अंतर्नाद जुलै २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. हा लेख २०२० च्या दिवाळी अंकातही प्रसिद्ध झाला आहे.
साधारण सप्टेंबरमध्ये पुढच्या वर्षीच्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या (जेएलएफ) तारखा येतात. त्या आल्या, की जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पाच दिवस होणाऱ्या या फेस्टिवलला जाण्याची तयारी सुरू करायची, हे गेल्या तीनचार वर्षंापासून ठरून गेलेलं. विमान परवडणार असेल तर तिकीट लगेच काढायचं, ट्रेनने जायचं असेल तर नोव्हेंबरपर्यंत थांबायचं. हाॅटेलही लगोलग बुक करायचं. मुख्य म्हणजे जेएलएफच्या वेबसाइटवर जाऊन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करायची. पुढचे दिवस वेळापत्रक कधी येणार, कोण लेखक/कलाकार असणार आहेत, याची माहिती मिळण्याची वाट पाहायची. वेळापत्रक डिसेंबरमध्ये येतं. ते पाहून काय काय चुकवून चालणारच नाही, याचा विचार करायचा. आपण जाणार आहोत, या विचारानेच येणारा थरार अनुभवायचा. (मी जातेय बरंका, असं इतरांना सांगून जळवलं तर हा थरार अधिक जाणवतो, हा तीन वर्षांचा स्वानुभव.) एकीकडे थंडी कितपत आहे, याचा अंदाज घेऊन ऊबदार कपड्यांची जमवाजमव करायची. (हो, मुंबईकरांना जमवाजमव करावीच लागते, आमच्याकडे वुलन्स वा थर्मल नसतात नेहमी लागत नसल्याने.) आणि अखेर जेएलएफच्या पहिल्या दिवशी जयपूरला पोचायचं.
डिग्गी पॅलेस या राजवाड्याच्या परिसरात गेली काही वर्षं हा फेस्टिवल भरवला जातो. जयपूरमधल्या रिक्षावाल्यांना तो अनेकदा माहीतही नसतो, कारण तो मुख्य रस्त्याच्या आत आहे. मग एसएमएस हाॅस्पिटल के सामने, असं सांगून चालतं. एसएमएस म्हणजे सवाई मान सिंग, जयपूरमध्ये या एसएमएसच्या नावाने अनेक संस्था आहेत. डिग्गी पॅलेसला पोचलं, की हातातलं आपलं ओळखपत्र दाखवून आपल्या नोंदणीनुसार जेएलएफचं ओळखपत्र घ्यायचं नि गळ्यात अडकवायचं. पुढचे पाच दिवस हे ओळखपत्रच आपल्यासमोर असीम आनंदाचा, माहितीचा खजिना उघडणार असतं.
ओळखपत्रासोबत मिळतं वेळापत्रक. पाच दिवस, सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सहा ठिकाणी प्रत्येकी तासभराची दीडशे ते दोनशे सत्रं होणार असतात. आपण एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो, हे आपलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं वाटायला लावणाऱ्या व्यक्ती या सत्रांमध्ये बोलणार असतात. अशा वेळी हॅरी पाॅटरची मैत्रीण हर्मायनी ग्रेंजर टाइमट्रॅव्हल करून अनेक विषय अभ्यासते, तशी सोय हवी होती, असं प्रकर्षाने वाटतं. उदा. यंदा पहिल्या दिवशी जावेद अख्तर, होमी के. भाभा, जीत थयिल, देवदत्त पटनाईक, गिरीश कर्नाड, अशी मंडळी वेगवेगळ्या सत्रांमध्ये होती, सकाळी सव्वाअकरा ते दीड या वेेळेतल्या दोन सत्रांमध्ये. मग कुठलं तरी येडंबागडं लाॅजिक लावून गिरीश कर्नाड चालेल हुकला तरी, पटनाईकांना ऐकू असं ठरवायचं नि त्या मांडवात जायचं. डिग्गी पॅलेसच्या अतिभव्य परिसरात, बैठक आणि दरबार हाॅल अशी दोन बंदिस्त सभागृहे आहेत. बऱ्यापैकी मोठी, दोनशेहून अधिक व्यक्ती एका वेळी मावतील अशी. चार बाग, फ्रंट लाॅन, मुगल टेंट व संवाद असे चार प्रचंड मांडव या पॅलेसच्या हिरवळींवर घातलेले असतात. त्यातला फ्रंट लाॅन सर्वात मोठा, हजारेक माणसं बसू शकतील व त्याहून थोडी कमी आजूबाजूला उभं राहू शकतील एवढा. चार बाग व मुगल टेंट त्याहून थोड्या कमी आकाराचे. संवाद खूपच छोटा.
