मुली विरुद्ध मुलगे

दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, बारावीच्या निकालात मुली वरचढ, यूपीएससीत मुलगी अव्वल... गेल्या काही दिवसांपासून या बातम्या आपण वाचतोय. तसं पाहायला गेलं तर दहा ते पंधरा वर्षांपासून मुली अशा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकांवर मोठ्या प्रमाणावर झळकू लागल्या. (मुलींची अशी एक वेगळी गुणवत्ता यादी अगदी आत्ताआत्तापर्यंत प्रसिद्ध केली जात होती.) शिकणा-या मुलींची संख्या अजूनही मुलांपेक्षा कमीच असली तरी त्या अशा कसोटीच्या प्रसंगी वरचढ ठरत आल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलीही यात मागे नाहीत, सगळ्या प्रकारच्या अडीअडचणींवर मात करत त्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करताना दिसतात. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नोक-या, नवनवीन उपक्रम, आव्हानं त्या लीलया सर करतायत. या बातम्या वाचून इतर मुलींना स्फूर्ती मिळते, त्यांनाही चांगली कामगिरी करावीशी वाटते. पण या बातम्यांचा तरुण मुलग्यांवर काय परिणाम होतो? त्यांना असूया वाटते का या यशस्वी मुलींची? आपलं हक्काचं शिक्षण/ नोकरी या मुली हिसकावून घेतायत असं तर नाही वाटत त्यांना? तसं वाटत असेल तर चुकीचं नाही काही. पण अशी परिस्थिती का उद्भवलीय, मुली अशा पेटून उठल्यासारख्या जगाला काय सिद्ध करून दाखवू पाहतायत? इतक्या वर्षांचा अन्याय, दडपण, झुगारून देऊन त्या उंच उडू लागल्यात. आणि मुलगे, ते याने बावरून गेलेत जणू. इतकी वर्षं जी नोकरी सहजी मिळत होती, तीही मिळवण्यासाठी आता झगडावं लागतंय त्यांना. स्पर्धा निर्माण झालीय खूप जास्त. हे बदलणार कसं?
मुलांनाही कष्ट, मेहनत करावी लागणार आहे. जीव तोडून अभ्यास करावा लागणार आहे. घरच्या शेतावरचं काम असो किंवा नोकरी, मन लावून करावी लागणार आहे. बाइक उडवून, फ्लेक्सवर झळकून, हातात स्मार्टफोन मिरवून, गावभर चकाट्या पिटून ते होणार नाही. कष्टांविण काहीही साध्य नाही, हे लवकर कळलेलं बरं. तरच चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगलं घर आणि चांगली बायको, परिणामी चांगलं आयुष्य जगता येणार आहे. पटतंय ना हे?

Comments