दारूमुक्तीच्या दिशेने

‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ हा पुलंच्या 'वाऱ्यावरची वरात’मधला संवाद माहीत नाही, असा मराठी माणूस विरळाच असावा. ज्या काळात पुलंनी तो लिहिला, तो काळ मात्र खूप वेगळा होता. भारतापुरतं बोलायचं झालं तर (कारण अल्कोहोलिक अनॉनिमस ही दारूचं व्यसन सोडायला मदत करणारी संघटना अमेरिकेत १९३५मध्ये स्थापन झाली.) दारूचं व्यसन तेव्हाही अनेकांना होतंच, दारूपायी अनेक संसार तेव्हाही उद्ध्वस्त झालेच होते. तरीही, त्याचं प्रमाण लोकसंख्येच्या मानाने कमी होतं. दारू सहज उपलब्ध नव्हती, तिच्या जाहिराती होत नव्हत्या, गावागावात कोपऱ्या कोपऱ्यावर बार उघडलेले नव्हते. काही विशिष्ट वर्गातले लोकच दारू पीत असत, समाजातल्या सर्व वर्गांत ते व्यसन पसरलेलं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारू पिण्याला प्रतिष्ठा नव्हती. एक पेग घेतल्याशिवाय रात्रीचं जेवण होत नाही आमच्याकडे, असं फारसं कोणी जाहीरपणे कौतुकाने सांगत नव्हतं.

गेल्या १५/२० वर्षांत वेगवेगळ्या प्रकारची दारू आपल्याकडे सहज मिळू लागली आहे. शालेय वयातच अनेकांनी दारूची चव घेतलेली असते. कित्येक घरी वडील/काका/आजोबा/मोठा भाऊ/नवरा दारू पिणारे असतात, त्यामुळे त्यात चुकीचं काही आहे, याचीही जाणीव नसते. कोणतीही चांगली गोष्ट घडली की पार्टी करायची पद्धत पडलीय, तीही ओली. जणू दारूशिवाय सेलिब्रेशन शक्यच नाही. कष्टकरी वर्गाची वेगळीच कहाणी. विशेषकरून सफाई कामगार इतक्या हलाखीच्या परिस्थितीत व घाणीत काम करत असतो की, दारूच्या नशेतच काम करणं त्यांना शक्य होतं. शारीरिक कष्ट इतके अपार असतात की दारूशिवाय झोप लागत नाही.

या दारूचे दुष्परिणाम पिणाऱ्याच्या आरोग्यावर, कुटुंबीयांवर, आर्थिक परिस्थितीवर, शारिरिक/मानसिक/सामाजिक स्थितीवर होत असतात. व्यसनी माणूस कोणत्या जातीचा/धर्माचा/व्यवसायाचा/वर्गाचा आहे ते दारू पाहात नसते, हा दुष्परिणाम सगळ्यांवर सारखाच होत असतो. जगभरातल्याप्रमाणे भारतातही महिला संघटनांनी म्हणूनच दारूबंदी हा विषय महत्त्वाचा मानला व त्या दिशेने काम केलं, जे अजून चालूच आहे, चालू राहणारच आहे. या कामाची ओळख करून देणारे काही लेख आजच्या मधुरिमामध्ये आहेत. त्यातून योग्य तो धडा सर्वांनीच घ्यायला हवा, असं प्रकर्षाने वाटतं.

Comments