आव्हान

उद्या पोळा. आपल्यासाठी वर्षभर न बोलता, न तक्रार करता, उन्हापावसांत राबणार्‍या जनावरांचं ऋण मान्य करून त्यांचे आभार मानण्याचा, त्यांचं कोडकौतुक करण्याचा दिवस. पण पावसाने केव्हाचाच गाशा गुंडाळल्याने आपल्या तोंडचं पाणी पळालंय, त्यात या मुक्या जीवांना न्हाऊमाखू घालायला कुठनं पाणी आणायचं? त्यांना सजवून, पुरणपोळी खाऊ घालण्याचं मनात खूप असलं तरी ते करायची मानसिक अवस्था उभ्या महाराष्ट्रात कुठेच नाहीये यंदा. एरवी पोळा येईस्तो भरपूर पाऊस झालेला असतो, शेतकरी व त्याचं कुटंुब आणि पर्यायाने समाज सुखावलेला असतो. तेव्हा आपल्या घरातल्या या चार पायांच्या सदस्यांचं मनापासून कौतुक पुरवलं जातं. यंदा मात्र पावसाने पार दडी मारल्याने, आणि आता यापुढे तो फार येण्याची शक्यता नसल्याने, सगळेच हताश झाले आहेत. पुढच्या वर्षीचा जूनमध्ये पाऊस वेळेवर यावा, अशी प्रार्थना करणं आपल्या हातात आहे. परंतु तोपर्यंतचे नऊ महिने कसे काढायचे, ही भीषण चिंता सगळ्यांनाच सतावते आहे. शेतकर्‍यांनी बियाणं टाकण्याजोगं जमिनीत पाणीच नाही. खरीपाचा हंगाम गेलाच आहे, रबी तरी काही देईल का? शहरांमध्ये राहणार्‍यांना पाणी पुरवणार्‍या तलावक्षेत्रातही पाऊस झालेला नाही त्यामुळे आतापासूनच मुंबईपुण्यातही पाणीकपातीच्या झळा लागल्यात. आहे ते थोडकं पाणी नऊ महिने कसं पुरवायचं, हे आता सगळ्यांपुढचंच आव्हान आहे. आणि ते आपण पेलायलाच हवंय, कारण त्याशिवाय पर्याय नाहीये.

पाणी जपून वापरा, हा संदेश आतापर्यंत अनेकदा आपल्यासमोर आलेला असतो. परंतु जेव्हा खरोखर आंघोळीला दोनचार तांबेही पाणी मिळत नाही, तेव्हा त्याचं महत्त्व पटतं, त्याआधी नाही. मग आपण असेल ते पाणी अगदी काटेकोर वापरतो, एकही थेंब वाया जाऊ देत नाही. एरवी गळक्या नळाकडे दुर्लक्ष करतो, पण पाणीकपात लागू झाली की आपल्याला तो दुरुस्त करून घ्यायची बुद्धी सुचते.

आता ती वेळ आलेली आहे. तेव्हा जपून पाणी वापरू. सणासुदीच्या निमित्ताने होणारी अन्नधान्याची, खाद्यपदार्थांची नासाडी टाळू. जबाबदारीने वागू, असं स्वत:ला बजावून सांगायची वेळ आलेली आहे. स्वत: तर नीट वागूच, पण कोणी बेजबाबदारपणा करत असेल तर त्याला तिथल्या तिथे सुधारायला सांगण्याचीही हीच वेळ आहे. मला काय त्याचं, असा विचार करण्याची वेळ निघून गेलीय.

Comments