एकटेच असलो तर ठरवणं सोपं असतं. आपल्या आवडीनुसार त्या मांडवात जायचं, जागा पटकवायची आणि फोन बंद करून फक्त कान/डोळे उघडे ठेवायचे. सोबत कोणी असेल तर आपापल्या आवडीनुसारही सत्रांना हजेरी लावू शकतोच की आपण. किंवा तू "तिथे', मी "इथे' असं करायचं. "तिथे' जास्त चांगलं तर "इथू'न जायचं, किंवा "तिथ'ल्याला "इथे' बोलवायचं. जेएलएफच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर दिलेल्या वेळेलाच सुरू होतो व संपतो. प्रत्येक मांडव पाचही दिवस साधारणपणे एकाच कार्यकर्त्याच्या ताब्यात असतो, सत्र वेळेवर सुरू होणं व संपवणं ही त्याची/तिची जबाबदारी असते. आतापर्यंत मी उपस्थित राहिलेल्या तीन वर्षांत एखादंच सत्र उशिरा सुरू झालं असावं. दोन सत्रांच्या मध्ये १५ मिनिटं असतात, ती लोकांना एका मांडवातून दुसरीकडे जाता यावं यासाठी. जेवणाची वेळ असते पाऊण तास, पण त्याही वेळात प्रत्येक मांडवात एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन, गाणं, काहीतरी सुरू असतं. म्हणजे एकदा "रवींद्रनाथ अँड द फेमिनीन' या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यासोबत अर्पिता या गायिकेने रवींद्रनाथांची दोन अवीट गाणी गायली - "अॅकला चालो रे' आणि "चारुलता'मुळे आपल्याला ठाऊक झालेलं "आमी चीनी गो चीनी तोमारो ओगो बिदेशिनी.' (दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खान यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं या लंचटाइममध्ये. आयान व अमान या त्यांच्या सुपुत्रांचं सरोदवादनही झालं त्यानंतर.) फेस्टिवलच्या एक संचालक नमिता गोखले यांनी या वेळी लेखिका मालाश्री लाल यांच्याशी गप्पा मारल्या. नमिता गोखले मूळच्या उत्तराखंडमधल्या, विवाहानंतर गोखले झालेल्या. त्या लेखिका आहेतच, खेरीज जेएलएफ सुरू करण्यात त्यांचा मोठा हात आहे. २००६मध्ये जेएलएफ सुरू झाल्यापासून दरवर्षी नमिता आयोजनात बुडालेल्या असतात, प्रत्येक वर्षी काही सत्रांतून त्या मुलाखतीही घेतात. यंदा जेएलएफ संपल्यानंतर त्या एका पत्रकाराला म्हणाल्याचं वाचलं होतं, की "पुढच्या वर्षी काय काय करायचं याच्या कल्पना डोक्यात उड्या मारू लागल्या आहेत आत्तापासूनच.' विल्यम डॅलरिम्पल हा ब्रिटिश इतिहासकार जेएलएफचा दुसरा संचालक. अत्यंत उत्साही, सतत इकडेतिकडे दिसत राहणारा. मागच्या वेळी एका भरगच्च कार्यक्रमाला तो चक्क मंचाच्या समोरच्या भागात जमिनीवर मांडी घालून खाली बसून ऐकत होता. (मराठी साहित्य संमेलनात आयोजक किंवा स्वागताध्यक्ष असे जमिनीवर बसलेत, असं चित्र डोळ्यांसमोर येतंय का?)
फ्रंट लाॅन प्रशस्त असल्याने अत्यंत लोकप्रिय लेखक वा कलाकारांचे कार्यक्रम बहुतकरून तिथेच होतात. यंदा व्ही. एस. नायपाॅल, शशी थरूर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, वहिदा रहमान, जावेद अख्तर आणि अर्थातच माजी राष्ट्रपती डाॅ. कलाम यांच्या सत्रांना सर्वाधिक गर्दी होती. राजदीप व रवीश दोघे टीव्हीवरील सेलेब्रिटी. राजदीप इंग्रजी बोलणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय तर रवीश हा हिंदीभाषकांमध्ये स्टार आहे. अनेक पत्रकार त्याला आदर्श मानतात, त्यामुळे NDTVइंडियावरील त्याचा शो जसा लोकप्रिय आहे, तशीच त्याची इथली उपस्थितीही खूप ऊर्जादायी असते. यंदा मला त्याचं सत्र नाही पाहता आलं, पण मागच्या वेळी दोन सत्रं ऐकली होती. त्याचं किंचित बिहारी लहेजा असलेलं हिंदी, काहीसा टीपेचा अावाज आणि त्याचं मार्मिक बोलणं यांमुळे तो ऐकत राहावासा वाटतो. विषयांतर होईल थोडं, पण मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्याने उत्तर प्रदेशात महिनाभर राहून केलेलं वार्तांकन व त्यावर अाधारित लिहिलेला ब्लाॅग अावर्जून पाहावं/वाचावं असं नक्की आहे. तो राजकारण्यांविषयी बोलत नाही, तर राजकारणाविषयी, मतदारांविषयी, माणसाविषयी बोलतो हा त्याचा मोठेपणा.
जेएलएफचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा फेस्ट पूर्णपणे मोफत आहे. झी, गूगल, ब्रिटिश एअरवेज, अॅमॅझाॅन.इन, यूएन विमेन, डीएनए, दैनिक भास्कर, रेडिओ मिर्ची, पत्रिका ग्रूप, कोकाकोला, पर्यटन विभाग वगैरेंसारख्या तगड्या प्रायोजकांमुळेच हे साध्य होतं. परंतु, म्हणून एकही पैसा न देता पाच दिवसांत खूप महत्त्वाचा, असामान्य अनुभव एक सामान्य माणूस घेऊ शकतो, तेही सुस्थितीत, हे मान्य करावंच लागतं. सुस्थितीत म्हणजे काय, तर छान थंडी, बसायला चांगल्या खुर्च्या, डोक्यावर मांडव, रंगबिरंगी नेत्रसुखद सजावट, आणि अतिशय स्वच्छ व पाण्याचा भरपूर पुरवठा असलेली स्वच्छतागृहं! प्यायचं पाणी फुकट मिळतं. जागोजागी कचरा टाकायची सोय असते, आणि तो उचलूनही लगेच नेला जातो. (आपण जमलोय ते कुणाचं तरी घर आहे, आणि त्यामुळे ते नीट ठेवून जसंच्या तसं त्या मालकाला परत करायचं आहे, याची आठवण प्रत्येक मांडवातला कार्यकर्ता करून देत असतो. डिग्गी पॅलेस हे एक निवासस्थान आहे, खेरीज तिथे हाॅटेलही आहे.) आणखी काय हवं एका रसिकाला. तिथे लावलेल्या स्टाॅल्सवरचं खाणंपिणं महाग असतं, पण आपण आपला डबा नेऊ शकतोच की सोबत. तिथे जाण्याचा मुख्य उद्देश असतो आवडत्या लेखक/कवीला ऐकायचं. तो अत्यंत सहज सिद्ध होतो. आणि बाकीच्या गोष्टीही सुखावणाऱ्याच असतात, पुन्हापुन्हा तिथे जावंसं वाटायला लावणाऱ्या असतात. आपल्याकडच्या साहित्य संमेलनात यापैकी कुठल्याच गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही, हे मोठंच दुर्दैव आपलं. खोड काढायचीच झाली तर ती पुस्तक प्रदर्शनाबाबत काढता येईल. जेएलएफमधलं पुस्तक प्रदर्शन यंदा अॅमॅझाॅन.इन या वेबसाइटने प्रायोजित केलेलं होतं. यापूर्वी दिल्लीतील एका प्रतिष्ठित पुस्तकांच्या दुकानानेच ते आयोजित केलेलं होतं. जेएलएफमध्ये जे लेखक/कवी सहभागी असतात, त्यांचीच पुस्तकं या प्रदर्शनात उपलब्ध असतात. त्यांची संख्या साहजिकच मर्यादित असते. "पेंग्विन'चा एक स्टाॅल होता, परंतु त्यातही फार पुस्तकं नव्हती. "प्रथम'चा स्टाॅल नेहमी असतो. खेरीज या पुस्तकांवर सूटही नसते, असलीच तर अगदी क्षुल्लक. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्री हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तसा तो जेएलएफमध्ये नसतो. परंतु, असं असूनही प्रदर्शनात गर्दी होते, बरीच पुस्तकं विकली जातात. इथे ते पुस्तक लिहिणारा लेखक/कवी उपस्थित असतो, त्यामुळे त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड झुंबड असते. यंदा तर ही गर्दी लक्षात घेऊन एक वेगळी जागा स्वाक्षरी सोहळ्यासाठी ठेवण्यात आली होती.
आता थोडं यंदा मी जे ऐकलं त्याविषयी. यंदा दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने बरीच गैरसोय झाली. आम्हीदेखील छत्री नेली नव्हती सोबत, त्यामुळे हाॅटेलवरून डिग्गी पॅलेसला पोचणंही मुश्कील होतं. त्यात दुसरा दिवस बराचसा वाया गेला. आयोजकांचीही प्रचंड गडबड उडाली. परंतु तरीही एकही सत्र रद्द केले गेले नाही, हे विशेष. दोनच बंदिस्त जागा असल्याने सर्व सत्रं तिथेच, परंतु अर्ध्या तासाची झाली. यंदा एकमेव मराठी सत्र होतं, "आयदान' या उर्मिला पवारलिखित आत्मचरित्रावर अाधारित सुषमा देशपांडे यांनी बसवलेल्या नाटकाच्या निमित्ताने. या दोघी उपस्थित होत्या. हिंदी वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची चांगली दखल दुसऱ्या दिवशी घेतली. दोन वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी "कोसला'च्या इंग्रजी अनुवादातील काही वाचून दाखवला होता. जीत थयिल यांनी त्यांना बोलतं केलं होतं.
