प्रयोगशाळा

प्रयोगशाळेत बाई (सहकारी) असली की तीनच गोष्टी संभवतात. ती तुमच्या प्रेमात पडते, तुम्ही तिच्या प्रेमात पडता किंवा टीका केल्यावर ती रडू लागते. नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड टिमथी ऊर्फ टीम हंट, जगविख्यात बायोकेमिस्ट, यांचं हे धाडसी विधान. की कबुली?
७२ वर्षांच्या या शास्त्रज्ञाचा हा व्यक्तिगत अनुभव असेल, तर आपल्याला त्याबद्दल काही बोलता येणार नाही. या विधानावर जगभरातील शास्त्रज्ञांनी खूप टीका केली आहे, विशेषत: स्त्रियांनी आपापल्या प्रयोगशाळेतील अनुभवांचे दाखले देऊन या विधानामागचा फोलपणा दाखवून दिला आहे. त्यांनी बनी सूटमधले वा प्रयोगशाळेत घालायचे मुखवटे असलेले फोटो शेअर केलेत. ‘बघा आम्ही किती ‘सेक्सी’ दिसतो ना प्रयोगशाळेत,’ ‘वेगवेगळ्या रसायनांचे ‘मादक’ वास आजूबाजूला असताना वातावरण किती रोमँिटक असतं,’ ‘मी तीन वर्षांपासून एका लॅबमध्ये काम करतेय, पण अजून कोणीच प्रेमात पडलं नाहीये माझ्या’, ‘आम्ही रडतोय कारण पुरुषांनी आमच्यावर टीका केलीय, मग आम्ही दारूत आमचं दु:ख बुडवतोय...’
पुरुषी अहंकाराने लडबडलेल्या हंट यांच्या विधानाला असंच उत्तर देणं योग्य.
त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यापेक्षा विनोदी बाण सोडून त्यातली हवा काढून घेणं अधिक परिणामकारक वाटतं.
आणि तरीही, ही गोष्ट गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. मुळात विज्ञानाच्या प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जगभरातच अतिशय कमी आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. स्त्रियांवर इतर सर्व बाबींमध्ये होणारा अन्याय, त्यांना संशोधनासाठी न मिळणारं उत्तेजन कारणीभूत आहेच. तसंच मुलींमध्ये महिला वैज्ञानिक, अंतराळवीर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्या प्रतिमा सातत्याने समोर आणल्या जात नाहीत. रोल माॅडेल म्हणून किंवा हे तू करू शकतेस, असं मुलींपर्यंत ठासून पोहोचतच नाही. त्यातच अशा वक्तव्यांचा पालकांवर अधिक परिणाम होऊ शकतो.
जाता जाता, प्रयोगशाळेच्या जागी कार्यालय हा शब्द वापरला तर ते विधान सर्वांनाच लागू होतं का? काय वाटतं तुम्हाला?

Comments