लांब केस असलेली मुलगी/बाई म्हणजे टिपिकल, पारंपरिक मूल्य व भारतीय संस्कृती जपणारी सुंदर स्त्री अशी प्रतिमा भारतात पूर्वापार चालत आली आहे. आणि त्यात एकविसाव्या शतकातही काहीच फरक पडलेला नाही, हे स्वानुभवावरून म्हणतेय.
लांब केस कापले म्हणजे ती बिघडली, तिने भयंकर मोठा गुन्हा केलाय, असाच बहुतांश परिचितांचा आव असतो. यात मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक आणि कार्यालयीन सहकारी या सगळ्यांचा समावेश असतो. हे जे काही सो काॅल्ड सौंदर्य, संस्कृती, शालीनता वगैरेचं प्रतीक असणारे लांब केस असतात, ते सांभाळण्याशी त्यांचा काडीएक संबंध नसतो. त्यांची देखभाल किती करावी लागते, त्याला वेळ किती जातो, भरपूर पाणी लागतं, ते वाळवायचे म्हणजे किती त्रास असतो, हे यांना ठाऊक नसतं. लांब केस धुवायची मानसिक तयारी करावी लागते, त्यासाठी तशी मनाची उसंत असावी लागते, हे तर माहीत असण्याचा प्रश्नच नाही. मुंबईच्या उकाड्यात लांब केस असणं ही किती मोठी शिक्षा असते, घामेजलेल्या केसांची वेणी घालणं किती त्रासाचं असतं, हे कसं समजणार त्यांना. कारण ती एक शारीरिक बाब आहे, जसं आपला पाय किती दुखतोय आपण कुणाला सांगू शकत नाही, तशीच.'अय्या, कित्ती छान होते तुझे केस, कशाला कापलेस. आमचे नाहीत ना, म्हणून वाईट वाटतं गं,' असं म्हणणं किती साेपंय ना.
तुझे केस लांब नाहीत, तुला ते जेनेटिकली मिळालेले नाहीत, लहानपणी आईने वाढवू दिले नाहीत म्हणून सवय नाही, त्यांची प्रत चांगली नाही वगैरेला मी कशी जबाबदार? किंवा, तुमची ही बाजू समजली म्हणून मी माझे केस कापायचे नाहीत, हे कोणतं लाॅजिक? मी असंही म्हणू शकते की, तुझे तसे नाहीत ना छान लांबसडक केस, तुझ्या दु:खात सहभागी व्हावं म्हणून मी कापले. बस?
तू कर ना प्रयत्न केस वाढवायचा. काळजी घे. त्यांना नीट तेल लाव, ते नीट विंचर, वेळच्या वेळी न्हायचं लक्षात ठेव. मुख्य म्हणजे पोटात काय जातंय त्याकडे पाहा. अरबट चरबट, तेलकट, कोणत्याही वेळी काहीही पोटात ढकलू नकोस. आणि रंग लाव, स्ट्रेटन कर, पर्म कर, स्ट्रीक कर, स्पा कर, सारखे नवनवीन शॅम्पू ट्राय करणं - हे सगळं थांबव. नैसर्गिक केसांची काळजी घेणंही रंगवलेल्या केसांइतकंच आवश्यक आहे, हे आपण विसरलोच आहोत जणू. कलर्ड हेअरना अमुक शॅम्पू, कंडिशनर लागतो बाई, नाहीतर खराब होतात केस, असं जितक्या जिव्हाळ्याने म्हणता ना, तितकाच जिव्हाळा लांब केसांना आवश्यक असतो. पण अंहं, हे बोलायचं नाही. कारण माझे केस लांब आहेत, तुझे नाहीत. त्यामुळे मला हे बोलायचा अधिकारच नाही. जसं मूल नसलेल्या जोडप्याला दत्तक हा चांगला पर्याय आहे, हे पोटचं मूल असलेली कोणीही व्यक्ती सुचवलेलं प्रशस्त नसतं, कारण त्या व्यक्तीला काय ठाऊक ना मूल नसल्याचं दु:ख?
पुरुषांनी तर बोलूच नये या विषयावर. दाढीचे खुंट वाढवून फिरणाऱ्याला विचारलं तर म्हणतात, 'अपनी खेती, जब चाहे उगाओ जब चाहे काटो.' मग माझे केस ही कोणाची खेती रे? तुम्हाला काय रोम्यांटिक, सेक्सी वगैरे वाटून घ्यायचंय ना, ते केस वगळून वाटून घ्या. पहिल्या झटक्यात लांब शेपटा घातलेली बाई आवडूही शकते, पण तिचा लांब केशसंभार हा त्या आवडीचा एकमेव निकष नाही ना राहू शकत कायमस्वरूपी?
लांब केसांचा आणखी एक प्रॅक्टिकल प्राॅब्लेम म्हणजे त्यांची एक तर वेणी घालता येते की अंबाडा बांधता येतो. सगळेच केस मोकळे सोडण्याच्या लायकीचे, प्रतीचे नसतात. फक्त अगदी सरळ रेशमी केस मोकळे साेडू शकतो, बाकीच्या केसांचा महान गुंता तयार होतो. म्हणजे लांब केस असूनही स्टायलिंग करताच येत नाही. मोकळे केस प्रियकराला जीव गुंतवायला वगैरे शयनगृहात ठीक आहेत, पण गच्च भरलेल्या ट्रेन वा बसमध्ये, एवढंच काय स्कूटरवरही काही फारसे योग्य नाहीत. ते कशातही अडकू शकतात. मुंबईत काही वर्षांपूर्वी लांब वेणीचं टोक नकळत कापून टाकणारी एक टोळी होती, आमच्या बिल्डिंगमधल्या एका वहिनींची वेणी गुडघ्यापर्यंत पोचायची, त्यांचे असे कापले होते केस बसमध्ये.
