ज्येष्ठांची काळजी

मुंबईतली माझी एक जुनी मैत्रीण रुचा आता दिल्लीत असते. आईवडील सांताक्रूझमध्ये राहात होते ती इमारत पुनर्विकासासाठी पाडण्यात आली. त्याच सुमाराला तिची आई गेली. भाड्याच्या घरात एकट्या वडिलांना कसं ठेवायचं म्हणून मग तिने त्यांना नेरुळला डिग्निटी फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात ठेवलं. मला वाटतं दोनेक वर्षं ते तिथे होते. या सप्टेंबरच्या सुरुवातीला कर्करोगाचं निदान झालं नि आठदहा दिवसांत ते गेले. रुचाची बहीण अमेरिकेतून येऊन त्यांना भेटून गेली. दोन्ही मुली शेवटी जवळ होत्या. रुचा डिग्निटीकडून वडिलांना बरं नाहीये असं सांगणारा फोन आल्यावर तातडीने मुंबईत आली. विमानतळावरून पनवेलला रुग्णालयात पोचेपर्यंत तिच्या मनात इतके विचार फेर धरून होते. त्यांना नक्की काय झालंय, बरे होतील का, पुन्हा नेरुळला जातील का, की दिल्लीला न्यावं लागेल, वगैरे वगैरे. तिची त्यांना न्यायची अर्थातच तयारी होती. डिग्निटीतही ते त्यांच्या मनाने, चाॅइसनुसार गेले होते आणि तिथे आनंदात होते.

रुचा असेल पन्नाशीच्या जवळ आलेली. आईवडील ऐंशीच्या घरातले. आज आजूबाजूला पाहातो तेव्हा असे कितीतरी मित्रमैत्रिणी/शेजारी दिसतात, वृद्ध आईवडील वा सासूसासऱ्यांची काळजी घेणारे. आयुष्यमान वाढल्यामुळे पंचाहत्तरी पार केलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला ठाऊक असतात, तशी तब्येत ठीकठाक असते, थोडाफार पैसाही असतो गाठीला. पण केव्हा ना केव्हा आजारपण गाठतंच. अगदी रुग्णालयात दाखल करायची वेळ नाही आली तरी घरच्या घरी त्यांची सेवा करावी लागते, औषधं वेळच्या वेळी द्यावी लागतात, पथ्याचं हलकं कमी मसालेदार खाणं वेळेवारी तयार ठेवावं लागतं. खेरीज त्यांचे मूड सांभाळणं हा वेगळाच मुद्दा. त्यातून पार्किन्सन वा अल्झायमरचे रुग्ण असतील तर त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनी फारच कसरत असते. नोकरी सांभाळून वृद्धांची काळजी घेणं फारच कठीण होऊन बसतं, नकोसं वाटू लागतं. आणि या नकोसं वाटण्याबद्दल प्रचंड अपराधगंडही घेरू शकतो.

माझ्या एका काकांना पार्किन्सन आहे. वय ७५च्या पुढे. काकू सत्तरीत. त्यांना दिवसभरात एकूण पंधरा की वीस गोळ्या द्यायच्या असतात, वेगवेगळ्या वेळेला. एखादी अर्धी, एखादी पाव तर एखादी पूर्ण. ते सगळं वेळापत्रक लक्षात ठेवून तशा गोळ्या त्यांच्या पुढ्यात ठेवण्याचं काम अर्थात काकूचं. एक तास सलग काही जात नसेल ज्यात तिला गोळ्यांचा विचार डोक्यातून काढता येतो. दोन्ही मुलं नोकरी करतात, एरवीच्या वेळेत घरची कामं असतात, कारण काकूला घराबाहेर पडणंच शक्य नसतं.

