पटवर्धन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन

नऊ भावंडांमध्ये माझी आई सगळ्यात धाकटी. दोन मोठे भाऊ आणि त्यांच्या मागच्या या सात बहिणी. दोन्ही मामा आता नाहीत. मोठी मावशी, ताईमावशीच नाव असणार ना तिचं, ८४ वर्षांची आहे, ती घराबाहेर पडत नाही अजिबात. दुसरी, अर्थात माईमावशी, तिचा ऐंशीवा वाढदिवस साजरा झाला काल. त्यासाठी ताईमावशी आणि कोकणात असलेली मालूमावशी दोघी नव्हत्या फक्त. बाकी पाच बहिणी अाणि दोघी माम्या आल्या होत्या.

रत्नागिरीतल्या पावसजवळच्या गणेशगुळे या अगदी लहानशा खेड्यातली ही भावंडं विलक्षण आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्यांची गावाची ओढ, गावाशी आणि माहेराशी जपून ठेवलेलं नातं, महत्त्वाचं आहे. पण, गुळ्याला एकदा जाऊन आलेल्या कोणाच्याही हे लक्षात येईल की, ते स्वाभावीक आहे. त्या गावाचं पहिल्यांदा समोर येणारं रूपच इतकं मनोरम आहे की, विसरूच नये. माझं आजोळचं घर जवळपास दोनशे वर्षं जुनं आहे, फार मोठ्ठं नाही, अाधुनिकही नाही, पण कम्फर्टेबल आहे. उबदार आहे. आमच्या पिढीतली आम्ही २४।२५ भावंडं. आणि आमची जवळपास तेवढीच मुलं. आम्हा भावंडांचे नवरे/बायका. आता आम्हालाही आलेले जावई आणि सूनबाई. या सर्वांनाच गुळ्याचं, या घराचं वेड आहे, ओढ आहे. ती अर्थात आईच्या पिढीने जपलेल्या नात्यांमुळेच.

पण ही भावंडं विलक्षण आहेत कारण त्यांचं नेटवर्क. त्यांना एकमेकांशी सतत बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. एवढंच नव्हे तर ऐकूनही घ्यायला ती तयार असतात. पटवर्धन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन म्हणता येईल, एवढं त्यांचं नेटवर्क जबरदस्त आहे. या सगळ्यांची ब्युरो चीफ आहे ताईमावशी. ती घरबसल्या टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रं, फोन या माध्यमांचा पुरेपूर वापर करून जगभरातल्या घटनांची नोंद ठेवत असते आणि त्यांचं प्रसारणही फोनमार्फत करत असते. बाकीच्या बहिणी आहेत काॅरस्पाँडंट्स. दररोज किमान एका तरी बहिणीशी बोलल्यशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. याला कमाल मर्यादा नाही, याची नोंद घ्यावी. मग त्या बहिणीशी बोलून ज्या घडामोडी कळतील, त्या इतरांपर्यंत पोचवायची जबाबदारी पण असतेच ना.

