‘द म्युझिक रूम’

पुस्तकाचा कोपरा या दैनिक लोकसत्तामध्ये अग्रलेखाच्या वा समोरच्या पानावर प्रसिद्ध होणाऱ्या स्तंभातील हा शेवटचा लेख. मंगळवार, २८ डिसेंबर २०१० या दिवशी प्रसिद्ध झालेला. श्रीकांत बाेजेवारांनी अनेक लेखकांकडून खूप चांगल्या पुस्तकांवर या स्तंभात लिहून घेतलं होतं.

काही काही पुस्तकं खूप गाजलेली असतात. पण आपण त्याच्यापर्यंत पोचलेले नसतो. कारण कधी कधी गाजलेली किंवा पुरस्कारप्राप्त पुस्तकं आपल्याला आवडतही नाहीत. अरुन्धती रॉय यांचं गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज हे पुस्तक १६व्या पानापुढे मी वाचू शकले नाही. काही पुस्तकं आपल्यापर्यंत योगायोगाने पोचतात. नमिता देवीदयाळ यांचं ‘द म्युझिक रूम’ हे असंच अचानक हाती आलेलं पुस्तक. नमिताबरोबर मी काही काळ टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम केलं होतं. त्यामुळे तिचं हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरच ते वाचायचं मी ठरवलं होतं पण ते विकत घ्यायची इच्छा नव्हती कारण ते आवडेल की नाही अशी छोटीशी शंका होती. परवा माझ्या नविन लावलेल्या वाचनालयात मात्र ते समोर आलं आणि घरी आणलं. काळ्या मुखप्रष्ठावरची, पांढरी साडी नेसून तानपुरा घेतलेली पाठमोरी नमिता पाहून छान वाटलंच होतं. आणि पुस्तकही चक्क मस्त निघालं. अगदी खाली ठेवू नये असं वाटायला लावणारं.
नमिता आणि तिच्या गाण्याच्या गुरु धोंडूताई कुलकर्णी यांची ही तशी वैयक्तिक गोष्ट. साधारण १० वर्षांची असताना नमिता धोंडूताईंच्या केनेडी ब्रिजजवळच्या घरी पहिल्यांदा गेली. अतिशय श्रीमंत घरात वाढणा-या नमितासाठी धोंडूताईंचं - बाईजींचं - हे दीड खोल्यांचं अंधार घर म्हणजे खेळघरच वाटलं, डॉल्स हाउस. त्यातच बाईजींची म्हातारी आई जवळपास लोळगोळा अवस्थेत एक कोपऱ्यात गादीवर पडलेली. नमिताची आई उत्तम चित्रकार त्यामुळे कलागुण आपल्या मुलीत जात्याच उतरले असतील या विश्वासाने खूप परिश्रमाने धोंडूताईंसारखी प्रसिद्धीपासून लांब गेलेली पण कुशल गुरु त्यांनी शोधून काढली होती.
नमिता लवकरच बाईजींच्या आणि आईच्याही प्रेमात पडली तरीही आपलं शाळेतलं जग खूप वेगळं आहे, इतर मुली बॉयफ्रेंडच्या शोधात तर आपण ‘सा’च्या, हेही तिला डाचत होतं. शाळेच्या एका स्पध्रेत खूप तयारी करून अर्थात बाईजींच्या मार्गदर्शनाखाली, ती गाते आणि पहिलं बक्षीस मिळवते तेव्हा ती सुखावते. आपण करतोय ते अगदीच ‘हे’ नाहीये, याची खात्री पटते. आणि दुस-या दिवशी शाळेतली दोन मुलं तिला विचारतात, ‘‘काल शब्द विसरलीस का गाण्याचे? तेच तेच म्हणत होतीस म्हणून विचारलं!’’
नमिताच्या आवाजावर बाईजी खूष आहेत, त्या तिला कधीकधी आपल्याबरोबर साथीला नेतात. तिने सगळं सोडून गाण्याकडे लक्ष द्यावं, ती खूप मोठी गायिका होऊ शकते, उस्ताद अल्लदिया खान, सूरश्री केसरबाई केरकर यांचा वारसा चालविण्याची तिची क्षमता आहे, असं त्या तिला सांगत राहतात. पण नमिता मुंबई सोडून अमेरिकेत शिकायला जाते.
शिक्षण सुरू असताना ती तिथेही रियाझ सुरूच ठेवते. भारतात येते तेव्हा तेव्हा बाईजींकडून नवीन गाणं शिकत राहते. हे शिकणंही कसं? तर आठवड्यातून दोनदा तासाच्या कटय़ावर चालणारं नव्हे तर गपा मारत, बाईजींच्या हातचा चहा पीत, त्यांच्याकडून कोल्हापूरच्या त्यांच्या बालपणीच्या कहाण्या ऐकत चालणारं.
