पुस्तकांचा वानवळा

यंदा बरीच पुस्तकं भेट मिळाली, आणि ती वाचूनही झाली. (फक्त तेवढीच वाचून झालीत हे सांगताना फार दु:ख होतंय.) यंदा, बरेच फेबु मित्रमैत्रिणीही प्रत्यक्ष भेटले. दोन्हींचा आनंद सारखाच :)

वर्षाच्या सुरुवातीला संहिता भेटली. आमची वर्षभरापासूनची व्हर्चुअल ओळख होती. मधुरिमामध्ये ती सदरही चालवत होती एक. आम्ही भेटलो मुलुंडला, ती ठाण्यात राहणारी म्हणून ते सोपं गेलं. तिने दिलं नंदा खरे यांचं 'अंताजीची बखर.' सायली राजाध्यक्ष भेटली काहीच दिवसांत, तिने अनुवाद केलेलं 'कहाणी दोन शहरांची' हे फाळणीनंतरच्या अनुभवांवर आधारित पुस्तक तिच्याकडून मिळालं अनायासे. मग व्हॅलेंटाइन डेला प्रतीक सिंगने दिलं रवीशकुमारचं 'लप्रेक - इश्क में शहर होना.' नीतीन वैद्य यांनी सोलापूरहून पाठवलं त्र्यं.वि. सरदेशमुखांचं 'कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान.' सोलापूरला गेले होते तेव्हा माझ्या ज्येष्ठ मैत्रीण डाॅ. प्रतिभा काटीकर यांनी दिली 'Palace of Illusions' ही चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांची द्रौपदीविषयीची कादंबरी. मेधाताईनेही पहिल्या भेटीत 'आकाशवाणीचे दिवस' दिलं. आता हल्ली सायलीनं दिलं शाहू पाटोळेंचं 'अन्न हे अपूर्णब्रह्म.' गेल्या महिन्यात हातात आलं मुकेश माचकरने अनुवादित केलेलं 'आर.डी. बर्मन : जीवन संगीत.' वाढदिवसाला मुग्धाने दिलान तिने अनुवादित केलेला Lord of The Ringsच्या तीन पुस्तकांचा संच.
सुनील तांबे यांचं 'मार्खेजची गोष्ट' मात्र विकत घेऊन वाचलं. मार्खेज हा अतिशय आवडता लेखक, परंतु magical realism बद्दल मला फारशी माहिती नव्हती. त्याच्या दोन कादंबऱ्या वाचायला अनेक दिवस लागले होते, पण त्यातली पात्रं नावं अनोळखी व tongue twister असतानाही मनात दडून राहतात नंतरही. या मार्खेजची ही गोष्ट मस्तच. एखाद्या लेखकावरचं रोचक पुस्तक असावं तर असं, असं मला नक्की वाटतं.
ही सगळी पुस्तकं अगदी unputdownable म्हणतात त्या कॅटेगरीतली. अंताजीची बखर ही कादंबरीच, परंतु खरोखरच घडलेली असू शकते, असं वाटायला लावणारी. पेशव्यांच्या काळातला एक मराठी शिपाई अंताजी. त्याच्या आयुष्याचं थरारक वर्णन तर यात आहेच, परंतु त्यातून इतिहासाचे गोडवे गाण्याची आपली सवय किती दांभिक, खोटेपणाची अाहे, हे मला यात जास्त जाणवत राहिलं.

लप्रेक हा भारी प्रकारेय. लप्रेक म्हणजे लघु प्रेम कथा. दिल्ली शहर हे यातलं महत्त्वाचं पात्र आणि पार्श्वभूमीही. हिंदी मी फारसं वाचलेलं नाही, परंतु या कथा छोट्या छोट्या असल्यानं वाचणं सोपं गेलं. कुठलंही पान उघडावं नि वाचावं, असं हे पुस्तक. यातली रेखाचित्रंही बघत राहावीत अशी.

पॅलेस आॅफ इल्युजन्स म्हणजे मयाने पांडवांसाठी बांधलेली मयसभा. द्रौपदी हे महाभारतातलं असं पात्र, जिच्याबद्दल कर्णाएवढंच कुतूहल वाटतं. पाच पती, द्यूत, अपमान, वनवास, युद्घातले मुलांचे मृत्यू, कृष्णाचं आणि तिचं निनावी नातं व या नात्याचे असंख्य पदर, आणि तिचा पॅलेस. हा पॅलेस या पुस्तकातलं महत्त्वाचं पात्रच आहे. तो द्रौपदीने तिला हवा तसा बांधून घेतलाय, तो तिच्या इच्छेनुसार रूप बदलत राहतो. अर्थात फार काळ तिला त्याचा उपभोग घेता येतच नाही. पांचाल देशात सुरू झालेला व स्वर्गाच्या दाराशी संपलेला द्रौपदीचा प्रवास आणि मृत्यूपूर्वीचं तिचं चिंतन अनेक दिवस मनात घर करून होतं. डाॅ. काटीकरांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Tales of Two Cities या कुलदीप नय्यर व आसिफ नूरानी यांच्या फाळणीनंतरच्या अनुभवांवरचं कहाणी दोन शहरांचं हे पुस्तक. अनुवाद झकासच. नय्यरांचं कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं तर नूरानींचं इकडून तिकडे गेलं. मला वेगवेगळ्या शहरांबद्दल वाचायला खूप आवडतं. त्यामुळे हे पुस्तक अधिक रुचलं.


