कन्याकौतुक

परवा ११ आॅक्टोबरला आहे आंतरराष्ट्रीय कन्या दिवस. मुलींचं कौतुक करण्याचा दिवस. मुलगी ‘नकुशा’ असणाऱ्या आपल्या देशात या दिवसाचं महत्त्व खरंच समजावून सांगायला हवंय. अजूनही. मुलामुलींच्या संख्येतला फरक हळुहळू सुधारू लागला असला तरी या मुली मोठ्या झाल्यावरची परिस्थिती बिकट आहे. अजूनही, २०११च्या जनगणना अहवालानुसार, ३० टक्क्यांहून अधिक मुलींचा, म्हणजे जवळपास एक तृतियांश मुलींचा विवाह १८ वर्षं पूर्ण होण्याआधीच करून दिला जातो. एकदा लग्न लावून दिलं की आपली जबाबदारी संपली, असाच या मुलींच्या पालकांचा विचार असतो. लग्न आणि ते लागल्यावर घातलं जाणारं मंगळसूत्र हे एक प्रकारचं संरक्षक कवच असतं.


संरक्षण कोणापासून, तर पुरुषांच्या नजरांपासून.


संरक्षण करणार कोण, तर पुरुषच.


वडील, भाऊ, नवरा किंवा मुलगा हे संरक्षकाच्या भूमिकेतच कायम वावरत असतात. पण ज्यांना संरक्षण हवंय, त्यांना कोणी विचारत नाही, त्यांच्या मताची दखलच घेतली जात नाही, असा हा सगळा एकतर्फी मामला आहे. प्रसिद्धीमाध्यमं, चित्रपट, जाहिराती, नाटकं या सगळ्यांतूनही हाच विचार ठळकपणे समोर येत असतो.

आपण मुलगी जन्माला तर घालतो, पण तिच्यावर विश्वास टाकत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ती तिची काळजी घेऊ शकते, ती नीट वागेल, ती योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास मुलीवर टाकायला अजूनही पालक तयार नाहीत. म्हणून तिचं शिक्षण थांबवायचं, लवकर लग्न लावून टाकायचं, तिला अंगभर कपडे/ओढणी घ्यायला जबरदस्ती करायची, तिला घराबाहेर पडू द्यायचं नाही, इत्यादि इत्यादि.

एकदा लग्न झालं, की मूल होऊ देण्याचा वा न होऊ देण्याचा अत्यंत वैयक्तिक निर्णयही ती घेऊ शकत नाही. मग तिची वाढच थांबते, तिचा सामाजिक/आर्थिक/मानसिक/भावनिक परीघच खुंटतो. जर एक तृतियांश मुली बालविवाहामुळे शिकू शकत नसतील, नोकरी/कामधंदा करू शकत नसतील; इतक्या मोठ्या मनुष्यबळाचा देशाच्या विकासात/प्रगतीत हातभार लागू शकणार नसेल तर महासत्ता वगैरे बनण्याचं स्वप्नच राहणार की काय अशी भीती वाटते.


म्हणून या कन्या दिनाचं औचित्य आहे, ते नुसतं नावाचं सेलिब्रेशन नाही, हे लक्षात घ्यायला हवं. ते मार्केटिंग फॅड नाही की माॅडर्न लोकांचं खूळ. मुली महत्त्वाच्या आहेत, त्यांना जपायला हवं, जोपासायला हवं, असा संदेश देणाऱ्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा.

Comments