पहिलं सत्र ऐकलं ते प्रवास लेखकांचं - travel writers. प्रवासलेखन हा प्रकार मराठीत हल्ली फारसा दिसत नाही. गोडसेभटजींचं माझा प्रवास याच जातकुळीतलं खरं तर. अनिल अवचटांनी या प्रकारचं लिखाण केलं बरंच. पण नवीन लेखक असं लिहू पाहात नाहीत. इंग्रजीत मात्र गेल्या २५ ते ३० वर्षांत अशी बरीच पुस्तकं आलीत, त्यातील अनेक पत्रकारांनी लिहिलेली आहेत. प्रवासलेखनात प्रामुख्याने प्रवासात भेटलेल्या माणसांचं, परिस्थितीचं वर्णन असतं. या सत्रात सहभागी झाले होते, पाॅल थेराॅ (Theroux), चार्ल्स ग्लास, सामंत सुब्रमण्यन, सॅम मिलर, ब्रिजिद कीनन व आकाश कपूर. जेएलएफचे संचालक व इतिहासविषयक लेखन करणारे विल्यम डॅलरिम्पल यांनी या सत्राचं सूत्रसंचालन केलं. या सर्व लेखकांनी आपापल्या पुस्तकांमधनं काही भाग वाचून दाखवला. ब्रिजिद यांच्या वाचनानं धमाल आणली. भारतात जन्मलेल्या व डिप्लोमॅट पती असल्याने ३७ देशांमध्ये वास्तव्य केलेल्या ब्रिजिद यांचे अनुभव मजेशीर व वैविध्यपूर्ण आहेतच, पण तीच मजा लिखाणातही जाणवली. सामंतने श्रीलंकेतल्या एलटीटीईच्या परिसरात वावरतानाचा एक उतारा वाचला. सॅम मिलर हा बीबीसीचा दिल्लीतील प्रतिनिधी, त्याचे दिल्लीवरील पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रवास आणि पर्यटन - travel and tourism - यात फरक आहे, त्यामुळेच त्याविषयीच्या लिखाणातही, हे या सत्रात स्पष्ट झालं. लेखक त्याच्या पुस्तकातनं उतारा वाचत असताना, आपण जणू त्याच्यासोबत फिरतोय, इतकं जिवंत वातावरण तिथे होते. शंभर वर्षांपूर्वी प्रवासावर पुस्तक लिहिणं आणि आजच्या इंटरनेट/गूगलच्या काळात लिहिणं यात फार फरक आहे. आता एखाद्या शहरातल्या प्रमुख वास्तूच कशाला छोट्या छोट्या इमारती/दुकानंसुद्धा गूगलमॅपवर आपण घरीबसल्या पाहू शकतो. मग लिहायचं काय, तर तिथे पाहिलेल्या/भेटलेल्या माणसांबद्दल. तिथे आलेल्या अनुभवांबद्दल.
या सत्रानंतर याच जागी होती शशी थरूर व पत्रकार मिहीर शर्मा यांची मुलाखत, त्यामुळे कोणीच आपल्या जागेवरून उठलं नाही. नव्याने आलेल्या कोणालाही बसायलाच मिळालं नाही. "इंडिया शास्त्र' हे थरूर यांचं पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. त्यावर आधािरत हे सत्र होतं. फ्रंट लाॅनमध्ये हे सत्र होतं तरी ते पूर्ण ओसंडून वाहत होतं. पत्नीच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात थरूर यांची चाैकशी होणार, अशा बातम्या या काळात जोरात होत्या. तरीही उपस्थितांमध्ये याविषयीची अस्वस्थता जाणवत नव्हती. थरूर देखणे आहेत, त्यांचं बोलणं अत्यंत आकर्षक, भाषा प्रभावी आणि शरीरभाषा आत्मविश्वासपूर्ण, किंचित बेदरकार म्हणावी अशी. पुस्तक मोदी सरकारचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लिहिलेलं अाहे. या संदर्भात उपस्थितांचे अनेक प्रश्न होते. एका तरुण मुलीने त्यांना विचारले, "मला व माझ्यासारख्या अनेकांना राजकारणात यायचे असते. परंतु, लोकसभा टीव्हीवर सभागृहात जो गोंधळ, घोषणाबाजी सुरू असलेली आम्ही पाहतो, त्याने आमच्या विचारांवर विरजण पडते. याबाबत तुम्ही काय सांगाल.' शशी थरूर एवढंच म्हणाले, "I am in politics! मी आहे, तुम्हाला यायला काय हरकत आहे.' याला माज म्हणायचं, की जबरदस्त आत्मविश्वास ते आपण ठरवायचं.
पाॅल थेराॅ यांच्या गप्पा ऐकणं हा मस्त अनुभव होता. त्यांनी लेखकांसाठी दिलेला सल्ला फारच पटण्याजोगा वाटला - "पुस्तक लिहायचं असेल, तर आधी घराबाहेर पडा.' "प्रवास करताना कुणाच्या नजरेत न भरता निरीक्षण करत राहा.' "लिहिणं ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे, ते स्वत:जवळच ठेवा. वाट पाहायला शिका.' "प्रवास करणारा घाईत नसतो.' त्यांनी सांगितलेला एक किस्सा द्यायचा मोह आवरत नाही. पाॅल आयर्लंडमध्ये फिरत होते. एक दिवस एका छोट्या इनमध्ये उतरले. वहीत व्यवसायाच्या समोर त्यांनी लेखक लिहिले. तर, त्या इनच्या मालकिणीने त्यांना विचारले, "What books do you write, Mr Thorax?' भारतात नावांचे/उच्चारांचे/शब्दांचे होणारे खून पाहून अस्वस्थ वाटणाऱ्या जीवांना हे वाचून थोडं शांत वाटावं.
