नाटकाची हुरहूर

गणपती आणि नाटक यांचं अतूट नातं. निदान कोकणात आणि मुंबईत तरी नक्कीच. माझा जन्म बोरिवलीत गोविंद नगर या मध्यमवर्गीय वसाहतीत झाला. गणपतीत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे तेव्हा. मी कधी काही सादर नाही केलं, पण कार्यक्रम पाहायला आवडीने जायचे. आमच्या जवळच्या बळवंत सोसायटीत बहुधा दिवाळीत तीन अंकी नाटक व्हायचं. काका किशाचा पाह्यल्याचं आठवतंय तेव्हा. अकरा वर्षांपूर्वी आम्ही मुलुंडला देशमुखवाडीत राहायला आलो, वाडीत बहुसंख्य मराठी कुटुंबं. दोनतीन गुजराती घरं आहेत, पण त्यांना सर्वांना मराठी उत्तम येतं. आमच्या या छोट्याशा वाडीत पाच दिवसांचा गणपती बसतो, इतर कोणतेही सण आम्ही नाही साजरे करत. त्यामुळे हे पाच दिवस सगळेच जण सोसायटीत गुंतलेले असतात. लग्न होऊन दुसरीकडे गेलेल्या मुली एकदा तरी या माहेरच्या गणपतीला येतातच. निलेश नोकरीनिमित्त दुबईत आहे, तो न चुकता गणपतीचे पाचही दिवस येतो. जे मुलगेही वाडी सोडून गेलेत, तेही या काळात वाडीत हमखास सापडतात.

वाडीतल्या गणपतीचं मुख्य आकर्षण असतं मुलांचं नाटक. विजय लाड यांनी लिहिलेलं. Made to order.

विजय माझे शेजारी, व्यवसायाने इंटीरिअर डेकोरेटर. पण नाटकावर त्यांचा प्रचंड जीव. गणपतीला दीडेक महिना असला की विजय सोसायटीतल्या मुलांना विचारत, कोण कोण काम करणारेय यंदा. जी मुलं हो म्हणतील, त्यांची वयं, प्रकृती लक्षात घेऊन विजय पात्रयोजना करत आणि नाटक लिहीत. आम्ही राहायला आलो त्या वर्षी मिडास राजाच्या गोष्टीवर आधारित नाटक होतं. माझी लेक ती सोन्याची राजकन्या झाली होती, दुसरीत होती तेव्हा. बाकीचे कलाकारही पाचवीसहावीपर्यंतचे. त्यांना संवाद वाचून दाखवायचे, म्हणून घ्यायचे हे कठीण काम असायचं कारण सगळी पोरं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी. देवनागरी वाचायचं, संवाद पाठ करायचे, आणि स्टेजवर जाऊन गर्दीसमोर म्हणायचे हे त्यांच्या दृष्टीने मोठं आव्हान असायचं. पण जबरदस्त सराव केल्यानं ती ते उत्तम निभावायची.

एक वर्षी पुलंची पिल्लं हे नाटक केलं. पुलंची निवडक पात्रं पुलंना घेऊन अमेरिकेला जातात, अशी या नाटकाची संकल्पना होती. सखाराम गटणे, नारायण, नामा परीट व इतर काही पात्रं होती त्यात. सारंगचा नारायण, अद्वैतचा गटणे, वल्लभचे (डाव्या हाताने पेटी वाजवणारे) पुलं अप्रतिम साकारलेले होते. या नाटकाचे डहाणूजवळ एका आदिवासी शाळेत आणि ठाण्यात अत्रे कट्ट्यावरही प्रयोग झाले. एकही स्त्रीपात्र नसलेलं विजयचं हे एकमेव नाटक. एरवी त्यांची मुलगी दिशा, गार्गी आणि मिहिरा या तिघी ठरलेल्या.

एका वर्षी, मला वाटतं २६ जुलैच्या पुरानंतर, स्वच्छता अभियानासंबंधी नाटक होतं. एका वर्षी मोरूची मावशी, इथे ओशाळला मृत्यू आणि ती फुलराणी या तीन नाटकांमधले छोटे प्रवेश त्यांनी एका नाटकात गुंफले होते. सनीचा संभाजी, चिन्मयची मावशी नि गार्गीची फुलराणी यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.

एका वर्षी स्वातंत्र्यलढ्यावर आधारित नाटक लिहिलं विजयने. पंधरासोळा वर्षांखालच्या मुलांना मुळात स्वातंत्र्यलढ्याबद्दल नाटक करावंसं वाटायला लावणं, ते आवडणं हे आव्हान होतं. पण ते विजयने नेहमीप्रमाणे पेललंच. त्यातला थरार प्रेक्षकांपर्यंत निश्चितच पोचला.

गेल्या वर्षी विजयने लाइट सस्पेन्स प्रेमकथा लिहिली. गार्गी व चिन्मयला त्यात मध्येच रंगरूपही बदलायचं होतं. कोसळणाऱ्या पावसात, छोट्याशा स्टेजवर मेकअप रूम वगैरे काही नसताना स्टेजच्या मागनं चिखलातनं बाहेर पडून चिन्मयच्या घरी जाऊन मी आणि सुनीतानं त्यांना अडीच ते तीन मिनिटांत तयार करून योग्य वेळी स्टेजवर पाठवलं होतं. तेही नाटक अतिशय आवडलेलं सर्वांनाच.

ही नाटकं नेहमीच उत्तम होत याचं कारण होतं चांगले संवाद, योग्य वेशभूषा, अभिनय. पण फक्त नाटक बसवायला परळहून दररोज संध्याकाळी येणारा हर्षद पांचाळ, प्रकाशयोजना आणि नेपथ्य हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. हर्षददादाचं मुलांना टेन्शन येई, पण त्यांच्याकडून अभिनय करवून घेण्याचं कसब त्याच्याकडे होतं.

विजयची बायको रचनाही त्याच्याइतकीच हौशी आणि नाटकप्रेमी, तीही कोकणीच म्हणा. नाटकासाठी तीही खूप त्रास घ्यायची, मदत करायची. नाटक यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मुलांना पार्टी देण्यातही ती विजयइतकीच हौसेने पुढे असायची.

यंदा हे सगळं लिहायचं कारण... विजयने यंदा नाटक लिहिलेलं नाही. मुलंही आता मोठी झालीत. अभ्यासात गुंगलीत.

नाटकांनी मुलांना काय दिलं माहीत नाही. आम्हा आयांना मात्र खूप आनंद दिला. मुलांची तयारी करून घेण्यात, वेशभूषा करण्यात आम्हाला मजा येई. नाटक होईपर्यंतचा एकदीड महिना कसा जायचा तेही कळायचं नाही. आणि नंतर हुरहूर असायची. रिकामपण असायचं.

यंदा ना ती धावपळ. ना हुरहूर.

Comments