पंढरपूरची माझी तरुण वाचक मैत्रीण दीक्षा येरगट्टीकरने दिलेली फ्रेम |
काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुलुंडमध्ये राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होता. (मंजुषा पाटील यांचाही सहभाग होता कार्यक्रमात, परंतु मला त्याविषयी बोलायचं नाहीय.) तर राहुल आणि आनंद फारच अप्रितम गायले. मंचावर मागेच विठोबाचं मोठं चित्र होतं, त्यातला विठ्ठल तिथून त्यांचं गाणं ऐकतोय असं मला वाटत होतं. त्यांना तबला, आॅर्गन, ढोलकं आणि टाळ यांची साथ उत्तम होती, प्रचंड ऊर्जा होती त्यांच्यात. गाणी ऐकता एेकता मला माझी पंढरपूरची भेट आठवली. त्याआधी एकदा पायी केलेली वारी आठवली.
माझ्या भावंडांमध्ये राजश्री, राजेंद्र, मंजिरी, भालचंद आणि श्रीरंग हे अनेक वर्षांपासून पुणे ते सासवड या मार्गावर वारीला जाणारे. अगदी दरवर्षी नाही तरी एक वर्षाआड नक्कीच. संजीवनी महाजन, श्रीकांत वाणी हे मित्रगण मात्र दरवर्षी न चुकता जाणारे. त्यांच्यामुळे मलाही जावं वाटलं. दहाअकरा वर्षांपूर्वी मी संजीवनीच्या सोबतीने गेलेच अखेर. देशमुख दिंडीसोबत दीडेक दिवस आम्ही चाललो, माळशिरसला विसावा असतो पालखीचा, आमचीही गावातच एका घरी मुक्कामाची, जेवणाची, झोपायची सोय होती. जेवणापेक्षा काळजी असतेे प्रातर्विधींची, ती यामुळे संपली होती. गावातल्या अनेक घरांमध्ये अशी वारकऱ्यांची सोय केली जाते, अनेकदा आपण ज्या दिंडीसोबत जातो, त्यांच्यामार्फत ती होत असते. या दीड दिवसात २५ किमी चालले असेन, पुण्याला परत येऊन मुंबई गाठेस्तो तिसरा दिवस उजाडला होता. पण थकवा नव्हता. आता मला कुणी अंधश्रद्धा, धार्मिक, परंपरावादी वगैरे म्हणा, पण दमायला झालं नव्हतं हे निश्चित. कशामुळे ते माहीत नाही. आम्ही पुण्याहून गाडी करून गेलो, गाडी पुढे जाऊन ठरलेल्या ठिकाणी थांबली होती. आमचं चालणं झाल्यावर आम्ही गाडीने परतलो, तेव्हा येतानाचा प्रवास खूप अस्वस्थ करणारा होता. काल ज्या रस्त्यावर लाखो माणसं एका लयीत चालत होती, तोच रस्ता आज ओसाड दिसत होता. काल माणसं होती याची साक्ष देत होता रस्त्याच्या आजूबाजूला असलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिकचे चहाचे ग्लास, प्लेट्स, पिशव्या, आणि असंच काहीबाही.
त्यानंतर २००६मध्ये साम टीव्हीला वारीचं विशेष प्रक्षेपण करायचं होतं, इब्राहीमकडे त्याची जबाबदारी होती. का माहीत नाही, त्याने मला विचारलंन येतेस का सोबत. तेव्हा मी नोकरी करत नव्हते, मग हो म्हटलं. तीन दिवस मला वाटतं मी त्यांच्यासोबत होते. आम्ही गाडीचा प्रवास, मधेच उतरून वारकऱ्यांशी गप्पा, शूटिंग असं करत सोलापूरपर्यंत पोचलो होतो. मी तिथून परत आले. या प्रवासादरम्यानच माझ्या एका ब्रिटिश मित्राचा एसएमएस आला होता, मायकल जॅक्सन गेल्याचा.
प्रवास आणि काम छान झालं पण मी परतल्यावर आठवडाभरात तापाने फणफणले. फॅल्सिपॅरम मलेरियाचं निदान झालं. मी वारीला जाऊन आलेय हे ऐकल्यावर आमच्या नेहते डाॅक्टरांनी कपाळावर हात मारला आणि मलेरिया सोडून माझ्याशी वारीबद्दलच बराच वेळ बोलत राहिले :)
नंतर मात्र दरवर्षी वाटायचं जावं, पण जमलं नाही. तितकंसं आतून वाटलं नसावं. किंवा माझं कुतूहल शमलं असावं. वारी ही काय भानगड आहे, काय इतके लोक इतकी वर्षं जातात, आपणही जाऊन पाहूया, ही भावना अनेकांमध्ये असते, त्यानुसारच मी गेले होते. पण आता मला जावंसं वाटत नाही हे खरं. कदाचित आता वारीनंतरचे आरोग्याचे प्रश्न, स्वच्छता, इतक्या माणसांचं नियोजन हे प्रश्न गंभीर वाटू लागलेत म्हणूनही असेल कदाचित.
तीनेक वर्षांपूर्वी सोलापूरला आॅफिसच्या कामासाठी जाताना व्हाया पंढरपूर गेले. उद्यान एक्स्प्रेसने कुर्डूवाडीला उतरले, पंढरपूरला असलेल्या माझ्या सख्ख्या मैत्रिणीने, शुभांगीने गाडी पाठवली होती तिथे. तासाभरात पंढरपूरला पोचले. आॅक्टोबर होता. गावात फार गर्दी नव्हती, पण कोणत्याही तीर्थक्षेत्रावर असते तेवढी होतीच. रात्री नऊच्या सुमारास शुभांगी देवळात घेऊन गेली. बॅरिकेड्स पार करून मी थेट विठोबाच्या समोर उभी. मला कळेचना काय करावं ते. हात जोडायची कृतीसुद्धा प्रतीकात्मक, अपुरी, वरवरची वाटली अचानक. डोळेभरून मी फक्त पाहात होते. पण गर्दीचा रेटा आलाच नि मी ढकलली गेले रुक्मिणीच्या समोर. तिला पाहून तर कायकाय आठवलं असेल, त्यामुळेच की काय, मी पुन्हा उभीच. त्या पुजाऱ्यांनीच माझं डोकं तिच्या पायावर आदळलं नि मी भानावर आले.
विठोबाच्या कपाळावरचं चंदन नि तुळशीची पानं हातात घेऊन आम्ही घरी आलो.
आजतागायत मी तो वास, ते रूप विसरले नाहीये.
गेल्या आठवड्यात गार्गी म्हणाली, आई, चल वारीला जाऊ. मी दचकलेच. सावरून म्हटलं, हो नक्की. पुढच्या वर्षी नीट प्लॅन करून जाऊ. त्याचं बोलावणं येईलच अशी खात्री आहे. लई नाही मागणं विठोबा...
You & Gargi are invited ...Vithoba has answered your prayer!....Shubhangi & Anil.
ReplyDeleteYou & Gargi are invited ...Vithoba has answered your prayer!....Shubhangi & Anil.
ReplyDeleteआलोच...
ReplyDelete