यातूनच आपल्याला कळते धोंडूताईंची अजब कहाणी. कोल्हापूरला ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम तबला वाजवणारे त्यांचे वडील गणपतराव. ही मुलगी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणार, याची त्यांना खात्री होती. धोंडूताईंनीही त्यासाठी अथक परिश्रम घेतले, संगीताकडे १०० टक्के लक्ष देता यावं यासाठी लग्नही केलं नाही, कलेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. परंतु घरगुती कारणासाठी मुंबई सोडून त्या दिल्लीत स्थायिक झाल्या आणि जनमानसाच्या आठवणींच्या बाहेर फेकल्या गेल्या. काही वर्षांनी त्या मुंबईत परत आल्या. पण केनेडी ब्रिजचं घर त्यांना सोडावं लागलं. काही र्वष त्या शिवाजी पार्कला एका संगीत रसिकाच्या घरी राहिल्या. नंतर राज्य सरकारच्या कलाकारांच्या कोट्यातून त्यांना बोरिवलीत घर मिळालं.
नमिताने या तिन्ही घरी बाईजींकडून धडे घेतले. अमेरिकेतून परत आल्यानंतर, लग्न होऊन एक मुलगा झाल्यावरही नोकरी सांभाळून तिने संगीत शिक्षण सुरूच ठेवलं. या काळात ती बाईजींबरोबर कोल्हापूरला गेली, त्यांच्या बालपणीच्या आठवणींतली स्थळं पाहिली, त्यांचं मनोदैवत असलेल्या महलक्ष्मीसमोर गाणंही सादर केलं.
जवळजवळ २५ ते ३० वर्षांच्या या सहवासात नमिताने बाईजींकडून अल्लादिया खान आणि केसरबाई यांच्याविषयी खूप ऐकलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मफिली, श्रीमंतांकडून कलाकारांना दिला जाणारा आश्रय, कलाकारांचं काहीसं विक्षिप्त वागणं, आपल्या गुरुने सांगितलेली गुपितं वा विशिष्ट ताना दुसऱ्या कलाकाराला मिळू नयेत म्हणून प्रयत्न करणं, चिजांमधले शब्द कळू नयेत म्हणून जाहीर मफिलींमध्ये मुद्दाम शब्द पुटपुटणं, ध्वनिमुद्रण करायला नकार देणं हे सगळं नमिताने ऐकलं. आणि अतिशय सहजसोप्या इंग्रजीत मांडलं. या सगळ्याची गोष्ट म्हणजे ‘द म्युझिक रूम’. बाईजींच्या केनेडी ब्रिजच्या घरातील गणपती, अल्लादिया खान आणि बाईजींचे आईवडील आणि त्यांचे छोटे देव असलेला देव्हारा शिवाजी पार्कमध्येही त्यांच्याबरोबर गेले आणि अर्थातच बोरिवलीलाही. या तसबिरी आणि तानपुरा यांच्या साक्षीने नमितानं जिथं गाणं शिकलं, ती म्युझिक रूम. तिचं मुंबई/अमेरिकेतलं उच्च्भ्रू जग आणि बाईजींसोबतचं संगीतमय जग यांचा मेळ जिथे तिला घालता आला ती म्युझिक रूम.
संगीतातील काही तांत्रिक मुद्दे या पुस्तकात येतात, पण ते अशा ओघाने येतात की ते एखाद्या ‘औरंगजेबा’लाही समजतील. कोल्हापूरचं वर्णन, बाईजींच्या घरचं वातावरण यांसंबंधी इंग्रजीतून वाचताना मराठी वाचकांना ते तात्काळ डोळ्यांसमोर येतं, इतकी ती भाषा आपली वाटते पण ती ‘मराठी इंग्रजी’ही नाही!
हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वाबद्दलचं हे पुस्तक वाचकालाही म्हणूनच एक म्युझिक रूममध्ये घेऊन जातं एवढं नक्की. आणि त्या रूममध्ये असतात बाईजी - जेमतेम पाच फूट उंच, कडक कांजी केलेली सुती साडी, केसांचा छोटासा अंबाडा, हातात मोठं घडय़ाळ, तानपुरा घेऊन गंभीरपणे आणि आत्मविश्वासाने ‘सा’ लावणा-या.

Comments