दहावीचा "डोळस' अभ्यास

जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने मुंबईतील एका संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमाविषयी. दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या, परंतु शाळेत जाऊ न शकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना शाळेतल्याप्रमाणे वर्षभर शिकवून त्यांच्या परीक्षेपर्यंतचे सर्व सोपस्कार पूर्ण करणाऱ्या या जिद्दी महिलांचं काम पाहून आपले डोळे उघडतात, हे नक्की.


मुलुंडमधल्या महाराष्ट्र सेवा संघाच्या वातानुकूलित सभागृहात मागच्या शुक्रवारी प्रवेश केला तेव्हा तिथे एक विचित्र कुजबुजपूर्ण शांतता जाणवली. शांतता, कारण तिथे परीक्षा सुरू होती. आणि तरीही कुजबुज होती कारण परीक्षार्थी होती अंध मुलं, जी फक्त आपल्या लेखनिकाला ऐकू येईल इतक्या आवाजात उत्तरं सांगत होती.
महाराष्ट्र सेवा संघ ही पन्नासेक वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था. अनेक उपक्रम या संस्थेतर्फे चालवले जातात. संस्थेचं सुसज्ज असं ग्रंथालयही आहे. तीन वर्षांपूर्वी या ग्रंथालयात काही ब्रेल लिपीतली पुस्तकं आली. त्यांचं नक्की काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ग्रंथालय समितीच्या सदस्यांनी सरळ नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड नॅब या संस्थेशी संपर्क साधला. त्यातून असं लक्षात आलं, की अनेक विशेषकरून गरीब अंध विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षेसाठी मोठ्या मदतीची आवश्यकता असते. बऱ्याच जणांनी शाळा अर्धवट सोडलेली असते, त्यामुळे बाहेरून परीक्षा देण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज शालेय शिक्षण मंडळाकडे भरण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्याचं काम कोणीतरी हाती घेण्याची गरज होती. यासाठी संघाकडे जागा होती, पण नक्की काय कसं करायचं ते कळत नव्हतं. मग त्यांच्या मदतीला आल्या आशा कणसे. आशाताईंचा मुलगा अंध असल्याने त्यांनी पंधरावीस वर्षांपूर्वी नॅबचाच पॅराप्रोफेशनल टीचिंगचा अभ्यासक्रम केला होता, व त्या डोंबिवलीत या प्रकारचं काही मुलांना शिकवण्याचं काम करत होत्या.
हे दृष्टिसेवा केंद्र २०१२च्या जुलैमध्ये सुरू झालं. नॅबकडे मुंबईतल्या अंध व्यक्तींच्या नोंदी आहेत. त्यातून शाळा अर्धवट सोडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांची त्यांच्या पालकांसोबत एक बैठक घेण्यात आली, असं आशाताई म्हणाल्या. मग मुलुंड परिसरात राहणाऱ्या काही महिलांनी शिकवायला यायचं कबूल केलं. यासाठी ग्रंथालयाचे सदस्य महत्त्वाचे ठरले. आठवड्यातून एकदा तरी हे सदस्य ग्रंथालयात येतात, तेव्हा त्यांच्यापर्यंत या कामाची माहिती पोचवणं साेपं झालं, असं या केंद्राची जबाबदारी असलेल्या नंदिनी हंबर्डे यांनी सांगितलं. हे शिकवणं मनात आलं तेव्हा जाऊ या प्रकारचं नव्हतं, तर आठवड्यातून ठरावीक तास नियमित तिथे जाणं अपेिक्षत होतं. यातील काही जणी निवृत्त शिक्षिका होत्या, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जणींना अंधांसोबत काम करण्याचा अनुभव होता. परंतु हाती घेतलंय, ते तडीस नेण्याची जिद्द प्रत्येकीकडे होती. मुलांनीही त्यांना खूप मोठी साथ दिली, कारण त्यांच्यासाठी शाळेत पुन्हा जाणं, दहावी पास होणं हे अशक्य वाटणारं स्वप्न होऊन बसलं होतं. त्या वर्षीची सर्व मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि या महिलांचा हुरूप वाढला. पुढच्या वर्षी अधिक मुलं आली.
सुरुवातीला पालकांच्या सोबतीनेच प्रवास करू शकणारी मुलं लवकरच स्वावलंबी होतात आणि मुंबईतला लोकल/बसचा प्रवास आपल्या आपण करू लागतात. परीक्षा झाली, की ती मस्त मुंबई फिरून येतात आणि भटकण्याची मजा लुटतात, असं आशाताईंनी सांगितलं.
