कर्तव्य

सकाळ झाली. मनी उठली. आज सुटी होती, तीही रविवारला जोडून आलेली. तरीही तिने वीकेंड घरीच काढायचं ठरवलं होतं. कारण ही सुटी होती स्वातंत्र्यदिनाची. त्यामुळे ती सुटीच्या मानाने लवकरच उठली, अंघोळ केली नि पांढरा सलवार- कुडता, त्यावर भगवी व हिरवी बांधणीची ओढणी, हातात तिरंगी बांगड्या अशी तयार होऊन काॅलनीतल्या मैदानावर ध्वजारोहणासाठी गेली. जाताजाता आईबाबांना वेळेवर यायची आठवणही केली. मैदानात तिचे काॅलनीतले मित्रमैत्रिणी जमा होतच होते. कोणी झेंड्याच्या खांबाभोवती फुलांची रांगोळी काढली, कोणी उपस्थितांसाठी खाऊ आणला. काल संध्याकाळीच त्यांनी मैदान स्वच्छ केलं होतं. फार कचरा नव्हता, कारण त्यांच्या काॅलनीतले लोक सुजाण होते. त्यांच्याकडे सुका ओला कचरा वेगळा होत होता, त्याचं नीट व्यवस्थापन होत होतं. आणि त्यांच्या सारखं मैदान इतर कुठे नव्हतं, त्यामुळे त्यांना ते फार आवडे. मैदान स्वच्छ, नीट राहील याची काॅलनीत राहणारे सगळेच काळजी घेत.
बरोबर नऊ वाजता काॅलनीतल्या वृद्ध आजींच्या हस्ते झेंडा फडकावला गेला. सगळ्यांनी जन गण मन म्हटलं तेव्हा मनीच्या घशात आवंढा आला. नेहमीप्रमाणेच. मग सगळ्यांनी खाऊ खाल्ला. मोठी माणसंही एकमेकांशी बोलत थोडी रेंगाळली नि पोरं त्यांच्या आवडत्या बाकावर गप्पा मारत बसली. आज त्यांना क्लासलाही सुटी होती, म्हणून थोडा निवांतपणा होता.
मनीच्या मनात आलं, नुसतं ध्वजारोहण करून आपलं कर्तव्य झालं का पूर्ण? की अजून काही करायला हवंय?
आपण सगळे नियम पाळतो, कुठेही फसवाफसवी, चोरीमारी करत नाही, जमेल तशी गरजूंना मदत करतो, शक्य तितकं वीज/पाणी/इंधन वाचवण्याचा प्रयत्न करतो, आईबाबा सगळे कर भरतात. आणखी काय करावं बरं, हा विचार तिच्या मनात येतच राहिला संध्याकाळपर्यंत.
सूर्यास्तापूर्वी पुन्हा सगळे जमले, झेंडा खाली उतरवण्यासाठी. आकाशात सुरेख इंद्रधनुष्य पडलं होतं नुकतंच. मनी आणि तिची मित्रमंडळी ते पाहून हरखून गेली. त्या इंद्रधनुष्यामुळेच त्यांच्या लक्षात आलं, अरेच्चा, उद्या श्रावण लागतोय की.
स्वातंत्र्यदिनाच्या नि श्रावणाच्या मनापासून शुभेच्छा.

Comments