एका मैत्रिणीने सहासात वर्षं पार्किन्सन झालेल्या आईची सेवा केली. अक्षरश: तिला कुशीत घेऊन जोजवलं, खाऊ घातलं, औषधपाणी केलं. रात्रीचा दीड ही तिची झोपायची रोजची वेळ. पहाटे साडेचारला उठून ती सहा वाजता घराबाहेर पडते, लेक्चरसाठी. त्याच सुमाराला सासऱ्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांचंही जवळपास वर्षभर तिने केलं. आई गेली, पाठोपाठ सासरे गेले. आता ती वडील आणि सासू या काहीशा आॅड काॅम्बिनेशनच्या दोघांना एका घरात सांभाळतेय. या सगळ्या अॅडल्ट केअरटेकिंगमध्ये तिचा नोकरीव्यतिरिक्तचा सगळा वेळ जातो. लग्नाला १८।१९ वर्षं झालीत, तिला मूल होण्याची शक्यता आता नाहीच उरलेली. या चार बाळांना सांभाळणं हेच तिचं ध्येय होतं. तिचं करिअर ती अतिशय निष्ठेने जोपासते, कारण या कौटुंबीक झमेल्यापलिकडे जाऊन तीच तिची ओळख आहे, जी तिला जपायची आहे.

दुसरी एक मैत्रीण, साठी पार केलेली, वडील नव्वदीपार. आई थोडी लहान. म्हणजे घरात तिन्ही ज्येष्ठ नागरिक. मोठ्यांची तब्येत सांभाळता सांभाळता तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत नसेलच असं कशावरून? तिची मुलगी लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहते. ती तरी किती लक्ष देणार इकडे? एका भावाने आईवडील व सासू अशा तिघांचा सांभाळ करता यावा म्हणून नोकरी सोडली आहे. त्याची बायको नोकरी करते, हा जमेचा भाग. आणि त्याच्या डोक्यावर एका पैशाचंही कर्ज नाही, हाही. (हे फारच दुर्मीळ!) नोकरी सोडल्यापासून त्याची स्वत:चीही प्रकृती सुधारली आहे.

मी आणि माझे अनेक मित्रमैत्रिणी आता अशा वयात आलोत, जिथे वृद्ध आईवडिलांची/सासूसासऱ्यांची काळजी हा रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. मैत्रिणी तर स्वत: मेनाेपाॅजच्या वयात, त्यामुळे प्रकृती जरा अधिकच नाजूक झालेली. अनेकींची मुलं काॅलेज वा नोकरीसाठी घर सोडून दुसऱ्या शहरात राहणारी. त्याचा वेगळा ताण. स्वत:ची नोकरी आहेच, या वयात येईपर्यंत काहीशा वरिष्ठ पदावर काम करत असल्यानं कामाची जबाबदारीही वाढलेली. सर्वच क्षेत्रांत असलेली जीवघेणी स्पर्धा. त्यामुळेही त्या अस्वस्थ. घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या फक्त तब्येतीच्याच समस्या असतात असं नाही, त्यांना कंटाळा येतो, वेळ जात नाही, बोलायला कोणी नसतं, घरी दुर्लक्ष होतंय आपल्याकडे अशी खरीखोटी भावना मनात असते. या सगळ्याचा परिपाक जरा अनिष्ट व अरुचीकारकच.

वृद्ध माणसांच्या सोबतीला चांगली माणसं मिळत नाहीत, स्वयंपाकाला वा वरकामाला बाया मिळत नाहीत, टिकत नाहीत. रजा तरी किती घेणार? डिग्निटीसारखे वृद्धाश्रम मोजकेच. शिवाय तिथे जागाही मोजक्याच. पुण्यातल्या अथश्रीसारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत्वाने उभारलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये घर घेणं सर्वांनाच परवडणारं नाही. मग यावर उपाय काय?

मध्यंतरी The Guardianमध्ये एक लेख वाचला. एका वेबसाइटने वाचकांना आवाहन केलं, आसपास राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ठरावीक दिवसांनी आपल्या घरी गप्पा मारायला बोलवायचं किंवा त्यांच्या घरी गप्पा मारायला जायचं. अशा पाचसहा जणांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते. यामुळे केवळ वृद्धांचाच वेळ चांगला गेला असं नाही, तर तरुणांनाही त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, आपापल्या अाजीआजोबांना भेटल्याचा नव्याने अनुभव मिळाला, असं कायकाय त्या लेखात होतं. असं आपल्याकडेही करायला हवं असं प्रकर्षाने वाटलं वाचल्यावर.

माझ्या मावशा, मामा, माम्या असा बराच ज्येष्ठ नागरिक परिवार आहे. सगळेजण फोनवरून एकमेकांशी रोजच्या संपर्कात असतात. आम्हा मुलांना कधीतरी वाटतं, या सगळ्यांसाठी एक घर घेऊन द्यावं, कामाला दोन माणसं ठेवावी. एकत्र राहण्याची मजा त्यांनाही पुन्हा अनुभवता येईल आणि एकमेकांची काळजीही घेतील म्हणजे. पण ते प्रत्यक्षात आणणं कठीणच की.