जेएलएफच्या तिसऱ्या दिवशीची दोन सत्रं वेगळ्याच काळात घेऊन जाणारी होती. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन याने गेल्या वर्षी "मूर्ती क्लासिकल लायब्ररी आॅफ इंडिया' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राचीन लिपी व भाषांमध्ये असलेल्या ग्रंथांचं नव्याने प्रकाशन असं या प्रकल्पाचं थोडक्यात स्वरूप सांगता येईल. या सत्रात पंजाबी (बुल्लेशा), फारसी (अबुल फजल), तेलुगु (मृणालिनी), पाली/सिंहला (खेमा) व ब्रज (सूरदास) या प्राचीन भाषांच्या अभ्यासकांनी त्या त्या भाषेतील (कंसात असलेल्या लेखकांचा) काही उतारा व त्यापाठोपाठ त्याचं इंग्रजी भाषांतर ऐकवलं, तेव्हा अंगावर आलेला काटा निव्वळ थंडीचा नक्की नव्हता. हजारो वर्षांपूर्वी बोलल्या/वाचल्या जाणाऱ्या या भाषा ऐकणं हा माझ्यासाठी यंदाच्या फेस्टिवलमधला अत्युच्च आनंदाचा क्षण होता. या पाच जणांपाठोपाठ शेल्डन पोलाॅक या ब्रिटिश भाषातज्ज्ञाने "किं वा काव्यरसः स्वादुः? किं वा स्वादीयसी सुधा?' या संस्कृत वचनाने बोलायला सुरुवात केली. पोलाॅक संस्कृतचे तज्ज्ञ आहेत, ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकवतात व या मूर्ती प्रकल्पाचे प्रमुख संपादक आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्रीनेही गौरवण्यात आले आहे. त्यांनी काशी व चेन्नईत शास्त्र्यांच्या घरी राहून संस्कृत शिकली आहे. पांढरीशुभ्र दाढी, गोरा वर्ण नि निळे डोळे असा हा माणूस बोलताना मधूनच संस्कृत शब्द असे पेरत होता, जसे आपण मराठी बोलताना इंग्रजी पेरतो. संस्कृत भाषेवरून सुरू असलेल्या वादाविषयी त्याला प्रश्न केल्यावर ते म्हणाले, "संस्कृत ही जोडणारी भाषा होती, तो एक पूल होता.' येत्या काही वर्षांत १४ भाषा व १० लिपींमधील ४० पुस्तकं प्रकाशित करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पोलाॅक व गिरीश कर्नाड यांच्या मुलाखतीचे एक सत्र झाले, त्यातून कर्नाडांच्या व्यापक वाचनाची नव्याने ओळख झाली. या गप्पांनंतर रोहन मूर्तीचं प्रचंड कौतुक वाटतं. नारायण मूर्तींसारखा अब्जाधीश पिता, हार्वर्डमध्ये संगणकविषयक शिक्षण अशी पार्श्वभूमी असलेल्या रोहनने इतक्या लहान वयात, तिशीदेखील गाठलेली नसावी त्याने, भारतातील लुप्त होऊ घातलेल्या साहित्याचं जतन करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. अत्यंत समरसून तो त्यात गुंतला आहे, त्याने त्यात काही कोटी रुपये गुंतवले आहेत. परंतु, ही काही दुपटीवर पैसे परत मिळवून देणारी गुंतवणूक नव्हे. हरवत चाललेल्या भाषा व लिपी जिवंत राहणं, हाच या गुंतवणुकीचा परतावा आहे. मराठीत आहे का असा कोणी? का नाही?
फेस्टिवलमध्ये नाॅन फिक्शन लिहिणाऱ्यांनाही मोठे महत्त्व असते. व्यवसाय, अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, चरित्र, असे प्रकार हाताळणाऱ्यांना ऐकण्यासाठीही इथे खूप रसिक येत असतात. त्यांच्यात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. या तरुणांना खूप प्रश्न विचारायचे असतात. त्यांचं वाचनही खूप असतं. याचा प्रत्यय देणारं एक सत्र होतं तरुण खन्ना या प्रिन्सटन विद्यापीठातील प्राध्यापकांच्या मुलाखतीचं. "Billions of Entrepreneurs: How China and India are reshaping their future' हे खन्ना यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, त्या संदर्भातच या गप्पा होत्या. चीन आणि भारतातील उद्योजकांना कोणत्या परिस्थतीत राहावं लागतं, काय सोपं आहे, काय कठीण आहे, याचा ऊहापोह या वेळी झाला. भारतात चीनच्या संदर्भात लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत, पण चीनमध्ये भारताविषयी काही नाही, कारण आपण त्यांच्या दृष्टीने नगण्य आहोत. चीनमधल्या लोकांसाठी