अबोला

एखादी व्यक्ती स्वत:चं आयुष्य संपवायचा निर्णय घेते तेव्हा तिच्या दृष्टीने सर्व पर्याय संपलेले असतात, तिची समस्या आता न सुटणारी असते. समस्या कोणत्याही प्रकारची असली तरी आईवडील, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, वडीलधारे, मार्गदर्शक कोणाकोणाकडे या समस्येवर उपाय नाही, किंवा त्याबद्दल त्यांच्याशी बोलताही येणार नाही, असं त्यांच्या मनाने घेतलेलं असतं. कधी ही समस्या असते औरंगाबादेतल्या श्रुती कुलकर्णीसारखी बदनामी झाल्याची, तर कधी मुंबईतल्या समलिंगी तरुणासारखी कुचंबणेची. कधी असते परीक्षेत अपयश मिळण्याची भीती तर मनाजोगता जोडीदार निवडता न आल्याची खंत. आपण तटस्थपणे या समस्यांचा विचार करतो तेव्हा त्या इतक्या गंभीर वाटत नाहीत, कारण त्या सोडवता येण्याजोग्या वाटतात. त्या सोडवता येण्याजोग्या असतातही. आपल्या दृष्टीने ती गोष्ट आईवडिलांशी शेअर केली की त्यात समस्या उरणारच नसते. कारण आईवडील आपल्याला जो मानसिक व भावनिक आधार देऊ शकतात, तो बहुतांश समस्या सोडवताना महत्त्वाचा असतो.
मग पाणी मुरतं कुठे?
आईवडिलांशी शेअर करणं, कोणतीही गोष्ट, हे अनेक मुलामुलींसाठी अजूनही दुरापास्त आहे. कितीही अशक्य वाटली तरी ही वस्तुस्थिती आहे.
ती बदलणं कोणाच्या हातात आहे?
आपल्याच ना?
मुलांशी मोकळेपणाने बोला, त्यांचं ऐकून घ्या. शांत डोक्याने त्यावर विचार करा. परीक्षा व अपयश, मनाजोगता जोडीदार, लैंगिकतेच्या जाणिवा, या व इतर विषयांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. आपल्या मुलीला वा मुलाला विश्वास वाटू द्या की, काहीही झालं तरी आईबाबा आपल्यासोबत आहेत, कोणत्याही समस्येवर त्यांच्या मदतीने मात करता येईल. विश्वास वाटू द्या की, आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यासाठी कोणतीही वा कशाचीही पूर्वअट नाही. वागणं चुकीचं असू शकतं, व्यक्ती नाही. वागणं चुकतंय म्हणून मुलाशी वा मुलीशी अबोला धरण्याजोगी दुष्ट, क्रूर, अमानुष कृती नसावी. मुलांना त्याचा सर्वाधिक त्रास होतो. गेलेला जीव परत येत नाही. मग तर स्वत:शीच अबोला धरण्याची वेळ येते. हो ना?

Comments