खवय्येगिरी

प्रत्येक उत्सवाशी कोणत्या ना कोणत्या पदार्थाचं नातं जोडलेलं असतं. भारतातच नव्हे तर जगभरात. सर्व धर्मांमध्ये. आपला जसा दिवाळीचा फराळ तसा नाताळचा केक आणि पुडिंग. ईदचा शीरकुर्मा. थँक्सगिविंगची टर्की. गणपती म्हटलं की, आठवतात मोदक. काल अनेकांच्या घरी झालेच असतील मोदक, उकडीचे किंवा तळलेले. तशी आज ऋषिपंचमी म्हणजे ऋषीची भाजीही अनेक घरांमध्ये आवर्जून केली जाते. या मोसमात मिळणाऱ्या सगळ्या भाज्यांचं मिश्रण इतक्या चविष्ट आणि रुचकर स्वरूपात या भाजीच्या निमित्ताने खायला मिळतं, की यंव रे यंव. तसंच गौरी वा महालक्ष्म्यांच्या जेवणाला पुरणपोळी असणारच. कोकणात करतात घावन घाटलं. आणि सोळा भाज्या, वगैरे. अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या वेळी केली जाणारी वाटली डाळ. फक्त सर्वपित्री अमावास्येला केली जाणारी तांदळाची खीर. नवरात्रात उत्तरेकडे चण्याची उसळ, पुऱ्या व शिरा असा मेनू असतो. कोजागिरीचं मसाला दूध आणि भेळ. तरी दिवाळीपर्यंत आपण अजून पोहोचलोच नाहीये, त्या पदार्थांना तर तोड नाही. नुसती नावं वाचून तोंडाला पाणी सुटतं. मग प्रत्यक्ष खायला मिळणं किती मोलाचं. खवय्यांसाठी तर सण म्हणजे पर्वणीच जणू. ते या पदार्थांसाठी या सणांची वाट पाहात असतात. कारण त्यांना हे माहीत आहे की, ऋषीची भाजी एरवी मुद्दाम कोणी करणार नाही. किंवा खास श्राद्धपक्षाला होणारी आमसुलाची चटणी एरवी करत नाहीत कोणीच.
का बरं? माहीत नाही.

आंब्याची किंवा कैरीची डाळ चैत्रातच होते, एरवी नाही. का बरं? माहीत नाही. कैऱ्या तर मिळतात वर्षभर. किंवा नागपंचमीला होणारी दिंडं, दिव्याच्या अवसेला होणारे कणकेचे दिवे. 
एरवी का होत नाहीत. माहीत नाही. दिवे तर किती पौष्टिक असतात, ना तळलेले, ना साखरेचे. तरीही...

पुरणपोळीच एक आहे जी अनेक सणांना केली जाते. किंबहुना कोकण वगळता इतर प्रांतात प्रत्येक सणाला पुरणपोळी असतेच. जसं दाक्षिणात्य लोकांच्या घरी सणाच्या दिवशी इडली-सांबार केलंच जातं. अगदी दिवाळीलाही फराळासोबत इडली असतेच. शहरांमध्ये मात्र हे पदार्थ करण्याचं प्रमाण फारच कमी होत चाललंय. त्याची कारणं अनेक आहेत. पण ही खाऊसंस्कृती टिकली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्यांना हे पदार्थ माहीत झाले पाहिजेत, हे नक्की ना?

Comments