उपास करा, पण जपून!

मागच्या मंगळवारची गोष्ट. ट्रेनमध्ये फिरून भाजी विकणार्‍या मावशींच्या तोंडूनही तक्रार ऐकली. ‘दमले गं बाय, पाऊल उचलवत नाहीये. सकाळपास्नं काही खाल्लं नाहीये, उपास आहे ना.’

दुसर्‍या दिवशी सकाळी ट्रेनमध्ये शेजारची पन्नाशीतली बाई दुसरीला सांगत होती, ‘इतकं थकल्यासारखं वाटतंय आज खरं तर, दोन दिवस उपास झाले ना. श्रावणी सोमवार आणि अंगारकी. कुठे जाऊ नये असं वाटत होतं, पण निघावंच लागलं बाहेर.’

मग एका आजींचं बोलणं आठवलं, ‘कोकिळा व्रत केलंय यंदा, १८ वर्षांनी आलंय ते. महिन्याभरात दोन-तीनदा तरी पूर्ण उपास घडतोच, कोकिळेचा आवाज ऐकूच येत नाही.’

पुढच्या बुधवारी आहेत हरितालिका. म्हणजे पुन्हा उपास हवाच.

एक वेळ श्रावणात वा चातुर्मासात कांदा- लसूण वर्ज्य केलेलं परवडलं, पण हे दिवसभराचे उपास नको असं सांगावंसं वाटतं ना अशा बायकांना?

घरातली कामंधामं, नोकरी, जबाबदार्‍या, सांभाळायच्या. त्यात यंदाचा दुष्काळ, म्हणजे पाण्याचं टेन्शन डोक्यावर. मग आपलं, कुटुंबाचं आरोग्य सांभाळायचं की काल्पनिक फायद्यासाठी उपास करून तब्येतीचे बारा वाजवायचे?

वटपौर्णिमा, मंगळागौर, हरितालिका, कोकिळा व्रत, करवा चौथ वगैरे अखंड सौभाग्य, चांगला पती, विवाह, या फायद्यांसाठी करायचे उपास. अखंड सौभाग्य म्हणजे पतीच्या आधी आपल्याला मरण यावं ही इच्छा. परंतु, खासगीत बोलताना बहुतेक बायका म्हणतात, ‘माझ्या मागे यांचं कसं होणार, याची काळजी वाटते.’ आपण आजूबाजूला पाहतच असतो, साधं निवृत्त झाल्यानंतर पुरुषांना घरात सामावून जाणं कठीण होतं. ज्यांची बायको आधी गेलीय, त्यांच्यापैकी फार कमी पुरुष परिस्थितीशी जुळवून घेऊन राहू शकतात. ते बायकोवर अनेक गोष्टींसाठी अवलंबून असतात. त्याउलट नवरा गेल्यानंतरही बायका अनेक गोष्टींत, स्वयंपाकघरात, नातवंडांत, मैत्रिणींमध्ये, वाचनात, अध्यात्मात किंवा परवडत असेल तर भटकंतीत मन रमवताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे, त्यात बदल व्हायला अनेक वर्षं जावी लागतील, हेही दिसतंय. तरीही सौभाग्याची ही आस का? तीही तरुण किंवा मध्यमवयीन बायांमध्ये? सौभाग्याचा अर्थ काय आहे त्यांच्या दृष्टीने? (सौभाग्याचा शब्दकोशातला अर्थ आहे चांगलं नशीब. मग चांगलं नशीब पुरुषांना नको असतं का, हा प्रश्न विचारलाय का कोणी?) की घरात पद्धत आहे उपासाची, आई/सासू सांगते म्हणून, कोणी तरी नवस बोललाय म्हणून या बाया आपलं आरोग्य पणाला लावतायत?