लहानपणी बहुतांश मुलींना केस वाढवायचे असतात, त्यांची लांब वेणी घालायची असते आणि दुष्ट आई ते वाढवू देत नाही, कारण त्यांची देखभाल तिला तिचं वेळापत्रक सांभाळून शक्य नसते. सकाळची शाळा असेल तर अधिकच त्रास. आणि केसांची देख्रभाल स्वत:ची स्वत: करायला येऊ लागल्यावर ते सगळं करायचा येतो कंटाळा. कुठे ती कटकट, राहू दे, असं वाटतं.
आणि तो राग मी केस कापले की माझ्यावर निघतो.
तर, प्राची दुबळे या फेसबुकवरच्या गायक/संशोधक मैत्रिणीमुळे केस दान करता येतात, ही माहिती तीनचार महिन्यांपूर्वी मिळाली. दोन महिन्यांपासून प्रचंड पाणीकपातीला तोंड द्यावं लागल्याने केस कापण्याच्या, दान करण्याच्या, आयुष्य थोडं सोपं करण्याच्या, थोडा बदल करण्याच्या इच्छेने डोकं वर काढलं. आणि मी मागच्या आठवड्यात ते कापलेच. जरा तोकडे उरलेत डोक्यावर आता, कारण १५ इंच लांब केस Hair Aid या संस्थेला मी दान केलेत, आजारामुळे केस गळून गेलेल्या बायांसाठी, खासकरून ज्यांना विग विकत घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी, विग तयार करायला. मुंबईत गोरेगावात पांडुरंगवाडीत यतीन देशपांडे नावाचा एक वल्ली हे काम करतो, तेही कसलीही जाहिरात न करता, वा त्यासाठी एकही नवा पैसा कोणाहीकडून न स्वीकारता. तो फक्त केस स्वीकारतो, आणि स्वत: त्याचे विग तयार करतो. कुरिअर केलेले केस त्याला मिळाले आहेत आणि ते वापरण्याजोगे आहेत, असा फोन आल्यावर हुश्श केलंय मी मोठ्ठं.
केस कापून ते केरात जाणार असते तर मी कदाचित कापलेही नसते. अवयवदानाएवढंच हे केशदान मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. जिवंतपणी करता येणारं.
कापताना रुखरुख वाटली, पण अगदीच थोडी. कारण मेरी खेती मैं अच्छे से जानती हूँ, पहचानती हूँ. हेही केस पुन्हा कमरेपर्यंत यायला फार काळ नाही जावा लागणार, हे मला ठाऊक आहे. आणि त्या केसांच्या विगमुळे कोण्या एकीला आत्मविश्वास मिळणार आहे, हेच केवढं बळ देणारं आहे.
मस्त गं. खूप हिंमत लागते, एवढे छान केस कापायला. पण ते दान केलेस, हे वाचून आणखी चांगलं वाटलं. या केस दानाच्या प्रोसेसबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झालीय. काही दिवसांपूर्वी शंभर रुपये तोळ्यावर केस विकत घेणारा मुलगा आला होता आमच्या बिल्डिंगमध्ये. त्याचीही आठवण झाली.
ReplyDeleteहं. एकदा त्याची स्टोरी करूया आपण. मुंबईत आहेत काही संस्था. प्राचीने केस दिले ते केरळमधल्या संस्थेला.
Deleteलिहिलंयस मस्त ! झक्कास दिसते आहेस!
ReplyDeleteधन्यवाद गं.
ReplyDeleteDitto Vandana!
ReplyDelete:)
ReplyDeleteMrinmayee tu kes daan keles ,vachun khup Anand jhala..khup dhadas lagat..ani tujhe kes kahi months madhe parat vadhanar...pan konala tari te kamala yetil..organ donation sarkhe ch puny ahe he..ani tu madt ch disteys !!
ReplyDeleteMrinmayee tu kes daan keles ,vachun khup Anand jhala..khup dhadas lagat..ani tujhe kes kahi months madhe parat vadhanar...pan konala tari te kamala yetil..organ donation sarkhe ch puny ahe he..ani tu madt ch disteys !!
ReplyDeletethank you Poonam. it is not like i cut my hair so that i could donate it. but, it was always at the back of my mind that i want to do it.
ReplyDeleteकेशदान ही कल्पनाच छान आहे . म्हणजे अवयव दान वगैरे गोष्टी आपण मेल्यावर आपल्या नातेवाईकांना सगळी पेपर्सची उस्तवार झेपेल तर आपली जिवंतपणी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होणार ! पण इथे ह्याची देही ह्याची डोळा - the joy of giving अनुभवता येतो! Cheers!
ReplyDeleteकेशदान ही कल्पनाच छान आहे . म्हणजे अवयव दान वगैरे गोष्टी आपण मेल्यावर आपल्या नातेवाईकांना सगळी पेपर्सची उस्तवार झेपेल तर आपली जिवंतपणी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होणार ! पण इथे ह्याची देही ह्याची डोळा - the joy of giving अनुभवता येतो! Cheers!
ReplyDeleteHow to donate.. is there any specific length requirement to donate hair?
ReplyDeleteहेअर एडची वेबसाइट दिलीय त्यावर क्लिक करा. त्यात सगळी माहिती आहे. किमान १५ इंच लांब असावे लागतात केस, कापल्यानंतर जे देणार असतो ते.
Delete