आपलेच दात आपलेच ओठ

डाॅ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर लिहिलेली ही कव्हर स्टोरी. ३० आॅगस्ट २०१३ रोजी मधुरिमामध्ये प्रसिद्ध झाली होती.

मासिक पाळीच्या दिवसांत स्वयंपाकघरात जायचं नाही, मुलगा होत नाही म्हणून कोणा बाबाचा अंगारा खायचा, कोणी तरी सांगितलं म्हणून काळे कपडे घालायचे नाहीत, नव-याचं भलं व्हावं म्हणून झेपत नसूनही उपास करायचे, आणखी कोणाचं भलं व्हावं म्हणून अनवाणी उन्हातान्हाचं फिरायचं, वास्तुशास्त्राच्या नावाखाली खूप गैरसोयीची असूनही स्वयंपाकघराची रचना बदलायची, प्रत्यक्ष बाळ जन्मायच्या आधी काहीही तयारी करून ठेवायची नाही, परंतु गर्भसंस्काराच्या क्लासला आवर्जून जायचं... एक ना दोन. अंधश्रद्धांना बळी पडणा-या आपण बायकाच असतो बहुतेक वेळा. काळे कपडे न घालण्याने जिवावर बेतत नाही काही, पण उपास करून तब्येतीची पार वाट लागतेच ना? मुलगा होत नाही हा त्या बाईचा दोष, ही अंधश्रद्धा त्या बाईच्याच जिवावर उठते ना? तिला संसारातून, आयुष्यातूनही उठवते ना?

पण या सगळ्यावर विश्वास ठेवून तसं वागणा-या, लेकी-सुनांना तसं वागायला लावणा-याही आपणच असतो, हो ना?
यातल्या अनेक प्रथा झालं तर काही चांगलंच होईल अशा श्रद्धेतून आल्या आहेत. उदा. बाहेर/परीक्षेला जाताना हातावर दही ठेवणे, घराच्या उंब-यावर नाल ठोकणे, दारावर काळी बाहुली टांगणे, घराबाहेर पडताना उजवा पाय प्रथम बाहेर ठेवणे, वारानुसार रंगांचे कपडे घालणे, राहूकाल, अमावास्या, पौर्णिमा पाहून कितीही महत्त्वाचे असले तरी नवीन कामांना सुरुवात करणे किंवा न करणे, पौष महिना, पितृपक्ष या काळाला चक्क अशुभ मानणे (म्हणजे दर वर्षातला दीड महिना फक्त), इत्यादी. पण जेव्हा दही न खाता बाहेर पडलेय म्हणजे आजची परीक्षा चांगली जाणार नाही, असे वाटते नि खरेच पेपरात बोंब लागते (कारण अभ्यास केलेला नसतो). केस कितीही खराब झाले असले तरी सोमवार असल्याने न धुतल्याने त्यांची हालत खराब होते. अशा परिस्थितीत त्या (अंध)श्रद्धा कशा नि कधी होऊन जातात, ते आपल्यालाही कळत नाही.

मुलगी/सून गरोदर असेल तेव्हा तर या श्रद्धा वेगळंच रूप धारण करतात. बहुतांश कुटुंबांमध्ये बाळाचा जन्म होईपर्यंत बाळाला (उदा. दुपटी वा लंगोट वा पाळणा) आणि नवीन आईला लागणा-या कोणत्याही वस्तूंची (उदा. फीडिंग गाउन) खरेदी केली जात नाही. यामागे सरळसरळ अंधश्रद्धाच आहे ना? पण आपल्याला बाळाच्या बाबतीत कसलाच धोका पत्करायचा नसतो. आणि मग कोणाला तरी सांगून हे आणवलं जातं. ते चांगलं, आपल्याला आवडणारं, रुचणारं नसलं तरी पटवून घ्यावं लागतं. अगदी कमी घरांमध्ये बाळाची आणि बाळंतिणीची जय्यत तयारी आधी, वेळ असतो तेव्हा, करून ठेवलेली असते. यातलं काय बरोबर वाटतं? आधी मनासारखी तयारी करून शेवटच्या क्षणीची धावपळ आणि ताणतणाव टाळणं की कोणा मैत्रिणीला/मावशीला ऐन वेळी खरेदीसाठी पिटाळणं?

