Railkatha 3 - the Mumbai rail lingo

अप - सीएसटी किंवा चर्चगेटच्या दिशेने जाणारी गाडी. म्हणजे आपण अपटाउन जातो आॅफिसला, अनेक शहरांमध्ये कार्यालयं डाउनटाउन असतात.
डाउन - सीएसटी किंवा चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्या.
फास्ट - निवडक स्थानकांवर नक्की थांबणाऱ्या, व इतर स्थानकांच्या अधेमधे थांबणाऱ्या लोकल
स्लो - सर्व स्थानकांवर व अधेमधेही थांबणाऱ्या लोकल
सेमी फास्ट - सीएसटीहून ठाण्यापर्यंत फास्ट आणि पुढे स्लो जाणाऱ्या लोकल
फर्स्ट - प्रथम श्रेणीचा डबा
मिडल - महिलांचा मधला डबा
फर्स्ट लेडीज - महिलांचा चर्चगेट/सीएसटी बाजूचा डबा
व्हिडिओ कोच - बायकांच्या फर्स्ट क्लासच्या डब्याला लागून असलेला जनरल फर्स्ट क्लास. (बायका सहज न्याहाळायला मिळतात असा डबा. अनेक नियमित प्रवासी हा डबा चुकवत नाहीत म्हणे!)
किचन - महिलांच्या डब्यात अगदी गार्ड/मोटरमनच्या पाठीशी असलेला छोटा सेक्शन, जिथे एक आडवा मोठा बाक व त्याच्या समोर दोन छोटे बाक असतात. अनेक बायकांची किचनमधली रोजची जागा ठरलेली असते.
ग्रूप - रोज ठरावीक लोकलने जाणारी मंडळी. वय/भाषा/नोकरी/रूप कशाचंच बंधन नसलेला हा ग्रूप म्हणजे बहुतेकांसाठी दुसरं कुटुंबच असतं.
मेगा ब्लाॅक - दर रविवारी मध्य/पश्चिम रेल्वेवर ठरावीक परिसरात घेतल्या जाणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेला मार्ग. ऊर्फ रविवारच्या प्रवाशांचा कर्दनकाळ
ट्रॅक - गाड्या बंद पडल्या की प्रवाशांना इच्छित स्थळी पोचता यावं म्हणून केलेला मार्ग
इंडिकेटर - हे चुकीची का होईना, गाडीची वेळ, गंतव्य स्थान वगैरे माहिती देणारं इलेक्ट्राॅनिक यंत्र असलं तरी त्याचा उपयोग इंडिकेटरच्या खाली भेट असं सांगण्यासाठी अधिक होतो, असा संशय यायला वाव आहे.
कावळे - तिकीट तपासनीस. आताशा हा शब्द फारसा ऐकू येत नाही, कारण टीटीई आता काळे कोट घालत नाहीत.
लेट - एक मिनिटापासून एक तासापर्यंत होत असलेला विलंब
बंचिंग - काही कारणाने एखादी गाडी बंद पडली की त्याच मार्गावर तिच्या मागे अनेक गाड्या उभ्या असणे
हार्बर - वेस्टर्न व सेंट्रल दोन्ही प्रवासी ज्याकडे करुणेने पाहतात, असा मार्ग
वेस्टर्न - चर्चगेट ते डहाणू असा सरळ रेषेतला मार्ग. इकडचे लोक सतत सेंट्रलला शिव्या देत असतात.
सेंट्रल - सीएसटी ते खोपोली आणि सीएसटी ते कसारा असा प्रदीर्घ मार्ग. इकडचे लोक सतत वेस्टर्नला, खरं तर वेस्टर्नवाल्यांना, शिव्या देत असतात.
रिटर्न - कांदिवलीहून चर्चगेटला जायचं असल्यास, कांदिवलीहून बोरिवलीला जाणे व त्याच लोकलमध्ये बसून चर्चगेटला जाणे. वेळ वाया गेला तरी चालेल, सीट मिळणं महत्त्वाचं
फोर्थ सीट - तीन माणसं जेमतेम बसू शकतील अशा बाकावर चौथ्या माणसाला सामावून घेण्यासाठी अंग चोरणं
क्लेम - सीएसटीहून बदलापूरला जाणाऱ्या गाडीत, दादरला चढून जिवाच्या आकांताने आत शिरून कुठे उतरणार असं विचारून कल्याणला उतरणाऱ्या बाईच्या जागेवर आपला हक्क सांगणं व तो तितक्याच आकांताने राखणं
क्यू - काही ठरावीक लोकलच्या महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांसमोर लोकल येण्यापूर्वी महिला रांग लावून उभ्या राहतात व रांगेत लोकलमध्ये चढतात. यात एका अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. एकदा अशी रांग धुडकावून चालत्या लोकलमध्ये घुसून खिडकी पकडल्याचा आनंद या दहशतवादी क्यूनिष्ठ महिलांनी हुसकावून लावल्याने मावळलेला आहे, याची नोंद घ्यावी.
डोअरला जाणं - डब्याच्या दाराबाहेर लटकणं

Comments