त्याचे परिणाम, त्रास, घ्यायची
काळजी ही गोष्ट दूरची राहिली.
असं का, याला कोण जबाबदार आहे, वगैरे शोधण्यापेक्षा आता यावर काय करायला
हवं, काय करता येईल, यावर बोलायला हवंय. मासिक पाळीचं गुपित फोडायला हवंय,
म्हणून या अंकाचा खटाटोप. हा प्रश्न फक्त स्त्रियांचा नाही, तो सगळ्या
सगळ्यांचा आहे, हे आपण आधी स्वीकारूया. पाळी म्हणजे नक्की काय, ते समजून
घेऊया. मग त्याचे काय परिणाम होतात, किती कमी-जास्त म्हणजे समस्या आहे व
डॉक्टरकडे जाण्याची गरज अाहे, हे जाणून घेऊया. सॅनिटरी नॅपकीनसाठी दर
महिन्याला जवळपास शंभर रुपये खर्च होतात, ते खूप जास्त वाटत असेल तर सुती
कापड वापरायला जरूर सांगा आई/बहीण/बायको/मुलीला. पण मग ते कापड स्वच्छ धुऊन
कडक उन्हात वाळत घालायलाही आवर्जून सांगा. नाही तर ते कापड घराच्या एका
अंधा-या कोप-यात वाळलंय न वाळलंय अशा स्थितीत राहणार, जे अधिकच महाग पडणार.
आणि ते जमणार नसेल तर मात्र काही न बोलता नॅपकीनसाठी पैसे काढून द्या,
तिच्यासोबत ते विकत आणायला जा, अचानक वेळ आली तर स्वत: दुकानात जाऊन आणून
द्या. आणि ते काळ्या पिशवीत किंवा वर्तमानपत्रात गुंडाळायलाच हवेत, असं
नाही ना?
साधारण सहावी-सातवीतल्या मुलींची पाळी सुरू होते, अनेकदा त्यांना याविषयी
काही माहीत नसतं. शाळेत असं काही झालं तर त्या मुलीची अतिशय लाजिरवाणी
अवस्था होते. ती होऊ नये, म्हणून सर्व मुलामुलींना याची माहिती करून दिली
पाहिजे. मध्यंतरी अमेरिकेतल्या एका विद्यार्थ्याची पोस्ट वाचनात आली.
त्याने लिहिलंय, अनेकदा मला लक्षात आलंय की मुलींची वर्गात/शाळेत अचानक
पाळी सुरू होते आणि त्यांच्याकडे नॅपकीन नसतो. मग त्यावरून काही तरी
परिस्थिती निर्माण होते. म्हणून मी ठरवलंय की, मी एक पॅड कायम माझ्या बॅगेत
ठेवीन, जेणेकरून अचानक अशी वेळ आलेल्य मुलीला मी मदत करू शकेन.
पाळीच्या काळात वापरायला लागणारे सॅनिटरी नॅपकिन्स, त्याच्या जाहिराती,
त्या पाहून मुलांना पडणारे प्रश्न, वापरलेल्या नॅपकिन्सचा पर्यावरणावर
होणारा परिणाम, आणि ते शहरी/ग्रामीण सगळ्या महिलांना सहज उपलब्ध करून देणं
हे विषय महत्त्वाचे आहेतच. परंतु, त्याहून अधिक कळीचा मुद्दा आहे पाळी आणि
घराघरातलं वातावरण, शिवाशिवीमुळे मुलींच्या कोवळ्या मनावर होणारा
दीर्घकालीन परिणाम, बाबा/भाऊ या काळात मुलीची किती छान उबदार साथ देऊ शकतात
याची जाणीव, मित्रमैत्रिणींमध्ये या विषयावर मोकळ्या चर्चा हा, या विषयाचा
मानसिक, सामाजिक, कौटुंबिक विचारही पर्यावरणीय/आर्थिक अंगाएवढाच
महत्त्वाचा आहे, हे निक्षून सांगण्यासाठी हा अंक.
अंकाचा विषय किती महत्त्वाचा आहे, या विषयाला तोंड फोडणं किती आवश्यक आहे, ते स्पष्ट कळलं कट्ट्यासाठी आलेल्या एका हाताच्या बोटावर मोजून बोटं उरतील इतक्या अत्यल्प प्रतिसादावरून.
लेकिन उम्मीद पे दुनिया कायम है!
अंकाचा विषय किती महत्त्वाचा आहे, या विषयाला तोंड फोडणं किती आवश्यक आहे, ते स्पष्ट कळलं कट्ट्यासाठी आलेल्या एका हाताच्या बोटावर मोजून बोटं उरतील इतक्या अत्यल्प प्रतिसादावरून.
लेकिन उम्मीद पे दुनिया कायम है!
Comments
Post a Comment