राम पटवर्धन नावाचा अवलिया

मौज व सत्यकथेचे संपादक व उत्तम अनुवादक राम पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये १३ व १४ जून रोजी एक संवाद सभा आयोजिण्यात आली होती. विकास परांजपे व अंबरीष मिश्र यांनी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे यांच्या मदतीने या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. फक्त निमंत्रितांसाठी असलेल्या या कार्यक्रमाला मला बोलावणे होते ते निव्वळ पटवर्धनांची मी भाची म्हणून.
शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दादरहून बसने आम्ही काही जण निघालो. यात होते निळू दामले, आल्हाद गोडबोले, अस्मिता मोहिते, राम जगताप, रविप्रकाश कुलकर्णी, भाग्यश्री भागवत, अशोक नायगांवकर, अशोक कोठावळे, सुनील कर्णिक, आदि. पार्ल्याला विकास व मिलिंद परांजपे आणि संजय भागवत आम्हाला जाॅइन झाले. जातानाच वाडीवस्ती या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनावर जबरदस्त चर्चा झाली. प्रकाशक, लेखक, प्रहारचे तत्कालीन संपादक गोडबोले असे सगळेच चर्चेत सहभागी असल्याने अनेक मुद्दे समोर आले. वाहतुकीच्या खोळंब्यात अडकल्याने कंटाळवाणा होऊ घातलेला प्रवास काहीसा सुसह्य झाला.
हायवेवरून भाइंदरला बस वळली आणि काही वेळाने आजूबाजूचा नजाराच बदलला. समुद्राचा वास नाकात शिरला, मस्त वारा येऊ लागला. निमुळत्या रस्त्याच्या कडेने असलेली किरिस्तावांची टुमदार घरं, अंतराअंतरावर असलेले हार घातलेले क्रूस, मस्त झाडी. यातून मार्ग काढत प्रबोधिनीत येऊन पोचलो. मी पहिल्यांदाच येत होते, प्रथमदर्शनीच प्रसन्न वाटलं आणि प्रवासाचा शीण बराच कमी झाला. ताजंतवानं होऊन, खोलीत पिशव्या टाकून, चहा घेऊन आम्ही पोचलो चाणक्य सभागृहात. पटवर्धनांच्या तसबिरीसमोर दिवा लावून, विनयजींनी थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं आणि अरुणा ढेरेंकडे सूत्रं सोपवली. वाङ्मयीन संस्कृतीला सत्ताकारणाने दिलेला आकार, सत्तेचा वापर, बहुजन व अभिजन संस्कृतीचा संघर्ष नि समन्वय, यांतून उभी राहत असलेली नवी वाङ्मयीन संस्कृती, अभिजनांसाठी उभे राहिलेले प्रश्न यांचा अरुणाताईंनी उल्लेख केला. या सर्वांना आवाहक वाटेल, आश्वासक वाटेल अशी कोणतीच सांस्कृतिक संस्था नसल्याबद्दल खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, आपला दूरच्या व्यक्तीशी संवाद वाढला जरूर आहे, व्हाॅट्सअॅप आणि फेसबुकमुळे. परंतु, शेजारी असलेल्या माणसाशी तो कमी झाला आहे. यातली दरी कमी कशी होईल, हा प्रश्न आहे.