फोन नव्हते तेव्हा पत्र होतं. भारतीय टपाल विभागाला पटवर्धन कुटुंबीयांनी आतार्यंत काही लाखांची तरी मदत केली असेल असं वाटतं. फोन नव्हते तेव्हा आम्ही भावंडंही मुंबईतल्या मुंबईतसुद्धा एकमेकांना पत्र लिहायचो म्हणा. पण आमची गोष्ट वेगळी. पत्र लिहिण्यात नंबर वन गुळ्यातला अण्णामामा. अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेलं मामाचं पोस्टकार्ड यायचं दोनतीन आठवड्यांतनं एकदा. पाच चौरस मिलिमिटर एवढी जागाही त्या कार्डावर मोकळी नसायची, इतका जागेचा वापर त्याने केलेला असायचा. अांतरदेशीय असेल तर मेजवानीच. त्याच्या अक्षराची ओळख नसलेल्या माणसाला एकाही शब्दाचा अर्थ कळणार नाही, याची गॅरंटी होती. (मी मामाचं पत्र भिंग घेऊन वाचायचे. हे मी चुकून एका बहिणीला सांगितलं. तिने ते आज्ञाधारक मुलीसारखं मामाच्या पत्रात लिहिलंन. आणि मामाने आईला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख झालाच). तर मामाच्या पत्रात गुळ्यातल्या घडामोडी, विहिरीचं पाणी, घरची गुरं, कुत्रीमांजरं, झाडं, मांडव, शेजारची माणसं, डोकावायची. शिवाय आमच्या नात्यातल्या व्यक्तींच्याही बातम्या असायच्या. तो अशी पत्रं या सात सख्ख्या बहिणींनाच नव्हे तर चुलत/आत्ते/मामे/मावसभावंडांनाही लिहायचा. या बहिणी मामाला लगेच उत्तर लिहित. क्वचित आम्ही पाेरं लिहीत असू. कधी कधी आई पत्र डिक्टेटही करायची. यथावकाश फोन आले, मामाकडे गुळ्यालाही फोन आला, पण पत्रांचा सिलसिला मामा आजारी पडेस्तो सुरूच होता. फोन आल्यावर त्या इतका वेळ एकमेकींशी बोलत असतात, आम्हाला वाटतं कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलतायत नक्की. प्रभामावशी म्हणते तसं, आऊचा काऊ तो माझा भाऊ, अशा यांच्या गप्पा असतात. माझ्या एका मावसभावाने तर त्यांना आॅफर दिली होती, 'कुठेतरी एक मोठं घर घेऊन देतो आम्ही, तिथे सगळ्याजणी एकत्र राहा. फोनवरचा खर्च तरी कमी होईल.'

आम्हा भावंडांना या त्यांच्या फोनाफोनीमुळे फार सावध राहावं लागतं. उदा. मी माईमावशीकडे गेलेय. तिच्याशी गप्पा मारून मी काही वेळाने घरी जाते. आईला सगळा वृत्तांत सांगते. अचानक दुसऱ्या दिवशी आई विचारते, 'अगं, त्या अमुकला मुलगा झाला, तू मला सांगितलं नाहीस. मावशीने सांगितलं होतं ना तुला.' बापरे, या बहिणी क्राॅसचेकिंग पण करतात. लै डेंजर आहेत.

आम्ही भावंडं आता व्हाॅट्सअॅप ग्रूपवर एकत्र आहोत. आम्ही सगळ्यांनी बहुतेक उन्हाळ्याच्या सुट्या कोणत्या ना कोणत्या मावशीच्या घरी एकत्र काढल्या आहेत, किंवा गुळ्याच्या घरी तरी. त्यामुळे ग्रूप हा एकत्र यायला निमित्त झाला. आमचे सगळे मौसाजी, ज्यांना आम्ही त्यांच्या आडनावाने हाक मारायचो, तेही आमच्या कुटुंबात सामावून गेलेले होते. सगळे काका आम्हा भावंडांचा धुडगूस आनंदाने सहन करत, हेच केवढं मोठं होतं. सगळ्यांची घरं जेमतेम दोन खोल्यांची होती. संडास बाथरूमही बाहेर असायचं. पण आम्हाला ना जागेची अडचण जाणवली ना संडासला बाहेर जाण्याची. आई आणि एक मावशी वगळता इतर मावशा गृहिणी होत्या. काकांच्या एकट्याच्या पगारात त्या टुकीने संसार करायच्या. खूप शिकलेल्या नसल्या तरी त्यांचं कुतूहल जागं होतं, अजूनही आहे. मुख्यत: रेडिओ आणि वर्तमानपत्रं या दोन साधनांचा या मावशांनी प्रचंड उपयोग करून घेतला. अजूनही त्यांच्याकडे गेलं, तरी अगं ते एेकलंस का, परवा मी हे वाचलं, असं त्यांचं सांगणं असतंच. आम्ही सगळी मुलं बऱ्यापैकी शिकलो, एकदोघं वगळता सगळे पट्टीचे वाचणारे आहेत, चांगलं गाणं ऐकायला आम्हाला आवडतं आणि भटकणं आमचं वेड आहे. काहीजण पांढऱ्यावर काळंही करतो बरंच. या सगळ्याचं श्रेय आमच्या जनुकांमधल्या पटवर्धन स्ट्रँडना असावं.