भारत म्हणजे बाॅलिवुड नाच, बुद्ध आणि साॅफ्टवेअर. उद्योजकांसाठी मुख्य फरक जाणवतो तो सरकार चालवण्याच्या पद्धतीमुळे. भारतातल्या लोकशाहीचे परिणाम आणि चीनमधल्या कम्युनिस्ट सरकारचे परिणाम - दोघांनाही भोगावे लागतात, तसेच फायदेही घेता येतात. खन्ना यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांना त्यांच्या बीजिंग पार्टी स्कूलमध्ये भाषणाचं आमंत्रण आलं, तसंच पुस्तकाचा अनुवाद करण्याची परवानगीही मागण्यात आली - परंतु अनुवाद करताना कम्युनिस्ट पक्षाला नकारात्मक रंगवणारा भाग वगळायच्या अटीवर. खन्ना अर्थातच नाही म्हणाले. (याआधीच तो भाग वगळून अनुवाद तयार होता, ही गोष्ट अलाहिदा.) पण, हे लक्षात घ्यायला हवं, की या पुस्तकाची दखल पक्षाने घेतली. त्याचा आपल्या उद्योजकांना फायदा कसा करून घेता येईल, याचा विचार पक्षाने केला. भारतात अशा प्रकारचं proactive पाऊल कोणत्याच पक्षाने/सरकारने उचलल्याचं फारसं ऐकिवात नाही माझ्या तरी. तसंच, तिकडे एखाद्या लहान उद्योजकाचा एखादा प्रयोग यशस्वी झाला तर तो मोठ्या प्रमाणावर कसा प्रत्यक्षात येईल, इतर उद्योजक त्याचा कसा फायदा घेऊ शकतील, यासाठी पक्ष/सरकारी पातळीवर प्रयत्न होतात. आपल्याकडे काय होतं, ते सांगण्याची आवश्यकता नाही. खन्ना यांना उपस्थितांनी प्रश्न विचारून भंडावून साेडलं, अनेक उद्योजकांना या गप्पांमधून चांगलीच स्फूर्ती मिळाली होती.
भारतातल्या आजच्या घडीला लोकप्रिय असणाऱ्या व अनेक भाषांमधून मोठा खप असलेल्या एक लेखिका म्हणजे सुधा मूर्ती. त्यांच्याशी गप्पा मारल्या नमिता गोखले यांनी. बंदिस्त बैठक सभागृहात झालेल्या या सत्राला बच्चेकंपनीची मोठी गर्दी होती, तशीच मोठ्यांचीही. त्या आल्या तेव्हा एखाद्या स्टारला मिळाव्यात तशा टाळ्या पडल्या. त्यांच्या लहानपणाबद्दल, आजीआजोबांसोबत घालवलेल्या मौल्यवान सुट्यांबाबत त्यांनी लिहिले आहेच. परंतु, इकडच्या मुलांना प्रश्न होता, की त्यांच्या आजीच्या गोष्टींचा पुढचा भाग कधी येणार आहे. एका तरुण आईने त्यांना विचारलं, "नोकरी करणाऱ्या आईला मूल वाढवताना तुम्ही काय सांगाल?' आयुष्य कसं जगावं, याचे जे मंत्र त्यांनी सांगितले, ते आपण अनेकांच्या तोंडून एेकलेले असतात. परंतु, प्रचंड ऐश्वर्य असूनही सामाजिक भान ठेवून साधं बिनभपक्याचं आयुष्य जगणाऱ्या सुधाआजींकडून ते एेकलं, की ते मंत्र महत्त्वाचे वाटायला लागतात. "पैसा आवश्यक आहे, परंतु प्रमाणातच. आपण स्वत:पुरती एक रेष आखून घेतली की त्याच्यापलिकडचा पैसा हा गरजू लोकांना द्यावा. दान श्रद्धापूर्वक करावं. नात्यातल्याच माणसांना देणं म्हणजे दान नव्हे. तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो, असं झालं तर शेवटी पाठीवर जखम होते,' असं त्या म्हणाल्या तेव्हा अशा कितीतरी घटना डोळ्यांसमोरून तरळल्या. त्यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा उल्लेख केला, ज्याच्याबद्दल मला माहिती नव्हती, ते म्हणजे Beyond the Atlantic. अमेरिकेत असताना, १९७८-७९मध्ये एकटीने केलेल्या प्रवासाबद्दल ते आहे. तुटपुंजी रक्कम हातात असताना अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांमध्ये त्यांनी बॅकपॅकिंग केलं, त्या अनुभवांवरचे मूळ कानडी पुस्तक त्यांचे पहिले. तो काळ लक्षात घेता, निदान आता ते वाचून असाच काही भटकंतीचा उद्योग करायला हवं, असं मला तीव्रतेने वाटलं.
फेस्टिवलमध्ये अनेक कलाकारांना/चित्रकारांना त्यांची शिल्पं, चित्रं, installations मांडण्याची संधी मिळते. ती पाहायला फार मजा येते. डिग्गी पॅलेसमधल्या तरणतलावात, तो रिकामा करून अर्थात, ही शिल्पं उभारलेली असतात. किंवा एखाद्या मांडवात बाजूला असतात. सोबत त्या कलाकाराची पूर्ण माहिती असते, हे विशेष.
