वास्तवाची जाणीव

भर रस्त्यात बर्फाच्या लादीवर ठेवलेले ते दोन लहानग्यांचे मृतदेह काही केल्या डोळ्यांसमोरनं हटत नाहीयेत. तसं म्हटलं तर त्या फोटोत असं थेट धक्कादायक काही नव्हतं, कारण पांढऱ्या कापडात बांधून काही तरी ठेवलंय असं प्रथमदर्शनी वाटत होतं. ज्यांना ते काय आहे, आणि त्या लहानग्यांचं मरण का ओढवलंय ते ठाऊक होतं त्यांनाच त्यातली तीव्रता, त्यातला संताप, चीड, अस्वस्थता, असंतोष, उद्वेग, असहायता कळाली असेल.

कोणत्याही कारणाने, कोणालाही मारणे चूकच. त्यातही वर्ष दीड वर्षाच्या लेकरांना, झोपेत, जाळून मारणं हे आपल्यापैकी सर्वांच्याच कल्पनेच्याही पलिकडचं, स्वप्नातही शक्य न व्हावं असं कृत्य.
परंतु, ते घडलंय. आपल्याच या थोर, हजारो वर्षांची उदात्त, महान वगैरे संस्कृती असलेल्या देशात घडलंय.
निव्वळ ती मुलं एका विशिष्ट जातीत जन्मली होती म्हणून. किंवा आपण असं म्हणू शकतो की, एका विशिष्ट जातीत जन्मली नव्हती म्हणून.

दोन महिन्यांपूर्वी आयलान कुर्दीच्या मृतदेहाचा फोटो पाहून आपण सारे असेच व्यथित झालो होतो, सोशल मीडियात तर अचानक निर्वासितांच्या बाजूने कणवेचा पूर आला होता.
मग दिव्या नि वैभव यांच्या मृत्यूनंतर अशी सहानुभूतीची लाट का नाही आलं बरं?
की आयलान तिकडे दूर होता, आपल्या लेखीही नसलेल्या देशाचा, म्हणून त्यावर व्यक्त होणं सोपं होतं? 
निर्वासित होण्याची वेळ आपल्यावर येणारच नाहीये हा एक आश्वासक भाव त्यामागे होता?

दिव्या नि वैभव नावाची किती तरी मुलं आपल्या आजूबाजूला असतील. आपले मित्रमैत्रीण असतील. त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवायची तर आपलं वागणं कसं आहे, ते आधी तपासून पाहावं लागेल. कोणी म्हणू शकेल की, तेव्हा तर तुम्ही असं वागला होतात, आता यांच्याबद्दल का वाईट वाटतंय? सहानुभूती दाखवायला एखाद्या गोष्टीची जाणीवपूर्वक दखल घ्यावी लागते. त्यामागे काय असेल, त्यातलं काय चुकीचं आहे, कशाचा निषेध करायला हवा, याचा विचार करावा लागतो. जो आयलानच्या बाबत करायची गरज नव्हती.
पण दिव्या नि वैभव आपल्या मातीतले होते, त्यांना मारलंही आपल्याच मातीतल्या लोकांनी.
हे पचवणं, स्वीकारणं, व त्याविरुद्ध बोलणं कठीण आहे.
पण ते आवश्यक आहे.
असे प्रकार आपण सहन करायचे का, होतं असं कधीतरी, त्यात काय मोठं, चालायचंच वगैरे म्हणून कामाला लागायचं का?
आपण एक तर नक्की करू शकतो.
आपल्या मुलाबाळांना तो फोटो दाखवून त्यामागची कहाणी सांगू शकतो. म्हणजे त्यांना आपण कुठे राहतोय, आणि कोणत्या भयाण वास्तव जगात पाऊल टाकणार आहोत, याची जाणीव होईल.
ते वास्तव बदलायचा प्रयत्न ही मुलं नक्की करतील. आपण मार्ग दाखवायचा नि त्यांना साथ द्यायची.
सणासुदीच्या दिवसांत हे काय अभद्र, असा विचार न करता, उत्सवी वातावरणातही या वास्तवाची जाणीव ठेवायलाच हवी, असं आम्हाला आवर्जून वाटतं.
बरोबर ना?

Comments