आपल्या हे लक्षातच येत नाही की आपलं निरीक्षण करतच मुलं मोठी होत असतात. पुढच्या पिढीपर्यंत आपण कोणते विश्वास, रूढी, परंपरा, श्रद्धा पोहोचवतोय, याचा आपण मोकळ्या मनाने विचार करतो का कधी? एकीकडे मुलांनी डॉक्टर/इंजिनिअर व्हावं म्हणून त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला लावतो आणि दुसरीकडे चांगले गुण मिळावेत म्हणून पूजा घालतो, नवस बोलतो, सोमवार करतो, अंगठ्या घालतो. लग्न ठरावं म्हणून आधीच अ‍ॅनिमिक असलेल्या मुलीला कोणती कोणती व्रतं करायला लावतो. श्रावण आहे म्हणून शंकराच्या पिंडीवर दूध ओततो. तलावाची वाट लागतेय हे दिसत असूनही निव्वळ परंपरा म्हणून त्या तलावात गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन करत राहतो. सर्वपित्री अमावास्येला चांगलाचुंगला स्वयंपाक करून ताटभर पदार्थ कावळ्यासाठी ठेवून वाया घालवतो. कोणाची तरी प्रकृती सुधारण्यासाठी उलटं चालत, अनवाणी मंदिरात जातो आणि स्वत:ची प्रकृती बिघडवून घेतो. आणि हे पाहून मुलांनी शाळेत विज्ञान/पर्यावरण विषय शिकल्यानंतर काही प्रश्न विचारलेच, तर त्यांना ‘आपल्याकडे असंच असतं, करावं लागतं नाही तर काही तरी वाईट होतं,’ असं सांगून गप्प करतो. सर्वच धर्मांमध्ये अशा प्रकारच्या चालीरीती, परंपरा, रूढी आहेत, ज्या विज्ञानाच्या विरुद्ध आहेतच, परंतु विशेषकरून स्त्रियांचं आयुष्य अधिक कठीण आणि असह्य करणा-या आहेत.

अनेक घरांमध्ये अजूनही महत्त्वाच्या कार्याप्रसंगी विधवा आजी किंवा काकी किंवा आईला सन्मानाने वागवणं दूरच, तिचा अपमान होईल असं वागतात. संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला विधवा मैत्रीण किंवा मावशी/काकीला बोलावतच नाहीत. जिला काही कारणाने मूल नाही तिच्याशीही वेगळं वागून तिला विनाकारण दुखावलं जातं.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा गेल्या आठवड्यात दुर्दैवी आणि अमानुष खून झाल्यानंतर त्यावर घराघरात तावातावाने चर्चा झडल्या. सरकार, पोलिस, राजकारणी सर्वांवर मनसोक्त तोंडसुख घेण्यात आलं. पण ज्या डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा/कृतीचा आपल्याला अचानक पुळका आलेला असतो, त्यांच्याशी आपलं घरातलं आणि बाहेरचं वागणं आपण कधी मापून पाहिलेलंच नसतं. छोट्या छोट्या, वरकरणी निरुपद्रवी श्रद्धा मनात बाळगणारेच हळूहळू नकळत अंधश्रद्धेच्या वाटेने चालू लागतात आणि या श्रद्धा म्हणजे जीवनशैली बनून जाते. त्यांचा अंमल स्वत:च्या वागण्यापर्यंत मर्यादित न राहता इतरांच्या वागण्यावर, व्यक्तिस्वातंत्र्यावर होऊ लागतो. आणि आपण एका समूहाचा भाग बनतो, ज्याची झुंड तयार होते, त्याचीच नशा येऊ लागते. मग आपल्या वागण्यावर कुणाचाच अंकुश राहत नाही, आपला स्वत:चासुद्धा.

Comments