रात्र मोठी होण्‍याचे दिवस

छाया - इंद्रजीत खांबे, कणकवली.
पावसानं मोठी विश्रांती घेतली आणि आपली झोप उडाली होती, त्याला काहीच दिवस लोटलेत. त्याने मध्येच येऊन झलक दाखवलीन, मी असा असतो हं, विसरला असाल कदाचित. पण आता काही पुढच्या जूनशिवाय तो येणार नाहीये. डिसेंबर-जानेवारीत येईलही, पण तसा आला तर डोळ्यांतनं पाणीच काढायला लावेल. डोळ्यांतलं पाणी तात्पुरतं खळलं असेलही आता, पण पुढचे दिवस आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक, संवेदना जागृत ठेवून, काळजीपूर्वक वागायला हवंय, हे विसरून चालणार नाहीये. आपल्याला पाणीपुरवठा करणारा तलाव भरलाय ना, मग बाकीच्यांचं काय होतंय त्याची मला चिंता कशाला, असा विचार मागे टाकायला हवाय.
घरातून एकदा वापरल्यानंतर फेकलं जाणारं पाणी आणखी एकदा कसं वापरता येईल, ते शिकायला हवंय. पाणी नाही म्हणून बोअर खणणं तात्पुरता उपाय झाला. बोअरची पातळी आता अधिकाधिक खालीच जाणार आहे. त्यामुळे पुढचा पाऊस येऊन तलावांमध्ये पुरेसं पाणी साठेपर्यंत आहे तेवढंच पाणी वापरायचंय. आणि पुढचा पहिला पाऊस येईल तेव्हापासून ते पावसाचं पाणी कसं जास्तीत जास्त साठवता येईल, त्याचा विचार आतापासूनच करायचाय. तरच पुढचा काळ बरा जाणार आहे.

पुढचं महायुद्ध पाण्यावरून होणार असल्याचं भाकीत आपण ऐकत आलो आहोत. आठ दिवसांतनं एकदा येणारा टँकर आला की एका एका कळशीसाठी होणाऱ्या भांडणाची पातळी त्या महायुद्धापेक्षा वेगळी नाहीये. उन्हातान्हात रखरखीत माळावर मैलोन‌्मैल चालून पाणी आणणाऱ्या मुलीबाळी, आयाबाया हे युद्धच जणू जगतायत अनेक वर्षांपासून. त्यांची ‘मन की बात’ आपण ऐकायला हवीय, लवकरात लवकर. मागच्या काही पिढ्या दुष्काळ, पाणीटंचाई या प्रश्नांशी झगडत मोठ्या झाल्या, आता पुढच्या पिढीसमोर हे प्रश्न अधिक बिकट होऊन उभे ठाकलेत. त्यांचा झगडा, तडफड तीव्र झाली आहे. त्यांची मानसिक व भावनिक आंदाेलनं जाणून घ्यायची, त्यांच्या अस्वस्थतेवर, अस्थिरतेवर उपाय शोधण्याची तातडीने गरज आहे.
मधुरिमाचा हा अंक म्हणजे आपल्या भवतालच्या, कदाचित नीटसं न दिसणाऱ्या अस्वस्थतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. दिसत असेल तरी दखल घेतली न जाणारा हा जो संघर्ष आहे, त्याची परिणती अनेक वेगळ्या समस्यांमध्ये होऊ शकते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. रात्र लांबत जाण्याचेच दिवस आलेत आता, आपल्या संवेदनांचा मिणमिणता का होईना प्रकाशच या अंधारावर मात करू शकतो. हो ना?
http://divyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/

Comments