या बहिणींचं कौतुक मला आणखी एका गोष्टीसाठी वाटतं. गुळ्यासारख्या नयनरम्य ठिकाणाहून साठहून अधिक वर्षांपूर्वी ताईमावशी लग्नानंतर मुंबईत आली. त्यानंतर एका मावशीचं लग्न रत्नागिरीतच झालं, बाकीच्या हळुहळू मुंबईत आल्या. मोठं घर, आजूबाजूची झाडं/हिरवाई, समुद्राची अखंड गाज, दारातल्या विहिरीचं पाणी, घरचे आंबे/नारळ, घरच्या म्हशीचं दूध, स्वच्छ, शांत गाव सोडून या मुंबैनगरीत त्या आल्या आणि इकडच्या झाल्या. किती त्रास झाला असेल तेव्हा त्यांना. जेमतेम दीड खोलीच्या घरात कसा संसार केला असेल त्यांनी, गावच्या आठवणीने किती व्याकुळ झाल्या असतील त्या. बरं, तेव्हा आठवण आली तर आवाज ऐकता येईल असे फोनही नव्हते. दोनतीन वर्षांनी कधीतरी त्यांना माहेरी जाता यायचं. तिथूनही कोणी नेहमी येऊ शकत नसे. मग त्या इथे कशा सामावल्या असतील. तेव्हा त्यांना एकमेकींचा आधार होता, त्यांची अनेक भावंडं मुंबईत होती, ती एकमेकांना धरून होती. या मोठ्या social networkमुळे त्यांना ही मुंबईसुद्धा आपलीशी वाटली असेल. मामाच्या तपशीलवार पत्रांची उबदार सोबत मिळाली असेल त्यांना.

उत्साहाने सळसळणाऱ्या या मावशांना पाहिलं की वाटतं, माझ्या पिढीत यांच्या निम्म्यानेही ऊर्जा नाही, हौस नाही, चिवटपणा नाही, चिकाटीही नाही. आई वगळता, सत्तरीच्या पुढच्या या सगळ्या जणी, आजही किती आनंदात कायकाय प्लॅन करत असतात, कालच्या वाढदिवसाच्या आधी दोन महिने त्यांनी या विषयावर काथ्याकूट केलाच, पुढचा महिना हा विषय त्यांना पुरणार आहे. काल प्रत्येकीने घरी काहीतरी करून आणलं होतं सगळ्यांना द्यायला.खाण्यावरून आठवलं. यांपैकी कोणाच्याही घरी जाऊन तुडुंब पोटभर न खाता बाहेर निघायचं आव्हान आम्हाला कोणालाच झेपत नाही. खाऊचा मारा करतात त्या. पटकन एक धिरडं टाकते, थालिपीठ लावते, लोणचंपोळी खातेस का, सफरचंद चिरते एक, की केळं खातेस? एक ना दोन. खायला नको तर चहा, काॅफी, सरबत, दूध, ताक, काय वाट्टेल ते. पण भरपूर खायला घातल्याशिवाय त्यांचं समाधानच होत नाही.

आम्हीही या वार्ताहरांना आता जाॅइन झालोय. याचा फायदा आनंदाच्या क्षणी तर होतोच, आनंद शेअर करून. पण घरात कुणी आजारी असेल तर मदतीला यायलाही सगळे तयार असतात. आतापर्यंत माझ्या जनरेशनमधल्याच अनेकांना, माझ्यासकट, काही ना काही कारणाने हाॅस्पिटलात काही काळ काढावा लागला आहे. त्या वेळी रात्रीची झोपायची ड्यूटी, डबा न्यायला, चहा द्यायला, सोबतीला आमच्यापैकीच कोणी ना कोणी असतं. क्वचित कोणाला इतरांना बोलवावं लागलं असेल. एका माणसाकडे या ड्यूट्या लावायची जबाबदारी असते, आणि त्याला माणसं कधीच कमी पडत नाहीत. पापपुण्य मला माहीत नाही, पण हे सुख आमच्या नशिबात आहे एवढं नक्की.

या आमच्या पटवर्धन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशनच्या सगळ्या काॅरस्पाँडंट्सना खूप शुभेच्छा. त्यांना एकमेकींना सतत भेटायची संधी मिळत राहो, फोनवर खूप गप्पा मारायला मिळोत.

धन्यवाद म्हणायचं नाहीये. एक धपाटा मिळेल नाहीतर पाठीवर माहितीये मला.

Comments