यंदा प्रथमच मला मराठी एेकायला मिळाली फेस्टिवलमध्ये. स्वच्छतागृहात जाण्यासाठी रांगेत उभं असताना मागे उभ्या असलेल्या दाेघी मराठी बोलताना ऐकलं. त्या दोघी मुंबई/ठाण्यातल्या विद्यार्थिनी होत्या, इंग्रजी व मराठी शिकणाऱ्या. १८ जणांचा गट करून ही मंडळी आली होती. पाच दिवस आमच्यासाठी मेजवानी आहे, असं त्या उत्फुल्ल चेहऱ्याने सांगत होत्या. मला हे खूप सकारात्मक वाटलं. जयपूर मुंबईपासून काही फार लांब नाही, तीन ट्रेन जातात तिकडे. म्हटलं तर फेस्टिवलसोबत पर्यटनही करता यावं, असा हा रंगबिरंगी, ऐतिहासिक वास्तूंनी सजलेला प्रदेश. एक आठवडा सुट्टी काढून जेएलएफला जाणं तसं कठीण नव्हे. विद्यार्थ्यांनी तर इथे यावंच, पण आपण मोठ्यांनीही यावं. समोर चाललेलं सगळं कळलं नाही, अगदी १० टक्के डोक्यात गेलं तरी खूप आहे. अनेक विषय कळतात, पुस्तकांची/लेखकांची नावं कळतात. त्यावरून काय वाचायला हवं, ते समजतं. आपुल्याच जातीचे इतुके जन भेटतात एकाच वेळी.
हेच सगळं खरंतर मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतही म्हणता आलं असतं तर?
आयोजनापासून सुरुवात करू. जेएलएफ सुरू झाल्यापासून नमिता गोखले व विल्यम डॅलरिम्पल त्याचे संचालक आहेत आणि संजय राॅय निर्माते. यंदा डेव्हिड गाॅडविन, ऊर्वशी बुटालिया वगैरे सातआठ जण सल्लागार होते तर शेवली सेठी कार्यकारी निर्माती होती. टीमवर्क या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे संपूर्ण आयोजनाची व्यवस्था होती. म्हणजे आयोजन व्यावसाियक पातळीवर होते. टीमवर्कतर्फे जयपूरमधल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचीही निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. ही कंपनीच प्रसिद्धीचेदेखील काम पाहाते. सलग काही वर्षं एकच कार्यक्रम आयोजित केल्याने मिळणारा अनुभव फार मोठा असतो, आणि अनुभवाने माणूस शहाणा होतो, हे जेएलएफमध्ये दिसून येतं. मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगळ्या ठिकाणची स्वागत समिती आयोजित करते, त्यामुळे मागच्या चुकांवरून शिकण्याची संधीच त्यांना मिळत नाही. त्यामुळेच दरवर्षी चुकांची/गोंधळाची पुनरावृत्ती होतेच, वर नवनवीन ढिसाळपणाही करायला वाव मिळतो. साहित्य संमेलन तसे पाहिले तर दीड ते दोन दिवसच होते, ग्रंथदिंडी वगळता. त्यात सगळी मिळून वीसएक सत्रं होत असतील, कविसंमेलन वगळून. किती कार्यक्रम, अगदी उद्घाटनासह, वेळेवर सुरू होतात आणि किती नियोजित वेळेच्या नंतरही सुरूच राहतात?
आपल्या संमेलनात सर्वात जास्त गर्दी होते कविसंमेलन आणि पुस्तक प्रदर्शनाला. पुस्तकांवर किती टक्के सूट आहे, हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. यंदा घुमानला तर प्रकाशक जाणार की नाही पुस्तकं घेऊन, हेदेखील ठरायचंय. सासवडच्या २०१४च्या संमेलनात पुस्तक प्रदर्शनात गर्दी होती, पण ती त्रासदायक होती कारण जागा अपुरी होती, स्टाॅल्सचं नियोजन योग्य नव्हतं. सुरक्षा हा विषय तर विचारात घेतलाच नसावा, असं वाटत होतं. मी रविवारी सकाळी प्रदर्शनात गेले, तेव्हा संपूर्ण न पाहताच बाहेर पडल्याचं आठवतंय. कारण भीती. काही झालं, तर आपल्याला इकडून बाहेर पडताच येणार नाही, याची खात्री वाटल्यानेच मी तिथे फार काळ भटकले नाही. धूळ तर इतकी होती, की काही फुटांवरचं दिसत नव्हतं. लहान गावांमध्ये पुस्तकं मिळत नाहीत त्यामुळे संमेलन ही पुस्तक खरेदीची मोठी संधी असते, पुस्तकांसाठी वाचक संमेलनाला येतात, हे ठाऊक आहे; तर तो अनुभव सुखकर का नाही होत? प्रकाशकांनाही या सगळ्या गैरसोयीचा त्रासच होतो, पण थोडाफार तरी धंदा होतो, म्हणून स्टाॅल लावतात बिचारे.
