महाराष्ट्र सरकारच्या महान्यूज या पोर्टलसाठी काही दिवस मी लिहिलं होतं. ते या पोस्टमध्ये एकत्र केलंय. सगळ्याचं सूत्र एकच आहे, ते म्हणजे मला आवडणारे शब्द.
शब्दांशी आपली नाळ जुळते खूप लहान असल्यापासूनच. तेच संवादाचे माध्यम असतात. सुरुवातीला आपण ते बोलू शकत नसलो तरी त्यांचा अर्थ आपल्याला चांगलाच कळत असतो. 'शहाणाच आहेस' आणि 'शहाणा माझा शोन्या तो' या दोन शहाण्यान्माधला फरक लहान मुलालाही कळत असतो. आपण बोलू लागल्यावर आपले असे खास शब्दही आपण तयार करत असतो. माझी मुलगी लहान होती तेव्हा शंकरपाल्याला कम्पानानी म्हणायची, का कुणास ठाऊक. पुढे मोठी झाल्यावरही अनेक दिवस ती तेच म्हणायची, शंकरपाळे म्हणता येत होते तरीही. तिनेच अचानक तिच्या आजीला जीजी म्हणणे सुरू केले, कुणीही न शिकवता, आणि माझी सासू अनेकांची जीजी होऊन बसली!
अशी शब्दांची गंमत, ते कसे तयार होत असतील, सवयीचे होत असतील, हा माझ्या आवडीचा विषय. म्हणजे अभ्यास नव्हे पण वेगवेगळे शब्द कानी आले की मला खूप छान वाटतं. लहान असताना माझ्या वाईला राहणाऱ्या चुलतबहिणी आमच्याकडे मुंबईला आल्या की त्यांची भाषा वेगळीच वाटायची. जातीस का आता? असं ती म्हणाली की मला मजा वाटायची. (आणि इंदोरचे आमचे अभिलाष खांडेकर सर म्हणतात माहिती आपल्याकडे अनेक प्रकारे येती...) पण आज मी वाईला २ दिवस राहून आले की मीही तशीच बोलू लागते. कोकणात आजोळी गेला की तीच तऱ्हा. अगो, किवा बायो, येत्येस ना पातळभात खायला, अशी मामीची हाक आली की खरे कोकणात गेल्यासारखे वाटते. मी नंतरचे अनेक दिवस त्याच लहेजाच्या जादुई वातावरणात असते.
भाषा पाच कोसांवर बदलते हे किती छान आहे नाही. नाही तर सगळे मराठी बोलणारे लोक एकाच छापाची मराठी बोलले असते. पुणेरी, वऱ्हाडी, खानदेशी, अहिराणी, सातारी, कोल्हापुरी, कोंकणी, मालवणी, अशा बोली भाषा किंवा त्या छापाची मराठी मला ऐकायला मिळाली ती या सर्व प्रांतातले सहकारी मिळाले म्हणून. बहुतेक जण मुंबईत स्थायिक झाले होते पण त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या प्रांताचा ठसा होताच होता. सोलापूरहून आलेले प्रताप आसबे कार्यालयातल्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या सहकाऱ्याला ऐकू आलं नाही की म्हणायचे, कान किंवडा झाला काय तुझा? औरंगाबादहून आलेले प्रमोद भागवत म्हणायचे, भात गीत आणलाय की नाही कोणी डब्यात? तर सांगलीहून आलेली गौरी कानेटकर म्हणायची, अगं, किती वेळची उभारलेय तुझ्या मागे आणि तुझं लक्षच नाहीय! गोव्याहून आलेला संजय ढवळीकर म्हणायचा, काल खूप दिवसांनी आईशी गोष्टी केल्या!
***
वाढावा
मला आवडणारे किंवा आवडलेले शब्द म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडेल. तर त्याचं उत्तर असं देता येईल, की पहिल्यांदा ऐकताक्षणीच वेगळा वाटलेला, नंतर बराच काळ लक्षात राहिलेला शब्द. मग हा शब्द कधी मला माझ्या बोलण्यात वापरता येईल, याची मी वाट पाहाते. आणि तो वापरता आला की मला लहान मुलासारखा आनंद होतो. त्या शब्दासोबत तो कधी ऐकला, कुणाच्या तोंडून, कुठे तेही आठवत राहातं. म्हणून तो आवडीचा.