नोकरी करणार्‍या, रोटी-कपडा-मकानसाठी नवर्‍यावर अवलंबून नसणार्‍या बाया आपल्या तब्येतीचा बळी देऊन ही व्रतं का करतात? बायकांना नवरा हवाच आहे, तो खूप वर्षं निरोगी असायला हवा आहे, यावर दुमत नाही. नवर्‍यांनाही बायको हवीच आहे, यावरही एकमत आहे. पण त्यासाठी उपास का? मला अजिबात पटत नाही, पण घरी पद्धत आहे म्हणून मी उपास करते, असं सांगणार्‍या स्त्रिया कमीच आढळतात. म्हणजेच अजूनही बायकांचा उपास करून चांगला नवरा मिळतो, अखंड साैभाग्य मिळतं, मुलांना चांगली नोकरी लागते, आदी गोष्टींवर विश्वास आहे, असं मानायला वाव आहे.

उपास म्हणजे काय याचा ऊहापोह अनेक डाॅक्टरांच्या लेखांमधून सातत्याने होत असतो. पोटाला विश्रांती हवी म्हणून उपासाची पद्धत रूढ झाली असावी, हेही आपण वाचतो. परंतु, ज्या उपासाने थकल्यासारखं वाटतं, घराबाहेर पडावंसं वाटत नाही, तो उपास म्हणजे पोटाला विश्रांती नव्हे. तो आहे पाेटावर अन्याय. आपल्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष, परंतु घरच्यांना मात्र भरपूर खाऊ घालायचं. मग त्यांच्या पोटाला नको का विश्रांती? बटाटे, साबुदाणा, शेंगदाणे यांनी पोटाला विश्रांती वगैरे काही मिळत नाही, असं सगळे डाॅक्टर सांगतात. योग्य उपास करणार्‍या व्यक्तीला ताजंतवानं हलकं वाटतं. अशा किती व्यक्ती तुम्हाला ठाऊक आहेत?

एकीकडे महिला कुठल्या कुठे पोहोचल्यात याची उदाहरणं द्यायची मुलीला, जेणेकरून तिच्यात महत्त्वाकांक्षा निर्माण होईल, ती आयुष्यात काही तरी करेल म्हणून. आणि दुसरीकडे, आपण मात्र व्रतवैकल्यं, उपासतापास यांच्या पारंपरिक चक्रात अडकून पडायचं. काय संदेश जातोय यातून मुलांना?

मुलांना वेगवेगळ्या क्लासला घालायचं; एखादा तरी खेळ खेळायला लावायचा; त्यांची नीट झोप होतेय ना याची काळजी घ्यायची, सुकामेवा, फळं, दहीदूध, पौष्टिक अन्नाचे डबे भरून द्यायचे त्यांना. आणि परीक्षेच्या दिवसांत संकष्टी आली तर उपास करायला लावायचा किंवा स्वत: करायचा. याची संगती कशी लावत असतील मुलं? या सगळ्या कृत्यांत भक्तिभाव किती आणि परंपरांचं पालन करण्याची जबरदस्ती किती? कोणताही विचार न करता, कार्यकारणभाव विचारात न घेता, मागील पानावरून पुढे चालू या वृत्तीतून हे केलं जातंय. हल्ली तर या सगळ्याची एक लाट असते. अमुक उपास, तमुक व्रत, अमुक पूजा, तमुक रंग. मैत्रिणी करतात, व्हाॅट्सअ‍ॅपवरून फोटो शेअर करतात, मग आपण तरी मागे कसं राहायचं या विचारातूनही व्रतं केली जातात, असं अनुभवायला मिळतंय.

एकीकडे आपण आरोग्यम् धनसंपदा म्हणतो, आणि दुसरीकडे तीच धनसंपदा उधळून देतो अविचाराने.
म्हणूनच व्रत करा, पण नीट खाऊनपिऊन. तब्येतीला जपा. घराबाहेरचं जग पाहा, संवेदना जागृत ठेवा. महादेवावर दूध सोडाच, पाणीही घालणं परवडणार नाहीये येत्या काळात. तेव्हा विचार करून पुढचं पाऊल टाका, एवढंच सांगणं.

जाता जाता : गौरीगणपतीच्या निमित्ताने पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घेऊन शरीरावर आणखी अत्याचार होण्यापासून थांबवायचा उपाय आहे का कोणाकडे? असल्यास नक्की कळवा.

Comments