पॉर्न पे चर्चा

‘काय आहे ते पाॅर्न वगैरे, कोणाला वेळ असतो ते पाहायला न कळे?’
‘अहो, काल आयपॅडवर गेम खेळत होते, चुकून कुठे तरी क्लिक झालं नि सगळ्या कशा तरीच साइट दिसल्या. सोनू तसं काही पाहत असेल आपली?’
‘अरे, पाॅर्न म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का कुणाला? डिक्शनरीत दिलंय पाॅर्न म्हणजे अश्लील चित्र, लिखाण, वगैरे साहित्य.’
‘तुला एक मस्त लिंक फाॅरवर्ड करते व्हाॅट्सअॅपवर, पाहशील रात्री. साॅलिड आहे एकदम.’
‘पाॅर्न साइट्सवर बंदी वगैरे ठीक आहे, पण अशा किती साइट्स ब्लाॅक करणारेय सरकार?’
‘पाॅर्नसाइट्स कसल्या बंद करताय, हिंदी आणि मराठी सिनेमांमधली आयटम साँग्ज बंद करायची हिंमत आहे का कोणाची?’
‘तू काल पाठवलेली क्लिप जाम बोअर होती हं, काहीच होत नव्हतं त्यात.’
‘परदेशात म्हणे पाॅर्न फिल्म्ससाठी आॅस्करसारखा पुरस्कार सोहळा होतो, पाॅर्नस्टार्सच्या स्वाक्षऱ्या वगैरे घेतात लोक.’
‘आता फेमिनिस्ट पाॅर्न म्हणजे स्त्रीवादी पाॅर्नही तयार होतं परदेशात.’
‘भारतीय पाॅर्न फिल्म्स अशा फार नसतातच, जे काही असतं ते सगळं परदेशी.’
‘बायका काय बघतात पाॅर्नमध्ये? पण पुरुष तरी काय बघतात त्यात?’
‘पाॅर्न फिल्म्समध्ये ज्या मुली/बाया काम करतात, त्या काय सुखाने करत असतील असं वाटतं, शोषणच आहे ते एक प्रकारचं.’
‘तसलं काही पाहिलं की बायकोपण नकोच वाटते ना तुम्हाला, तिचा विचार करा की थोडा.’
‘आपल्या विशेष सीडीज जाम महाग झाल्यात रे, आता काय करायचं?’
‘अरे मेल्यांनो, सरकारने ते लॅपटाॅप दिलेत पुस्तकं वाचायला की हे असलं पाहायला, फेकूनच देते थांब ते.’
गेल्या काही दिवसांत नाक्यावर, कट्ट्यावर, आॅफिसात, फेसबुकवर, व्हाॅट्सअॅपवर, क्वचितप्रसंगी घरातही बोलले गेलेले हे संवाद.
पाॅर्न साइट्सवर घालण्यात व नंतर उठवण्यात आलेल्या बंदीच्या निमित्ताने हा गुपित ठेवला गेलेला, जणू काही अस्तित्वातच नसलेला, परंतु अतिशय महत्त्वाचा विषय ऐरणीवर आला. सोशल मीडियावर अनेकांनी (यात अनेकीही आल्याच) पाॅर्न पाहत असल्याची जाहीर कबुली दिली. अनेकांनी तर या सगळ्या साइट्सचे पत्ते दिले आणि अशी बंदी घालणं किती सोपं, परंतु ती अमलात आणणं किती कठीण आहे, हेच दाखवून दिलं. हा विषय तितका सोपा नाही, चर्चा करूच नये इतका क्षुल्लक तर नक्कीच नाही. घराच्या भिंतींच्या आड काय पाहायचं याचं स्वातंत्र्य घटनेनेच भारतीय नागरिकाला दिलेलं आहे. परंतु, या स्वातंत्र्याबरोबरच आपल्या कर्तव्यांबाबतही आपण तितकेच दक्ष आहोत का याचीही काळजी घ्यायला हवी ना?

पुरुषाची लैंगिकता, त्यासाठी आवश्यक असणारी स्त्रीची साथ सर्वमान्य आहे. परंतु, त्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हा अशी साथ विविध कारणांनी उपलब्ध नसते, ही वस्तुस्थिती आहे. तसंच, जेव्हा एखादा नवरा कारणवश एकटा राहात असतो, तेव्हा त्याची बायकोही एकटीच राहात असते; तिची लैंगिक भूकही त्याच्याइतकीच असू शकते, हीदेखील वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर स्वीकारलेली बरी. पाॅर्न पाहून स्वत:चे समाधान करून घेणाऱ्यांमध्ये असे एकटे जीव प्रामुख्याने आहेत. एकत्र राहूनही एकटे असणारेही जीव आहेतच ना आजूबाजूला?