दिव्य मराठी हे आमचं वर्तमानपत्र नुकतंच सुरू झालं होतं तेव्हाची गोष्ट. मधुरिमा हे आमचं महिलांसाठीचं विशेष साप्ताहिक. त्याची पानं लावत होतो, तर आमचा पेज मेकिंग आर्टिस्ट शांतिनाथ म्हणाला, “मॅडम, वाढावा कुठल्या पानावर घ्यायचा?” वाढावा हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकत होते. त्यामुळे पटकन मी त्याला विचारलं, “वाढावा म्हणजे काय? असं काही मॅटर मी सोडलं नाहीए.” त्यावर त्याने सांगितलं, “वाढावा म्हणजे कंटिन्युएशन.” म्हणजे लेख पहिल्या पानावर सुरू करून ‘पान सहा पाहा...’ असं लिहून उरलेलं मॅटर पान सहावर छापला जातो, त्या पान सहावर वाढून गेलेल्या मॅटरला म्हणायचं वाढावा. मला इतका आवडला तो शब्द की आता माझ्या तोंडून कंटिन्युएशन येतच नाही. आपल्या मराठीतच सापडलेला हा शब्द अगदी योग्य वाटला मला.
वाढावावरून आठवला वाढवण हा शब्द. खास रत्नागिरी जिल्ह्यात केरसुणीसाठी, खरं तर खराट्यासाठी, वापरला जाणारा हा शब्द. खराटा हा केरसुणीचा भाऊ. नारळाच्या झावळीच्या पात्याच्या मधल्या लवचीक रेषेपासून बनलेला. कोकणातल्या मातीच्या घरांमध्ये जमीनही मातीची, त्यावर काही फूलझाडू उपयोगाचा नसतो. खेरीज नारळाची झाडं प्रत्येकाच्या परसात असतातच. आणि खोल्या किंवा पडवीही मोठीच्या मोठी, ती झाडायला लांबच लांब वाढवणच हवी.
मुंबईत मात्र झाडू हा शब्दच बहुतेक सर्व घरांमध्ये वापरला जातो, अमराठीसुद्धा. कारण कामाला येणारी बाई झाडूपोछा करते ना. फार कमी घरात ती केरलादी करते! फक्त मराठीत तो झ आहे झबल्यातला तर हिंदीतला आहे झेंडूमधल्या. केरसुणी किंवा केरसोणी हा शब्दही अनेक मराठी घरांमध्ये वापरला जातो. सातारा/पुणे भागात याला कुंचा म्हणतात. (पण कुंचीशी याचा काहीही संबंध नाही हं, ती वेगळी, लहान बाळाला घालायची.) गोव्यात म्हणतात सारण. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होते या केरसुणीची चक्क लक्ष्मी. त्यामुळेच एरवीही केरसुणीला चुकून जरी पाय लागला तर नमस्कार करण्याची प्रथा आहे ना आपल्याकडे.
***
माउलींची वारी
आषाढी आणि कार्तिकी एकादशी जवळ आली की मन एकदम तीन वर्षांपूर्वीच्या वारीबरोबर चालू लागतं आणि जणू मला म्हणू लागतं, काय माउली, चलायचं ना यंदाही? माउली म्हणजे विठुमाउली, ज्ञानेश्वरमाउली, तुकाराममाउली. माउली म्हणजे आपल्या बरोबरीने चालणारा वारकरी. माउली म्हणजे हवाहवासा चहा देणारा चहावाला. माउली म्हणजे आपल्या गाडीचा चालक. माउली म्हणजे मी, माउली म्हणजे तुम्ही. या माउलीचा उच्चारही माउली असा स्पष्ट नाही करायचा बरं, तो करायचा ऱ्हस्व उपेक्षा लहान, वच्या जवळ जाणारा. शब्दकोषातला अर्थ पाहायचा तर माउली म्हणजे आई. आईच्या रूपात आपल्याकडे केवळ विठ्ठलालाच कल्पिले आहे. कृष्ण किंवा राम यांच्याशी अशी मायेची जवळीक कोणी साधलेली नाही. विठ्ठल जर माउली तर आपण सगळी तिची लेकरं, तिला एकसारखी, कुणी लहान वा मोठं नाही. अत्यंत सहजेतेने समानतेचा भाव निर्माण करणारा हा शब्द. डॉक्टर, इंजिनिअर, गरीब श्रीमंत, शहरी, ग्रामीण आपल्या घरी. पंढरपूरच्या वाटेवर वारकरी म्हणून चालताना सगळे एका पातळीवरचे. (आता यावरून ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतला मदतनीस ‘माउली/सतीश तारे’ आठवला की नाही तुम्हाला?) माउली हा शब्द एरवी आपल्या बोलण्यात सहजपणे येत नाही, आपल्या आईला माउली म्हणणारी कोणी व्यक्ती माझ्या पाहण्यात/ऐकण्यात नाही. आई, अम्मा, माँ, ममा, मम्मी हे आपण नेहमी ऐकतो. पण माउली हा खूप आपुलकी आणि जिव्हाळा दर्शवणारा शब्द का नाही वापरत आपण आपल्या जन्मदात्या आईसाठी?
