अमेरिकेत गेल्या आठवड्यात एका अर्थविषयक कंपनीत काम करणारा तरुण मुलगा
सलग ७२ तास काम केल्याने थकून मरण पावल्याची बातमी वाचली. हा मुलगा
उमेदवारी करत होता आणि तरीही इतके तास काम करत होता. की म्हणूनच? उत्तर
काहीही असेल, जीव गेला हे खरं. त्याच्याबरोबरच त्याची स्वप्नं गेली,
आईवडिलांच्या आशा कायमच्या निमाल्या. आणि आपल्याकडे, अशी हजारोंनी तरुण
मुलं आहेत, जी कामं समोर दिसत असून ती करत नाहीत, केलीच तर नीट मन लावून
करत नाहीत. टाळण्याकडेच त्यांचा जास्त कल असतो. एसीतच काम हवं, ऊनपावसात
फिरायचं नसेल तर बरं, दहा ते पाच हा वेळच बरा, शनिवार रविवार सुटी हवी, या
आणि इतर यांच्या अटी. कित्येक ओळखीच्या व्यक्ती अशा आहेत, ज्यांना कामाला
मुलंमुली हवी असतात. पगार चांगला असतो, पण कष्ट आवश्यक असतात. त्यांना
मिळतच नाही कोणी. मिळालं तरी कामाचा, मेहनतीचा अंदाज आला की सोडून जातात
सरळ आणि चक्क घरी बसतात.
हे कशाचं चिन्ह आहे? शिकायचंही नाही, नोकरीत/घरच्या शेतावर कष्टही करायचे नाहीयेत, लग्नही चांगल्या मुलीशी करायचंय, हातात नवनवीन स्मार्टफोन हवेत, बुडाशी मोटारसायकल हवी ही वृत्ती कशातून तयार झाली असेल? या मुलांच्या आईवडिलांनी इतके कष्ट केलेत, प्रसंगी पोटचा घास पोरांना खाऊ घातलाय, त्यांनी शिकावं म्हणून जिवाचं रान केलंय. मग या पोट्ट्यांनाच का असं वाटावं? मेहनतीपासून दूर पळायचा रोग कुठून लागला असावा यांना? आणि मग बाहेरून, म्हणजे बाहेरच्या गाव/शहर/तालुका/जिल्हा/राज्य/देशातून येऊन कोणी काम करत असेल, कारण शेतावरची कामं करावी तर लागतातच ना कोणाला तरी, तर त्याच्या विरोधात गळे काढायचे नि प्रसंगी मारहाणही करायची. रत्नागिरीत आंब्यांच्या राखणीला पार नेपाळहून गुरखे येतात चार महिने राहायला नि गावातली पोरं मात्र चकाट्या पिटत असतात. हेच चित्र इतरत्रही आहेच.
हाच आपला मराठी बाणा, मोडेन पण वाकणार नाही वगैरे?
Comments
Post a Comment