त्र्यं.विं.चं पुस्तक जरा सावकाश वाचावं लागलं मला, याचं एक कारण त्यात बरेच संस्कृत श्लोक उद्धृत केलेले आहेत. दुसरं कारण, त्यांची लालित्यपूर्ण भाषा. त्यातले कित्येक मराठी शब्द मी कधीतरी वाचले होते, वापरले नव्हतेच. पण शाकुन्तलाच्या संदर्भामुळे वाचण्याचा आनंद वेगळाच होता. त्यांची या नाटकावरची टिप्पणीही खासच आहे.

'आकाशवाणीचे दिवस' म्हणजे पत्रकार मित्रांसाठी वर्कबुकच जणू. शिकाऊ आणि अनुभवी दोन्ही. आकाशवाणी या माध्यमाचा अत्यंत परिणामकारक व प्रभावी उपयोग मुंबई व इतर केंद्रांवर काम करताना मेधा कुलकर्णी व तिच्या सहकाऱ्यांनी केला आहे, त्याबद्दल वाचणं म्हणजे लेक्चरला बसण्यासारखं आहे.

शाहू पाटोळेंचं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' माझ्या ब्राह्मणी अनुभवांना धक्कादायक होतं. पाककृतींची पुस्तकं मी वाचत नाही कारण मला स्वयंपाकात तसा फार रस नाही. रोजच्या जेवणातले व न्याहारीचे पाचसात पदार्थ सोडले तर मी अगदी ढ. परंतु खाद्यसंस्कृतीबद्दल वाचायला, बोलायला मला आवडतं. शेकडो जातीजमाती, समाज, प्रदेश यांचं जे खाण्यापिण्यातलं वैविध्य आहे, ते मला फार महत्त्वाचं वाटतं. भाषेइतकंच. पण तरीही, जे काही लेख वा पुस्तकं लिहिली जातात, ती बहुतांशी सवर्णांच्या संस्कृतीविषयी, हे मान्यच. पाचसहा वर्षांपूर्वी कोकणात लांजा तालुक्यातल्या एका छोट्या खेड्यात एका घरी गेले होते, तेव्हा त्या घरातलं स्वयंपाकघर पाहून इतके दचकले होते. चूल, दोनतीन डबे, पाचसहा ताटं/ताटल्या. यापलिकडे काहीच नव्हतं त्यात. ते त्या अर्थानं गरीब नव्हते, परंतु कदाचित त्यांना इतर वस्तूंची गरज वाटत नसावी. तर पाटोळेंचं हे पुस्तक महार व मांगांच्या खाद्यसंस्कृतीविषयी आहे. ते अतिशय अभ्यासपूर्ण आहे, खूप माहिती आहे, आणि तरीही रटाळ न होता वाचनीय आहे. त्यातले अनेक शब्द मी प्रशांत पवारकडून ऐकलेले होते, तरीही माहीत नसलेले अनेक होतेच. तेल, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा अत्यंत कमी वापर हेही नवीन होतं. नक्की वाचावं असं हे पुस्तक.

आरडी बर्मनवरचं पुस्तक वाचतेय अजून, मोठं आहे बरंच. संगीतावरचं पुस्तक वाचताना कसं होतं ना, एखादी गाण्याची ओळ आली की नकळत ते मनात वाजू लागतं, ऐकू येत. त्यामुळे जरा वाचायला वेळही लागतो.


मे महिन्यात एक पुस्तक हातात आलं ते एकदम खास. राम पटवर्धन यांनी १९५५मध्ये अनुवादित केलेलं, अखेरचा रामराम. श्रीरंग पटवर्धनने एक अत्यंत जुनी जीर्ण प्रत मला दिली, ती दोनेक तासांत वाचून झाली असेल. मार्टिन फियाला याच्या 9.15 to freedom या कादंबरीचा हा अनुवाद. कम्युनिस्ट राजवटीपासून पळ काढण्यासाटी ९.१५ची ट्रेन पकडण्याचा खटाटोप अशी साधारण याची गोष्ट. It's an absolute thriller. त्यात पटवर्धनांची भाषा. मौजतर्फे याची नवीन आवृत्ती पटवर्धनांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्वामी मुद्रिकांचा वाचायला घेतलंय. मी मूळ इंग्रजी वाचलेलं नाही, त्यामुळे थोडं सावकाश, समजून उमजून वाचावं लागतंय. पण मराठी शब्दकळा इतकी अप्रतिम आहे त्यातली, त्या शब्दांच्या जाळ्यात फसायला होतंय.

मी या वर्षातला नववा महिना लागलाय, जेमतेम नऊदहाच पुस्तकं वाचलीयेत, याबद्दल बोलण्यासारखं काही नाहीये. परिस्थती सुधारेल लवकरच, अशी आशा आहे.

Comments

  1. बाकी शुन्य -कमलेश वालावलकर

    ReplyDelete

Post a Comment