एक लक्षात घ्यायला हवं की, आपल्या मुलामुलींनी आपल्याला वृद्धापकाळात, कठीण काळात सांभाळायला हवं, म्हातारपणची काठी वगैरे, ही माझ्या आधीच्या पिढीची अपेक्षाच असते. परंतु, माझी वा माझ्या समकालीन मित्रमैत्रिणींची ती तशी आहे का? बहुधा नाही. आम्हाला एक किंवा दोनच मुलं. एकच मुलगी असेल तर अनेकदा तिचे आईवडील तिच्या घराजवळ घर घेऊन राहतात, किंवा शक्य असेल तर तिच्याच सोबत. मुलगा असेल तरी हेच. अनेक घरांमध्ये आता दोन वृद्ध जोडपी - एकमेकांचे व्याही विहीण - आणि मुलगा/सून असं एकत्र कुटुंबही राहात असतं. परंतु, अनेकांची अशी अपेक्षा नसतेही की, मुलीने त्यांचा सांभाळ करावा. उलट, तिला तिचं जगू दे, आम्ही आमचं पाहू असं त्यांना वाटत असतं. भावंडं किंवा मैत्रिणींसोबत आयुष्याची संध्याकाळ एकत्र घालवायला त्यांना जास्त आवडणार असतं. पण त्यावर प्रॅक्टिकल उत्तरं शोधायला आत्ताच सुरुवात करायला हवीय.

असं म्हणतात की, आई किंवा वडील गेल्यानंतर माणसाला एकदम जाणीव होते ती पुढचा नंबर आपला याची. तसं या वृद्धांकडे पाहताना आपलं आणखी वीसेक वर्षांनी काय होणार, याचं चित्र डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केला तर गुंगीच येते. एकतर ही आधीची पिढी टणक, काटक. हौस, स्टॅमिना, उत्साह या सगळ्याच बाबतीत आम्ही त्यांच्या निम्म्यानेही नसू. म्हणजे साठीतच आमची ही परावलंबी अवस्था येणार का? शक्यता अधिक आहे.

तरी हे चित्र प्रामुख्याने मध्यम व उच्च मध्यमवर्गीय समाजातलं. (ज्यांची मुलं परदेशात स्थायिक आहेत, त्यांचे प्रश्न अधिकच वेगळे. त्याबद्दल नंतर कधीतरी. ) निम्न आर्थिक स्तरात काय होत असेल याची कल्पना आपण करू शकतो. तिथे मुख्य प्रश्न असतो पैशाचा. सगळं ठीकठाक सुरू असतं तेव्हा काही नाही पण तब्येत बिघडली की मोठंच संकट. सरकारी रुग्णालयांमध्ये जायचं तरी पैसे बऱ्यापैकी लागतात, तिथे साध्या तपासण्यांनाही खूप वेळ लागतो. म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकासोबत जाणाऱ्या व्यक्तीला त्या दिवशी कामावर जाता येत नाही. आमच्या आॅफिसात हाउसकीपिंग विभागात काम करणाऱ्या मुलीच्या आईची पाठीच्या मणक्याची मुंबईतल्या एका मोठ्या सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली, एकूण खर्च ५० हजारांच्या वर गेला. ही मुलगी आणि तिचा भाऊ यांनी ३० हजार कर्ज उचललंय, आता ते परत कसे नि कधी फेडणार याची मलाच काळजी वाटते. त्यात आता आईला खाली बसता येणार नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलीच्या घरात त्यामुळे तिला कमोडची खुर्ची घ्यावी लागणार. पुन्हा ही कामाला आल्यावर आईला कोण बघणार, एक ना दोन अनेक प्रश्न.

हल्ली बेबीसिटिंगचे बरेच चांगले, काहीसे महागडे असले तरी संख्येने अधिक, पर्याय मोठ्या शहरांतून तरी उपलब्ध आहेत. नोकरी करणाऱ्या पालकांना त्याचा प्रचंड फायदा होतो. अॅडल्टसिटिंगचेही असे पर्याय अधिकाधिक व्हायला हवेत, यावर दुमत नसावं.

Comments