माउली शब्दाची जशी मजा आहे तशीच वारी या शब्दाचीसुद्धा. एखाद्या देवस्थानाला भेट देणं म्हणजे तीर्थयात्रा, जी शक्यतो आयुष्यात एकदाच होते. पण पंढरपूरची वारी म्हणजे काही तीर्थयात्रा नव्हे, एकदाच करायची. ती दरवर्षी करण्याची प्रथा आहे, किंबहुना माळ घेतली की ती दरवर्षी करायचीच असते. म्हणूनच हा शब्द नियमाने करावयाच्या किंवा कराव्या लागणाऱ्या गोष्टींनाही आपण लागू करतो. एकापेक्षा जास्त वेळा नापास होणाऱ्या विद्यार्थ्याबाबत आपण म्हणतो, त्याच्या वाऱ्या चालल्यात अजून. किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात काम अडकलं असेल तरी म्हणतो, किती वाऱ्या केल्या, अजून काम काही मार्गी लागलेलं नाही.
वारीसारखाच माउलीशी जोडला गेलेला शब्द म्हणजे दिंडी. दिंडी म्हणजे एक मोठा संघटित समूह असतो वारकऱ्यांचा. त्यांचं वारीच्या काळातलं रोजचं वेळापत्रक ठरलेलं असतं, रोजची कामं वाटून दिलेली असतात. सगळं शिस्तीत. दिंडीवरून आठवलं, वाईला आम्ही राहायचो त्या वाड्यात एक दिंडी दरवाजा होता. म्हणजे मुख्य प्रवेशद्वार, जे भलं मोठं आणि जड होतं, त्याचा दिंडी दरवाजा हा एक भाग होता, माणसं यायलाजायला तो पुरेसा असायचा. पण त्याला का तसं नाव पडलं असेल?
***
सांडणे, लवंडणे, पडणे, लागणे
एक अगदी शाळकरी विनोद आहे. एक मुलगा एक दिवस शाळेत जात नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षक विचारतात, ‘काय झालं काल?’ तो म्हणतो, ‘मी पडलो आणि मला लागलं.’ शिक्षक विचारतात, ‘कुठे?’ तर तो म्हणतो, ‘मी पलंगावर पडलो आणि मला झोप लागली.’ दोन्ही क्रियापदं कशी मस्त वळवली आहेत ना यात. शिक्षकांना काळजी की हा कुठेतरी पडला, धडपडला आणि त्याला जखम वगैरे झाली. तर या मुलाचं काही वेगळंच.
महाराष्ट्रात काही भागात, म्हणजे सातारा, नाशिक वगैरे परिसरात, पडण्याला चक्क सांडणं हे क्रियापद वापरलं जातं. म्हणजे एरवी एखादा पदार्थ सांडला, असं आपण म्हणतो. परंतु या भागात एखादा माणूस पडला, धडपडला, तरी तो म्हणतो, काय जोरात सांडलो काल मी. जणू काही मी एक पदार्थ आहे आणि एका डब्यात किंवा पिशवीत भरलेलो होतो, त्यातून खाली सांडलो. कसा काय हा अर्थ प्राप्त झाला असेल ना सांडण्याला?