आपली साहित्य व्यवस्था लेखककेंद्री, प्रकाशककेंद्री व विक्रेताकेंद्री आहे, परंतु ती वाचककेंद्री कशी होईल, याकडे लक्ष द्यायला हवं आहे. गंभीर वाचनाकडे वाचक आताशा वळत नाहीत. कादंबरीकारही कमी झालेत. वाचकांना कथा/कादंबऱ्या नकोत म्हणून प्रकाशकही त्यामागे लागत नाहीत. माहितीप्रचुर साहित्यच जास्तीत जास्त निर्माण होतंय.
त्र्यं.वि. सरदेशमुखांसारख्या साहित्यिकांना एका प्रकाशकाने म्हटलं होतं, "हे असले मुडदे आम्ही तरी किती दिवस सांभाळायचे?'
त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या संस्कारांशिवाय वा संपादनाशिवाय छापली जाणारी भारंभार पुस्तकं. हौस म्हणून, आपलेच पैसे घालून छापलेल्या अनेक पुस्तकांवर कोणताच संपादकीय संस्कार झालेला नसतो. अनेकदा, अशा व्यक्तींना संस्कार करून घ्यावेसे वाटतही असले तरी ते कोण करेल, याची माहिती नसते. त्यामुळे अशी संपादकांची एक टीम/एजन्सी तयार झाली पाहिजे, असं त्या म्हणाल्या. हा मुद्दा दुसऱ्या दिवशीही वारंवार चर्चेत आला.
या वेळी आम्ही बसमधली मंडळी होतोच. शिवाय, भानु काळे, शशिकांत सावंत, शुभदा चौकर आणि पटवर्धन कुटुंबीयही सामील झाले होते. प्रकाशक येशू पाटील होते. सगळ्यांसोबत गप्पा मारता मारता साध्या परंतु चविष्ट भोजनावर ताव मारला. मग काही जणांनी प्रबोधिनीचे वाचनालय पाहिले, काही जण परिसरात हिंडले, मध्यरात्रीपर्यंत गप्पा रंगल्या होत्या. माझ्यासारखे काहीच असतील, जे मस्त झोपून गेले.
दुसऱ्या दिवशी जाग आली तो बाहेर मस्त पाऊस होता. प्रबोधिनीच्या हिरव्यागार सकाळी नाश्ता करून सव्वानऊला पहिले सत्र सुरू झाले. तोपर्यंत अंबरीष, मीना प्रभू, अविनाश कोल्हे, अभिजीत ताम्हणे, दिलीप चावरे, कुमुद चावरे, अश्विनी मयेकर, जयश्री देसाई, आशुतोष जावडेकर, वीणा गवाणकर, आदि निमंत्रित आले होते. पटवर्धनांच्या आठवणी असं स्वरूप असलं तरी त्यांच्या पत्नीच्या, ललिता पटवर्धन वगळता, वैयक्तिक किंवा खाजगी नव्हत्या. ललितामामीने लोकसत्तामध्ये लिहिलेल्या आठवणींचा धागाच या लेखात पुढे नेला होता. संभाजी कदम, दुर्गा भागवत, शांताबाई, निर्मला देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणी यात होत्या.
मीना प्रभू यांनी माझं लंडनवर संस्कार सुरू असलेल्या अडीच वर्षांबद्दल सांगितलं. पटवर्धनांनी कसा प्रत्येक शब्द, वाक्य, परिच्छेद वाचून त्याची चिरफाड केली, ते ऐकून त्या दोघांनाही साष्टांग दंडवत घालावासा वाटला. एका पुस्तकावर इतका वेळ, इतके कष्ट घालवणारा तो काळच वेगळा असं म्हणावंसं वाटतं.