सत्रांची मांडणी करताना जेएलएफमध्ये बाजारात नवीन आलेलं पुस्तक ही मध्यवर्ती कल्पना असते. वर उल्लेखलेल्या राजदीप सरदेसाई, शशी थरूर, तरुण खन्ना, सुधा मूर्ती आदिंच्या सत्रांवरून हे लक्षात येईल. यात सुधा मूर्ती वगळल्या तर इतर पुस्तकं नाॅन फिक्शन प्रकारातली आहेत. अशी पुस्तकं मराठीत येत नाहीत का? कमी प्रमाणात असतील, पण येतात नक्की. पण आपल्याकडे नाॅनफिक्श्नला साहित्यच समजलं जात नाही. खेरीज, असाही विचार तर होत नसावा, "याच्या पुस्तकावर सत्र करायचं म्हणजे त्याची जाहिरात होणार. आपण का करावी जाहिरात?' जेएलएफमध्ये जयपूरमधल्या मोठ्या हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रायोिजत केलेली अनेक सत्रं असतात, मराठी वृत्तपत्रं असं करू शकणार नाहीत का? प्रत्येक सत्राच्या प्रारंभी व शेवटी प्रायोजकाचा उल्लेख होतो. बस्स. त्यात काय वाईट आहे?
आता बाब भाषेच्या विद्यार्थ्यांनी संमेलनाला भेट देण्याची. सासवडच्या संमेलनात शेकडो महाविद्यालयीन तरुणतरुणी होते. पण ते सासवड वा जवळच्या निमशहरी भागातले. पुण्यातून आलेले फारच कमी विद्यार्थी तिथे दिसले असतील. असं का? जयपूरला जाणं परवडत नाही, वेळ नाही, हे मान्य. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तरी िवद्यार्थ्यांनी जावं ना. राज्यात सगळीकडे एसटी जाते, अनेक ठिकाणी ट्रेन जाते, दोन दिवस राहायची सोय कमी पैशात होऊ शकते. आपले नातलग, मित्रमंडळी अशा वेळी नाही उपयोगात येणार तर कधी, त्यांच्या घरी एक वस्ती करायला काय हरकत आहे? मराठीचे विद्यार्थी असणाऱ्यांनी जावं असं म्हणताना, त्यांच्या शिक्षकांची आठवण झाल्याशिवाय कशी राहील. पण साहित्य संमेलनातून आपल्याला काही मिळू शकतं, भले परीक्षेत त्याविषयी प्रश्न नसेल, पण मला काही तरी शिकायला मिळेल, मी श्रीमंत होऊन परत येईन, हा विश्वास द्यायला आपलं संमेलन कमी पडतं हे निर्विवाद.
यंदा जेएलएफला २.४५ लाख लोकांनी भेट दिली. ही संख्या दर वर्षी वाढतेच आहे. आता असेच फेस्टिवल चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, दिल्ली, मुंबईतही होतात, परंतु जयपूरची रंगत त्यात नाही. कारण, तो जयपूरचा माहोलच असता असतो, की एकदा पाहिलाय आता पुढच्या वर्षी नाही आलं तरी चालेल, असं अजिबातच वाटत नाही. उलट, यंदा काय राहिलं ऐकायचं, पुढच्या वर्षी कोण असेल, काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता खूप असते. पुन्हा पुन्हा जात राहावं, असं वाटायला लावणारं, श्रीमंत करून टाकणारं वातावरण असतं ते.
म्हणूनच वाट पाहातेय सप्टेंबरची, तारखा जाहीर होण्याची.
(जयपूर फेस्टिवलची सर्व माहिती http://jaipurliteraturefestival.org/ या वेबसाइटवर उपलब्ध असते. तिथे माध्यम प्रतिनिधी वा सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येते. माध्यम प्रतिनिधींना आपापल्या संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. कारण, मागे लिहिल्याप्रमाणे इथले साहित्यिक कार्यक्रम सर्वांनाच नि:शुल्क उपलब्ध असले तरी पत्रकारांना तिथे भोजन व संगीताचे कार्यक्रम हेदेखील मोफत उपलब्ध असतात.)
भारीच आहे हे. यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. हे वाचून मनात आलं की आपणच काही लोकांनी मिळून मराठीत या बाजाचा लिटफेस्ट का आयोजित करू नये? छोटासा. आपल्या वर्तुळापुरता. हळुहळू ते वर्तुळ विस्तारू शकेल. कारण, या इंग्रजी लिटफेस्टची ज्यांना उत्सुकता असते, अशा मराठीजनांचं वर्तुळ मर्यादित असणार. मात्र, अशा संवेदना असणाऱ्या आणि मुख्यत: मराठीपुरतं वाचन सीमित असलेल्या वाचकांसाठी मराठी शब्दोत्सव ही पर्वणी ठरू शकेल... काटेकोर आयोजनात तडजोड न केल्यास.
ReplyDeleteनक्की करूया, मजा येईल.
ReplyDeleteवाचताना अगदी हेच मनात आलं. करायला हवं... खूप मस्त लिहिलं आहेस, मृण्मयी. उत्सव म्हणणंही महत्त्वाचं. त्याचं पुन्हा संमेलन नकोच.
ReplyDeleteकरूया. छोट्या स्केलवर का होईना, करूया.
Deleteखूपच छान लिहिलंयस म्रुण्मयी. अगदी तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. खरंच आपल्याइकडे असं काही करायला हवं.
ReplyDeleteखूपच छान लिहिलंयस म्रुण्मयी. अगदी तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. खरंच आपल्याइकडे असं काही करायला हवं.
ReplyDeleteधन्यवाद अरुणाताई. आता यंदा काय असेल याची उत्सुकता वाटतेय.
Delete