पाॅर्न पाहणं काही जगावेगळं, अॅबनाॅर्मल नाही. विशिष्ट वयात पाॅर्न न पाहावासा वाटणं हे कदाचित अॅबनाॅर्मल म्हणू शकतो.
ते पाहून संस्कृतीचा ऱ्हास होतो वगैरे म्हणणंही आपल्या तथाकथित भारतीय संस्कृतीवर अन्याय करणारं ठरेल. इतकी ती कुचकामी नाही, हे आपण पाहातोच आहोत.
प्रश्न तरुण मुलांनी पाॅर्न पाहण्याचा येतो तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की, जर त्यांच्या हातात फोन असेल तर ते यापासून दूर राहूच शकत नाही. हे आपण पालकांनी स्वीकारायला हवं. सतराअठरा वर्षांच्या मुलामुलींमध्ये मित्रमंडळींकडून स्वीकारलं जाणं अतिशय महत्त्वाचं असतं (peer pressure), तो त्यांच्या जडणघडणीतला मोठा टप्पा असतो. विशिष्ट प्रकारचे कपडे, भाषा, सिनेमे, खाणं हा या स्वीकारण्याचाच एक भाग असतो. पाॅर्न हा त्यातलाच एक मुद्दा. तो त्या वयात पाहिला जातो, बऱ्याचदा उत्सुकता म्हणून, क्वचित जबरदस्ती म्हणून. सगळीच मुलं मोठं झाल्यावरही ते पाहात राहतात, असं नाही. ते पाहणं प्रत्येका/कीला आवडेलच/आवडतंच असं नाही. लैंगिकता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केलं की, त्यासंबंधीचे असे मुद्दे स्वीकारावेच लागतात, भले ते कितीही अप्रिय वाटोत. विवाहांतर्गतचा बलात्कार हाही याच विषयाशी निगडित आहे, पण त्याच्या विरोधात किती जण जाहीरपणे इतक्या आक्रस्ताळेपणाने व्यक्त होताना पाहिलेत तुम्ही?
पाॅर्नचं व्यसन वाईट. व्यसन तर कोणत्याही गोष्टीचं वाईटच ना. सिगरेट, दारू, तंबाखू, गोड खाणं, सेल्फी काढणं, टीव्हीवरच्या मालिका पाहाणं, खरेदी, अशी कितीतरी व्यसनं आसपासच्या अनेकांना असतात, आपल्यालाही असतातच की. आपल्या माणसाची अशी व्यसनं आपण सहन करतो, ति/त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. इतरांना त्रास होत नाही ते व्यसन केलं तरी चालेल, असं बहुतेकांचं म्हणणं असतं. उदा. मालिकांचं वा सेल्फीचं व्यसन. परंतु, जी गोष्ट किंवा जी कृती तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापासून दूर ठेवते, तिला व्यसन म्हणतात. पाॅर्न पाहण्यात तुम्ही तासनतास घालवत आहात, त्याचा तुमच्या अभ्यासावर वा कार्यालयीन (वा शयनगृहातील) कामगिरीवर परिणाम होत आहे, तर त्याला व्यसनच म्हणावे लागेल व त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे. अनेक नवरे बायकोला मालिकांचं व्यसन आहे म्हणतात, त्यांनाही हेच उत्तर आहे. जर त्या मालिकांपायी त्यांच्या घरगुती वा व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत नसतील, तर ते व्यसन आहे, तुम्ही त्यांना तातडीने व्यावसायिक समुपदेशकाकडे घेऊन जा. पण त्या त्यांच्या वेळाचं नियोजन योग्य रीतीने करत असतील, तर तुमच्या तक्रारीला अर्थ नाही.
बिनदिक्कत पाॅर्न पाहा, हे सांगण्याचा वा त्यावर बंदी घातलीच पाहिजे हे सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. तर संस्कृतीच्या नावाखाली वस्तुस्थितीकडे डोळेझाक नको. संस्कृती, परंपरांचा दबाव वागवत आपण कितीतरी जीवनावश्यक विषयांकडे दुर्लक्ष करतोय त्यांच्याविषयी बोलायला हवंय. या बंदीच्या निमित्ताने जे प्रश्न समोर आलेत, त्यावर उत्तरं शोधायला हवीत. खुल्या मनाने लैंगिकतेविषयीच बोलायला हवं; आईवडील, शिक्षक, मित्रमंडळी या सगळ्यांनीच निरोगी नजरेने याकडे पाहायला हवं, असं मात्र नक्की सांगावंसं वाटतं.

Comments