आयपीएलनंतरचे नैराश्य

लोकसत्ता रविवार, २ मे २०१०
आयपीएलचे सामने संपले आणि येऊ घातलेल्या रिकामपणाची भयानक जाणीव झाली. रिकामपणाची टोचणी अधिकच बोचू लागली. रात्री आठ ते पावणेबारा हा वेळ गेला दीड महिना कसा (टीव्हीसमोर) गेला ते कळलेच नव्हते. त्यामुळे आता पुढे काय, हा प्रश्न मला भेडसावू लागला आहे; एवढेच नव्हे तर मला चक्क नैराश्य आले आहे हो!
त्याचं काय आहे, १२ एप्रिलपासून रोज रात्री आठ वाजता, कधी कधी तर चार वाजताच मॅक्स लावायचं आणि (वेळेनुसार) टीव्हीसमोर मांडी ठोकायची किंवा लोळायचं हा नियमच झाला होता जणू. घरात सर्वानाच क्रिकेट पाहायला आवडत असल्याने ज्याच्या हाती रिमोट तो/ती घराते रंजवी अशी परिस्थिती नव्हती. हां, एक दोन वेळा अग्निहोत्रमधील अत्यंत उत्कंठावर्धक क्षण दुसऱ्या दिवशी पुनप्र्रक्षेपणाच्या वेळी पाहायची आजीची तयारी नसल्याने थोडा युद्धजन्य तणाव निर्माण झाला खरा, परंतु तो तात्पुरता. आम्ही अगदी सगळे सामने पाहिले नसतील. पण पंजाब, दिल्ली, कोलकाता आणि राजस्थानचे सामने सोडले तर इतर सगळे पाहिलेच. मुंबईचे सामने आपलीच म्हणून, CSKचे MSD आवडता म्हणून, डेक्कन चार्जर्सचे गिलक्रिस्ट मुलीचा लाडका म्हणून आणि आरसीबीचे कुंबळे-कॅलिस-केपी आहेत म्हणून!
आणि फक्त सामने पाहून गुमान झोपावं तर ते नाही, सामन्याला हजर असलेली बॉलिवूड सेलेब्रिटी काय म्हणते, जिंकणारा-हरणारा कर्णधार आणि सामनावीर काय म्हणतात ते ऐकणंही अत्यावश्यक. त्यामुळे झोपायला (की झोपेचे?) बारा नक्की!
परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वर्तमानपत्रांतली क्रीडा पानं उघडून आदल्या रात्री पाहिलेल्या सामन्याचं वर्णन, आकडेवारी आणि अनेक महान क्रिकेटपटूंच्या नावाखाली छापले जाणारे स्तंभ वाचणं ओघाने आलंच. केशरी टोपी सचिनच्या डोक्यावरच राहते की कॅलिस ती पळवतो, सर्वात वेगवान धावा कोणी कुटल्या त्याचा मागोवा ठेवणंही आलंच. शिवाय त्या रात्री होणाऱ्या सामन्याविषयीची बातमी, खेळपट्टी कशी आहे, कोणी कोणाला खेळवावं आणि कोणाला पाणी आणायला पाठवावं याचीही माहिती घेणं आवश्यक होतं.
तर एवढं काम दीड महिना होतं, त्यामुळे दिवस पटापट पुढे सरकले. रात्रीच्या जागरणामुळे दुपारची निवांत झोप घेता येत होती. हे कमी होतं म्हणून की काय, मोदी-थरूर-पुष्कर-कोची-आयकर धाडी-बेटिंग-राजीनामे वगैरेचा अतिरिक्त खुराक सुरू झाला. तो म्हणा स्पर्धा संपली तरी राहीलच, शिमगा संपल्यावर कवित्व उरतं तसा!
यामुळेच लोकहो, मला नैराश्याने घेरून टाकलं आहे! दीड महिना रोज काहीतरी घडत असावं आणि अचानक ते थांबावं, यानं आणखी काय होणार म्हणा? निराशच वाटणार ना! पण हे थोडं ओळखीचं वाटतंय. मानसशास्त्राच्या भाषेत याला म्हणतात post traumatic stress disorder (PTSD) म्हणजेच आपत्तीनंतर येणारा ताण वा नैराश्य. आता आयपीएल ही परीक्षार्थीच्या आयांसाठी आपत्तीच होती की नाही? आणि क्रिकेटप्रेमींसाठी इष्टापत्ती! म्हणजे असं नैराश्य येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. वर्षांनुर्वष जगभरातल्या लोकांना ते येतंय, मानसशास्त्राने त्यावर उपाय शोधला आहे, हेही आठवलं आणि हुश्श झालं बघा.
चला, आताही रात्री आठ वाजता टीव्ही लागेलच. डोळ्यांना आणि मेंदूला सवय झालीय ना. मग बालिका वधूच्या ब्रेकमध्ये चार र्वष सासूची पाहायची, साडेआठला जेवायला बसून नऊला अग्निहोत्रींच्या लाडिक गप्पा ऐकायच्या. आयला, तेही संपायला आलंय असं दिसतंय. (आता फक्त उमा-दुष्यंत आणि महादेव-शालिनी यांचं जमायचं राहिलंय ना?) ते संपलं की एक नजर बातम्यांवर. मग फू बाई फू, कॉमेडी एक्स्प्रेस आहेच. शिवाय सारेगमपही सुरू होतंय म्हणे. म्हणजे पल्लवीताईंसाठी वेळ देता येईल. अरेच्चा! (टीव्ही) पाहता पाहता मला कसं छान वाटायला लागलं बघा, नैराश्य गेलंसुद्धा पळून.

Comments