पटवर्धनांचे मौजेतले सहकारी गुरुनाथ सामंत यांनी त्यांच्यावर छोटंसंच लिहून पाठवलं होतं, ते विकास परांजपे यांनी वाचून दाखवलं. "पटवर्धनांचा पुनर्जन्मावर विश्वास होता, माझा नाही. परंतु, त्यांची पुन्हा भेट व्हावी, यासाठी मी पुनर्जन्मावरही विश्वास ठेवायला तयार आहे,' असं त्यांनी लिहिलं आहे.
कविवर्य अशोक नायगांवकर यांनी सुरुवातीलाच सांगितलं की, "मी तसा सत्यकथेचा कवी म्हणून ओळखला जात नाही, जरी माझी पहिली कविता सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती. मंचीय कवितेकडे वळल्यावर सत्यकथेत माझ्या कविता आल्या नाहीत, परंतु मी सत्यकथेत जात राहिलो. पटवर्धनांना कविता वाचून दाखवल्यावर ते म्हणत, ही ओळ वाजतेय.' व्वा, काय शब्द आहे. ओळ वाजतेय.
अंबरीष १९७५पासून मौजेत जाणारे. मराठी व इंग्रजी दोन्ही लिहिणारे. अनेक वेळा त्यांच्यासोबत जवळपास चहा प्यायला जायचे, तेव्हा पटवर्धनच पैसे देत. "परंतु टाइम्सला लागल्यावर एकदा भीतभीत त्यांना विचारलं, आज मी देऊ का पैसे? पटवर्धन हो म्हणाले, पाठीवर थाप मारत म्हणाले, आता तुम्ही मोठे झालात.'
मौजेतलेच त्यांचे सहकारी सुनील कर्णिक यांनी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले, "त्यांनी सगळ्यांना कायम चकवा दिला. स्वत:वर अजिबात लक्ष जाऊ दिलं नाही. कायम दुसऱ्या स्थानावर राहिले. ते खरे अवलिया होते, अवलियाचे गुण तो गेल्यावरच कळतात.' कर्णिकांनी एक मजेशीर आठवणही सांगितली. "सत्यकथेवर पुस्तक आलं पाहिजे, जे लेखक त्यात लिहायचे त्यांच्याकडून लिहून घ्या, असं मी वाल्मिक प्रकाशनाचे देशपांडे यांना सांगितलं. त्यांना ती कल्पना पसंत पडली. त्यानुसार त्यांनी ललितमध्ये जाहिरात दिली. मात्र जाहिरात पाहून पटवर्धन संतापले. त्यांना देशपांडे यांना फोन लावला आणि सांगितलं, हा प्रकार ताबडतोब बंद करा. नाहीतर मी तुमच्या घरी येऊन उपोषणाला बसेन. अर्थात ते काम मागेच राहिलं.'
पटवर्धनांची नजर किती बारीक असायची त्याचं उदाहरण कर्णिकांनी दिलं. प्राचीन गीत भांडार या पुस्तकाच्या सूचीत १००हून अधिक नोंदी होत्या. त्यात एकाखालोखाल छापताना १ ते १०० आकडे कसे कुठल्या स्थानावर येतील, तेही त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणजे १ ते ९ आकडे एकम स्थानावर, १० ते ९९ एकम आणि दशम, या प्रकारे. तसंच दुसऱ्या प्रकाशनाच्या पुस्तकाची पुढची आवृत्ती मौज काढत असेल तर त्यात पहिल्या प्रकाशकाचा उल्लेख करणं पटवर्धनांच्या दृष्टीने आवश्यक होतं.

