आम्ही गोंधळी गोंधळी

गोंधळ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कधी तो घरात माजणारा गोंधळ असेल तर कधी मनात उडालेला. कधी प्रवासात तिकिटं न सापडल्याने उडणारा, तर कधी ऑफिसात अनेक जण एकाच वेळी रजेवर गेल्याने निर्माण होणारा. कधी आपल्याच वेंधळेपणाने उडालेला, तर कधी परिस्थितीजन्य. कधी तो फक्त आपल्यासाठी गोंधळ असतो, समोरच्याच्या दृष्टीने सगळं सुरळीत सुरू असतं. तर कधी गोंधळाने आपलं डोकं फिरलेलं असतं, आणि समोरची व्यक्ती शांतपणे काम करत असते. एकूण काय, गोंधळाशिवाय आयुष्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. विशेषत: चार बायका एकत्र आल्या की गोंधळ होणारच, असं म्हणतात. किंवा त्या गोंधळ घालणारच, हे गृहीत धरलेलं असतं. पण बायकांच्या या गोंधळातही एक शिस्त असते, एक सूत्र असतं, असं नाही वाटत तुम्हाला? आपण काही कारणाने एकत्र येतो, सणाच्या म्हणा वा भिशीच्या; किटीच्या म्हणा वा वाढदिवसाच्या. आपल्याला सगळ्यांनाच खूप बोलायचं असतं, एकमेकींना काही सांगायचं असतं. एकमेकींचं ऐकायचंही असतं. शिवाय खादाडी करायची असते, क्वचितप्रसंगी खरेदीही असते एकत्र. त्यामुळे अशा वेळी तिथे गोंधळ, आवाज, कल्ला हे असणं साहजिकच. पण म्हणून आपण एखादा पदार्थ, वा एकमेकींसाठी आणलेल्या भेटी दिल्या नाहीत, असं तर होत नाही. कारण आपल्याला महत्त्वाचं काय, ते या सगळ्या गाेंधळातही लक्षात असतंच. आणि या मैत्रिणींमुळे घरच्यांकडेही दुर्लक्ष नसतंच केलेलं.
म्हणूनच की काय, आपण आपल्या सर्व देवीदेवतांना गोंधळात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देतो. हा गोंधळ जरा वेगळा असतो, हा मुद्दाम घातलेला असतो. तो गोंधळ आपोआप झालेला नसतो. पण शेवटी तो गोंधळच. प्रत्येक दैवताला स्वतंत्र नावाचं बोलवणं जातं या गोंधळासाठी. नवरात्र सुरू आहे, बायका अनेक ठिकाणी एकत्र जमून जोगवा, गजर, भजन असे कार्यक्रम करत असतील. त्यात ‘आम्ही अंबेचे गोंधळी,’ ‘गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे,’ ‘अंबे गोंधळाला ये,’ अशी गाणी ऐकताना, म्हणताना त्यांचं भान हरपून जात असेल. गोंधळ राहणारच आहे कायम, त्याशिवाय मजा नाही. पण तो निस्तरता येण्याजोगा असावा, एवढीच प्रार्थना.

Comments