जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आजच्या मधुरिमामध्ये आहेत भटकंती,
प्रवास, गिर्यारोहण यांविषयीचे काही लेख. तुमच्यापैकी बरेच जण नियमित
प्रवासाला जात असतील, अनेकांचा कामाच्या निमित्ताने प्रवास होत असेल.
प्रवासाची स्वप्नं तर आपण सगळेच पाहात असतो. महाराष्ट्रात, भारतात व परदेशात फिरायला जाण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होतंही.
पण अनेक जण असतात, जे विविध कारणांमुळे - शारीरिक, आर्थिक, सामाजिक - घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना वाटत नसेल का भटकायला जावंसं? ते काय करतात मग? ते मनातल्या मनात फिरून येतात, घरबसल्या. प्रवासाला जायचं म्हणजे सामानाची बांधाबांध, तिकिटं, राहण्याची व्यवस्था, प्रवासातले त्रास हे सगळं आलंच. घराबाहेर पडल्यावर हे टाळता येत नाही. अनेकांना तर प्रवास करायच्या कल्पनेनेच धडकी भरते. कितीही नियोजन करून गेलं तरी ऐन वेळेला काय गडबड होईल, सांगता येत नाही. त्यामुळेही ते बाहेर जायचं टाळतात.
काही लोकांना तर असंही वाटतं की, सारखा ‘घराबाहेर पडा’ असा धोशा लावल्याने ज्यांना बाहेर पडता येत नाही त्यांना त्रासही होऊ शकतो. त्यांना काहीतरी अधुरं वाटू शकतं. मग आपण ‘घरबसल्या भटकंती’ अशी एक संकल्पना का प्रत्यक्षात आणू नये? कथाकार जीए कुलकर्णी या मताचे होते.
मी घरी खुर्चीत बसून जगभराची सफर करून येतो, पुस्तकांच्या माध्यमातून, असं ते म्हणत. आजकाल टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण घरबसल्या दुनियेची सैर करून येऊ शकतो. कल्पनाशक्तीला कसलीच मर्यादा नसते, ती एका क्षणात सागराचा तळ गाठू शकते तर दुसऱ्या क्षणाला पॅराशूट बांधून हवेत झोकून देऊ शकते. एका क्षणाला घनदाट जंगलात फिरते, तर दुसऱ्या क्षणाला आर्क्टिकच्या बर्फाळ भागातली थंडी अनुभवू शकते. एक वेळ काश्मीरला गेलेल्या माणसाला बर्फात खेळता येणार नाही, पण पुस्तकातलं काश्मीरमधल्या बर्फाचं वर्णन वाचणाऱ्याला तो थरारक अनुभव नक्कीच येऊ शकतो.
काहीही म्हणा, भटकंती महत्त्वाचीच. प्रत्यक्ष घराबाहेर पडून केलेली वा घरात बसून शब्दांच्या माध्यमातून केलेली. आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायला लावून आपल्याला समृद्ध करणारी. हो ना?
Comments
Post a Comment