सर्वसाधारणपणे मितभाषी असलेला मौजचा संजय भागवत म्हणाला, प्रत्यक्ष भागवतांपैकीच कोणी लेखक असते तरी पटवर्धनांनी त्यांचे लेखन अत्यंत इतर लेखकांप्रमाणेच जोखले असते. तसंच, पटवर्धन वा श्रीपु यांचा लेखकांना दरारा वा दहशत वाटे, हे चुकीचं असल्याचंही तो म्हणाला.
जुन्या पुस्तकांचे व्यवहार करणाऱ्या, प्रचंड वाचन असणाऱ्या शशिकांत सावंतने या वेळी त्याच्या स्वभावानुसार प्रश्न केला, 'जर पटवर्धनांनी किंवा श्रीपुंनी कोणत्याच कथा वा कवितेवर संपादकीय संस्कार केले नसते, जसं लेखकाने लिहिलंय तसं ते छापून आलं असतं तर काय फरक पडला असता.'
साहित्यविषयक वार्तांकन करणारे रविप्रकाश कुलकर्णी यांनीही पटवर्धनांच्या काटेकोर स्वभावाची साक्ष देणारा किस्सा सांगितला. 'पटवर्धनांच्या खिशात/शबनममध्ये कायम पोस्टकार्ड असायची. एकदा मी त्यांना कोणाचा तरी लेख आवडल्याचं सांगितलं. तर त्यांनी तात्काळ माझ्या हातात पोस्टकार्ड दिलं, ज्यावर मौज कार्यालयाचा पत्ता होता. त्यावर पत्र लिहा म्हणाले. त्याचबरोबर, ज्या लेखकाला पत्र येत असत, त्यालाही पत्रकर्त्याला उत्तर द्यायला सांगायची ते दक्षता घेत.'
मराठी भाषा, मिथ्यकथा, आदि विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे विश्वनाथ खैरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला आले नाहीत, परंतु त्यांनी पटवर्धनांवर सुंदर लेख लिहूून पाठवला. तो मी वाचून दाखवला. खैरेंनी शेवट असा केला होता, 'या लेखाचा शेवट कसा करावा सुचत नाहीये. तो सुचवायला पटवर्धन कुठे आहेत?'
यापुढचं सत्र होतं आजच्या संपादकांसोबत. त्यात अंतर्नादचे संपादक भानु काळे, पाॅप्युलर प्रकाशनाच्या संपादक अस्मिता मोहिते, लोकसत्ताचे माजी संपादक अरुण टिकेकर व महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार. लोकसत्तेची शनिवार पुरवणी चतुरंगचं संपादन करणाऱ्या शुभदा चौकरने या सत्राचं सूत्रसंचालन केलं.