वर्ग सुरू झाल्यानंतर शिकवायला येणाऱ्या महिलांच्या लक्षात आलं, की अनेक मुलं डबा आणत नाहीत. मग या कधी आपल्या घरून त्यांच्यासाठी खाऊ नेतात. सहामाही परीक्षेच्या वेळी मुलं आणि लेखनिक अशी सर्वांची साध्याच परंतु पोटभर जेवणाची सोय संघातर्फे करण्यात आली होती. यंदा या उपक्रमाचं चौथं वर्ष आहे. गेल्या वर्षी २४ मुलं परीक्षेला बसली होती. त्यांना साेपं जावं म्हणून मुलुंडमधल्याच एका शाळेने त्यांच्यासाठी केंद्र म्हणून परीक्षा घेण्यास मान्यता देऊन खूप मोठा अडसर दूर केला आहे. सेवा संघाने त्यांना परीक्षेला वेळेवर पोचणं शक्य व्हावं, यासाठी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात आपल्या जागेत राहण्याचीही मुभा दिली आहे. या मुलांचे परीक्षा शुल्कदेखील केंद्रातर्फे भरले जाते, असं संघाच्या रश्मी अनगळ म्हणाल्या.
अंध मुलांना परीक्षा देताना मोठी अडचण असते ती लेखनिक मिळण्याची. मात्र मुलुंडकरांनी आजवर लेखनिकांची कमी पडू दिलेली नाही. गेल्या वर्षी एका परीक्षेला तर अवघा ११ वर्षांचा ऋषिकेष काजरेकर लेखनिक म्हणून आला होता. ऋषीची आई या मुलांना शिकवायला येते, त्यामुळे तो सहज यात ओढला गेला. त्याची सहामाही परीक्षा सुरू असताना पेपर देऊन घरी आल्यावर लगेच तो इकडचा पेपर लिहायला आला, हे कौतुकास्पदच म्हणायला हवे.
या मुलांना शाळेचा संपूर्ण अनुभव यावा, अशीच या केंद्राची इच्छा असते. त्यामुळे त्यांची वार्षिक सहल नेली जाते, त्यांचं स्नेहसंमेलन होतं. सण साजरे होतात, आणि परीक्षेचा निकाल आल्यानंतर दणक्यात बक्षीस समारंभही होतो, असंही रश्मीताईंनी सांगितलं.
इथे शिकवून, इथे येऊन काय मिळतं, हा प्रश्न विचारावाही लागत नाही, इतकं समाधान या शिक्षिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं. वेळ जातो, समाजासाठी काहीतरी करतो, वगैरे पुस्तकी उत्तरं देण्यात त्यांना रसही नाही. मुलं शिकतायत, दांडी मारत नाहीत, अभ्यास करतायत, आपल्या पायावर उभी राहतायत, हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यात कुठेही देणारा व घेणारा, अशी वरखाली उतरंड नाही. मुलं ज्या आनंदाने शिकतात, त्याच आनंदाने त्या शिकवतात. उपकाराची भावनाही त्यात नाही. उलट, आपल्याला असं काहीतरी करायची संधी मिळतेय, याबद्दल आनंद आहे. या २५ जणी दांडी मारत नाहीत, घरची कामं, प्रवास, तब्येती, समारंभ सगळं सांभाळून इकडे वेळेवर येतात, हे त्यांच्या या आनंदाचं चिन्ह म्हणायला हवं.
बबिता नावाची एक मुलगी गेल्या वर्षी फक्त संगीत शिकायला या केंद्रात यायची, एरवी पुस्तकी अभ्यास ती एका खाजगी शिकवणी वर्गात जाऊन करायची. इकडे आल्यावर तिला हे वातावरण इतकं आवडलं, आपले सोबती आणि त्यांची साथ इतकी हवीशी वाटली, की तिने चक्क या शाळेत प्रवेश घेतला, असं नंदिनीताई म्हणाल्या. त्यातून लक्षात आलं, की कोणत्याच मुलांना नुसतं शिक्षण, अभ्यास नको असतं, तर मित्रमैत्रिणी, हसणं खिदळणं, गप्पा हव्या असतात. ते वातावरण या केंद्रात असल्याने मुलं अभ्यासदेखील मन लावून करतात.
ज्या महिला या केंद्रात शिकवायला जातात, त्यांच्या घरच्यांपर्यंतही हे लोण पोचतं. मग कोणी त्यांच्यासाठी पुस्तकं ध्वनिमुद्रित करून देतं, कोणी लेखनिक म्हणून जातं, कोणी गाणं शिकवतं, कोणी आपल्या वाढदिवसाला या मुलांना खाऊ देतं.
कर वाचवण्यासाठी म्हणा, की सामािजक बांधीलकी म्हणून म्हणा, पैसे उचलून देणं साेपं असतं. दिवसातला काही एक वेळ कुणासाठी तरी देणं त्या मानाने कठीण, परंतु अशक्य नक्कीच नाही. सेवा संघाकडेही प्रसंगोपात देणग्या येतच असतात. परंतु अशा प्रत्यक्ष काम करणाऱ्या हातांचं महत्त्व संघालाही आहे. हा एक असा उपक्रम आहे, ज्यात अनेकांचा थेट आणि सततचा हातभार आहे, याची संघाला जाणीव आहे.
(याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास कृपया आशा कणसे 8898714366 वा रश्मी अनगळ 9821640932 यांच्याशी संपर्क साधावा.)

Comments