पडणे म्हणजे झोपणे असाही अर्थ आहे. ‘दुपारचं मी थोडा वेळ पडते बाई, नाहीतर संध्याकाळी अगदी दमायला होतं,’ असं म्हणतात ना बायका. पडणे याला लवंडणे असाही शब्द वापरला जातो हं. काही भागात त्याला आडवे होणे असेही म्हणतात, विशेषकरून दुपारच्या वामकुक्षीला. म्हणजे माहेरी आलेल्या मुलीला आई म्हणते, ‘अगं, जरा आडवी हो, घरी कुठे आराम मिळतोय?’ लवंडणे हा शब्द झोपण्याच्या संदर्भात मी कोणाच्या तोंडून फारसा ऐकलेला नाही पण वाचलेला अनेकदा आहे. हे क्रियापद, झोपण्याच्या अर्थाने नव्हे तर पडण्याच्या अर्थाने, जसे माणसांना लागू होते तसेच निर्जीव वस्तूंनाही. खासकरून तेलाची बुधली लवंडली असं म्हटलं जातं.
लागणे या क्रियापदाचे तर अनेक अर्थ आहेत. दही लागतं, एखादं वाक्य मनाला लागतं, दुखापत होते म्हणजे पण लागतं, आवाज छान लागतो, बी पेरल्यावर रोप लागतं, टीव्हीवर कार्यक्रम लागतो, भाजी चविष्ट लागते, काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी करावं लागतं, कोण मोठी राणी लागून गेलीय ती, भाजी पातेल्याच्या तळाशी लागते, उचकी लागते, कोणीतरी आपला मामा लागतो, ऐन वेळी मोबाइल/फोन लागत नाही, फलाटावर गाडी लागते. आणखीही उपयोग असतील, आठवावे लागतील मला! तुम्हाला माहीत असले तर कळवाल ना?
***
च्यायला
अंहं, एकदम दचकू नका शीर्षक वाचून. मी कशावर वा कोणावरही रागवून हे सदर लिहायला घेतलं नाहीए. हाही माझा एक आवडीचा शब्द आहे एवढंच. मी तो पहिल्यांदा ऐकला केव्हा मला आठवत नाही, शाळेत असेन बहुधा तेव्हा. मला तो प्रचंड आवडला होता हे नक्की आठवतं. ज्या प्रकारे तो समोरच्याच्या तोंडावर फेकता यायचा, ज्या प्रकारे मनातला राग तो शब्द उच्चारताना व्यक्त होतो, त्याचं मला खूप आकर्षण वाटलं होतं. पण त्या वयात तो वापरणं अशक्य होतं, आईबाबांनी एक कानफटात ठेवून दिली असती माझ्या तोंडून तो निघाला असता तर. तेव्हा तो चक्क असभ्य मानला जाई, मुलींनी वापरणं म्हणजे तर ‘स्ट्रिक्टली नो नो.’ त्यामुळे मला वाटतं, कॉलेजला गेल्यावर (आपण मोठे झालो आहोत आणि असे निषिद्ध शब्द वापरायला आता कोण अडवणार, असं वाटायला लागतं ना त्या वयात!) मी कधीतरी च्यायला म्हणायला लागले. माझ्या (माझ्यासारख्याच) मध्यमवर्गीय मराठी मैत्रिणी ते ऐकून चकित झाल्या होत्या. एकीला ते अजिबात आवडलं नव्हतं तर एकदोघींना थोडंसं कौतुक वाटल्याचं अंधुक आठवतंय. मग हळुहळू तो शब्द वापरण्याची क्रेझ डोक्यातून गेली, तो काहीसा सरावाचा झाला असावा. नंतर काही वर्षांनी तर चक्क हिंदी मराठी चित्रपटांतल्या गाण्यांमध्ये तो सर्रास वापरला जाऊ लागला आणि तो म्हणण्यातली मजा निघून गेली. जोपर्यंत तो निषिद्ध होता, चोरीछुपे वापरायचा शब्द होता, तोवरच ती होती, असं आता वाटतंय. ‘च्यायला’सारखाच आणखी ‘अडल्ट’ शब्द होता साला. तोही मला आवडायचा. पण माझी ही आवड तिथपर्यंतच थांबली नशिबाने. नाहीतर माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सोडून गेल्या असत्या नक्की.
इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी करताना इंग्रजी निषिद्ध शब्द कानावर येऊ लागले पण ते काही माझ्या तोंडात रुळले नाहीत. एक मात्र मी त्याआधीपासून वापरत होते, अजूनही येतो बऱ्याचदा. तो म्हणजे ओ शिट् किंवा शिट्. मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत असताना आल्विन फर्नांडिस हे ज्येष्ठ पत्रकार आम्हाला वार्तांकन शिकवायचे. ते एकदा म्हणाले, ‘मी माझ्या मुलाला रागावलो शिट् म्हणतो नेहमी म्हणून. तर तो ओ फिश म्हणू लागलाय. दोन्हीला वास तर घाणच येतो ना!’ त्यामुळे असेल कदाचित मी फिशकडे नाही वळले. शिट्चा एक भाऊ होता शक्स. त्याचा अर्थ मला माहीत नाही पण तो शिट्एवढा वाईट नाही वाटायचा, हे नक्की.
आता तर तरुण पिढीसाठी निषिद्ध असं काही राहिलंच नाहीए. म्हणूनच आपल्या ‘त्या’ शब्दांचं कौतुक, हो की नाही?
***
इंग्लिश की मराठी की मिंग्लिश?
एक लेख आला होता प्रसिद्धीसाठी. त्यात लिहिलं होतं, शाळांच्या फिया हल्ली खूप वाढल्यात. फिया हा शब्द मला खूप गमतीचा वाटला. फीचं अनेकवचन फिया. एका इंग्रजी शब्दाचे मराठीकरण, सर्वांना कळेल असे. असे कितीतरी शब्द आपण उपयोगात आणत असतो ना. इंग्रजांची भाषा आपण भारतीयांनी जेवढी आपलीशी केली, तेवढी आणखी कोणी केली नसेल. त्यांना आपण थेट आपल्या भाषांचे व्याकरणाचे नियम लावतो आणि बिनधास्त वापरतो. ऍ आणि ऑ ही मुळाक्षरं मराठीत आली ती इंग्रजीच्या वाढत्या प्रभावानंतरच. बँक, डॉक्टर, ऑफिस, लॉबी, कॉट, कॅमेरा, लॅपटॉप, इत्यादि शब्द जसजसे अधिकाधिक वापरात आले तसे ही मुळाक्षरंच मानली पाहिजेत हा विचार रूढ झाला. (कॉटची आपण खाट केली की खाटेची सायबाने कॉट केली बरे?) तसे होण्यापूर्वीची काही देवनागरी लिखाणाची सॉफ्टवेअर पाहिली तर त्यात ऍ आणि ऑ लिहिताच येत नाही, असे लक्षात येते. हिंदी भाषकांनी याचं वेगळंच रूप करून टाकलंय. ते तर म्हणतात बैंक, कैमेरा आणि डाक्टर, आफिस, वगैरे. (अमेरिकन चित्रपट पाहताना त्यातले संवाद नीट ऐकले तर लक्षात येते की तेही डाक्टर आणि आफिसच म्हणतात. तेवढेच शब्द आपल्याला कळतात, बाकीचे संवाद सबटायटल्समुळेच लक्षात येतात बहुतेक प्रेक्षकांच्या.) तर गुजराती जनता त्याचे बेंक, केमेरा, डोक्टर, ओफिस, वगैरे करून टाकते. विशेषकरून उत्तर प्रदेशात वापरले जाणारे इस्कूल, इस्माइल (इस्माइल हे नाव नव्हे, तर स्माइल), वगैरे तर वेगळेच प्रकार. (पण इस्तिफा हिंदी/उर्दू असूनही त्यातला नाही. आणि आपल्या जीएंची इस्किलार तर नक्कीच नाही!)
किती बुकं शिकलास, चहा टेबलावर ठेव, तिकिटी किती महागल्यात, इत्यादि वाक्प्रयोग आपण किती सहजतेने करतो. दोन भाषांची सरमिसळ इतक्या प्रमाणात इतर कोणत्या भाषांमध्ये होते का ते माहीत नाही, कदाचित इतर भारतीय भाषांमध्ये होतही असेल. पण आपण मराठीजन मात्र आपलं संभाषणकौशल्य या अशा शब्दांनी/वाक्प्रयोगांनी वाढवतो, हे निश्चित. क्लिकक्लिकाट, लव्हेरिया, वुमनिया, असे शब्दही याच वर्गात मोडणारे. काय म्हणायचंय ते नीट समजण्यासाठी अशा हायब्रीड शब्दांची मदत घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? माझे मोठे काका म्हणतात तसं, समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग!

Comments
Post a Comment