भानु काळ्यांनी सुरुवातीलाच मुकुंदराव किर्लोस्करांची आठवण सांगितली. 'अंतर्नाद सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं हाेतं, जीवनविषयक तुझी स्वत:ची भूमिका असेल तर नियतकालिक सुरू कर. अन्यथा नको. सध्याच्या साहित्याबाबत मी असमाधानी आहे, लेखकांची संख्या वाढलीय ही चांगली गोष्ट आहे, परंतु लेखक खोलात जात नाहीत. साहित्य व्यवहाराचा इव्हेंट होतोय, एंटरटेनमेंट होतेय, अशी भीती वाटते.'
बोजेवार म्हणाले, 'वाचक म्हणून अतिशय असमाधान आहे. बरीचशी पुस्तकं वाचताना हे पुस्तक मुळात निघालंच का, हा प्रश्न पडतो. लेखन बरंचसं अर्धकच्चं असतं, त्यावर अजिबात संपादकीय संस्कार नसतात. वृत्तपत्राचा संपादक म्हणून लेखकांना दूर कसं ठेवावं, हा मोठा प्रश्न आहे. वाचक आहोत, म्हणून आमचं लेखन छापलंच पाहिजे असा आग्रह दिसून येतो.' बोजेवारांनी लेखक शोधताना येणाऱ्या समस्यांनाही वाचा फोडली. 'विशिष्ट विषयांचे तज्£ सापडत नाहीत. सापडले तर कमी वेळात लिहू शकत नाहीत. आणि कमी शब्दांत, ५०० शब्दांत, लिहू शकत नाहीत. अनेक प्राध्यापकांना लिहिण्यासाठी विचारले, तर तेही लिहायला तयार नाहीत. जे लेखक आहेत, त्यांच्या भाषेवर टीव्हीचा संस्कार होतो आहे. शैलीचा अभाव जाणवतो. माहिती खूप असते, पण विश्लेषण नाही.'
पाॅप्युलरमध्ये संपादक आणि business head असलेल्या अस्मिता मोहिते यांनीही वाचक म्हणून काय वाटतं, ते सांगितलं. वाचताना माझ्यातला संपादक, प्रूफ रीडर जागाच असतो. कधीकधी वाटतं की, जे लेखकाला सांगायचं आहे, ते संपादनात निसटून गेलं आहे की काय. संस्कार न झालेली पुस्तकं अनेक आहेतच, पण संस्कार झालेलीही काही पुस्तकं या अर्थाने खटकतात. रामदास भटकळांच्या हाताखाली तयार झालेली अस्मिता असंही म्हणाली की, भटकळांना त्यांच्या सुरुवातीला पुस्तकं नाकारण्याचा प्रश्नच आला नव्हता. पण आता लेखकांची थांबायची तयारी नसते. चांगला लेखक हातातून सोडायचा नसला तरी मर्यादा असतातच.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संपादक अरुण टिकेकर म्हणाले की, आजच्या लेखनात मुद्दे आहेत तर शैली नसते, शैली असेल तर मुद्दे नसतात. नैसर्गिक लेखनाची जाण ठेवून भाषेवर संस्कार म्हणजे संपादन. बांधीव लिखाण म्हणजे काय, यासाठी त्यांनी The Economistमधल्या लेखांचं उदाहरण दिलं. आपण प्रत्येक जण एका कोषात राहात असतो, ज्यात शिरणे अशक्य असते. मग असा कोष फोडून संवाद करणं किती कठीण आहे. आणि असा संवाद होउ न देणं हे भाषेचं अपयश आहे. लेखकाने अंतर्मुख तर संपादकाने बहिर्मुख असलं पाहिजे, असंही ते म्हणाले. लेखी शब्दाला आज किंमत उरलेली नाही, सरकार वा विद्यापीठावर त्याचा काहीच परिणाम होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
भानुजींनी या वेळी नियतकालिकांना वर्षाला ४० हजार रुपये सरकारी अनुदान मिळते, तर चित्रपटाला ३० लाख रुपये, ही विसंगती लक्षात आणून दिली.
एक व्यापक सांस्कृतिक धोरण हवं आहे, ज्यात संस्कृती व सामाजिक न्याय या दोन भिन्न गोष्टी असल्याची नोंद असेल. सरकारशी सहकार्य करणारा कसला लेखक, तो तर disturber of peace असतो, असं ते म्हणाले. भालचंद्र नेमाडे यांच्या गौरवार्थ कार्यक्रमावर राज्य सरकारने ९५ लाख रुपये खर्च केले, आणि नेमाड्यांनीही तो कार्यक्रम आनंदाने सहन केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एक आवर्जून नोंदवावंसं वाटतं की, विनय सहस्रबुद्धे पूर्ण वेळ सत्रांना उपस्थित होते. संवादात सहभागी होत होते.
यापुढचं सत्र ललित साहित्यासंबंधी होतं, ज्याला मी उपस्थित नव्हते. समारोपाच्या सत्राला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते व त्यांनी या वेळी साहित्यिक संपादकांकडून काही सूचना लिहून घेतल्या असे कळले.

Comments

  1. वा, सुंदर! रामभाऊ पटवर्धनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जसा व्हायला हवा तसाच हा कार्यक्रम. आजच्या साहित्य व्यवहारात कार्यरत असलेली ही सगळी मंडळी एकत्र म्हणजे सुंदर सिनर्जी असणार कार्यक्रमात हे साहजिकच. छोटा का होईना लेख लिहून हे आमच्यापर्यंत पोचवलस त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद मृण्मयी!

    ReplyDelete
  2. जी सिनर्जी होती ती लिहिताना पकडता येत नाही ना गं पण.

    ReplyDelete
  3. चर्चासत्रातील महत्वाचे मुद्दे उत्तमरीतीने पोचवलेस. वातावरणही छान उभं केलंस.पटववर्धनांच्या केवळ आठवणी असं न होता एकूण साहित्य व्यवहारावर झालेली चर्चा मोलाची होती.धन्यवाद म्रुण्मयी.

    ReplyDelete
  4. हो, तो कार्यक्रम फारच संस्मरणीय झाला होता.

    ReplyDelete
  5. I live away in the USA and still carry the past connections with all the subject you write about. This is a great article, thanks for writing about it.

    ReplyDelete

Post a Comment