शुभमंगल? सावधान...

तुळशीचं लग्न दोन-तीन दिवसांवर आलंय,
मग आपल्याकडे लग्नाची धूम सुरू होणारेय.

ज्या मुलामुलींची लग्नं ठरलीयेत
त्यांच्या मनात धाकधूक असणारेय,
आपला निर्णय बरोबर आहे ना?
माणसं मिठासारखी नसतात, जी कायम खारटच राहतील. गौतमने व्यक्त केलेली ही अनिश्चितता जाणूनच निर्णय घ्यायला हवा.

‘मी ज्याच्यासोबत एक दिवस काढला नि प्रेमात पडले, तो गौतम आणि आताचा लग्न ठरल्यानंतरचा गौतम वेगळा आहे. तो खूप बदललाय. लग्नानंतरही तो बदलत राहिला तर मी काय करू? एकदा लग्न झालं की मी मागे नाही वळू शकणार, मग आताच घाई कशाला?’

"मुंबई पुणे मुंबई २'मधल्या गौरीची ही अवस्था आपल्यापैकी बहुतेकांना ओळखीची आहे. प्रेमात पडून लग्न करा किंवा आईवडिलांनी ठरवून, निर्णय योग्य आहे ना, नंतर आपण निभावून नेऊ शकू ना, नीट होईल ना सगळं, तो/ती बदलणार तर नाही लग्नानंतर, असे असंख्य प्रश्न असतातच सर्वांसमोर. प्रश्न वर्षानुवर्षं आहेत, आता ते बाहेर पडू लागलेत. विशेषत: मुलींच्या तोंडून. मुलाकडच्यांनी बैठकीच्या वेळी हुंडा मागितला म्हणून लग्न मोडणाऱ्या मुली आणि "जब वी मेट'मधल्या गीतसारखं "जैसे कोई ट्रेन छूट रही है' असं वाटणाऱ्या मुली. साखरपुड्यानंतर लग्न मोडणाऱ्या मुली किंवा लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मला हे जमणार नाही, असं म्हणत "लव्ह आज कल'मधल्या दीपिकासारख्या माहेरी निघून येणाऱ्या मुली. स्वत:चा आतला आवाज ऐकून निर्णय घेणाऱ्या अशा मुली आजकाल आजूबाजूला जरा अधिकच दिसू लागल्यात, असं वाटतंय का तुम्हालाही?

मग, ‘शुभमंगल सावधान’ ऐकताच बोहल्यावरून पळून जाण्याबद्दल जे आपल्याला ऐकून माहीत आहेत, त्या समर्थ रामदासांचं काय? ते तर शेकडो वर्षांपूर्वीचे ना. का त्यांना ‘सावधान’ हा शब्द इतकं सावध करून गेला की, ते थेट पळूनच गेले?

म्हणजे लग्नापूर्वीची ही अनिश्चितता, संसाराचा खेळ मांडण्यापूर्वीच तो सोडून जाण्याची तयारी शतकानुशतकांपासूनची आहे. आज केवळ शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अन‌् आईवडिलांच्या विश्वासास पात्र असणाऱ्या मुलींमुळे ती व्यक्त होतेय. आपण करतोय ते चूक की बरोबर, ही शंका इतरही अनेक प्रसंगी आपल्या मनात असते. नोकरी किंवा घर बदलताना, शिक्षणासाठी प्रवेश घेताना. एवढंच काय, कपडे, गाडी, दागिने खरेदी करतानाही डोक्यात येतंच, हे घेऊ की ते? मग लग्नासारखा महत्त्वाचा, आयुष्यभरासाठीचा, दोन जीव नव्हे तर दोन कुटंुबं जोडणारा निर्णय घेताना पोटात बाकबूक तर होणारच ना?

एकदा लग्न झालं की, होता होईतो ते टिकवायचं, मोडायचं नाही. डोलीत बसून आत यायचं ते तिरडीवरच बाहेर पडायचं, असं अगदी आता उरलं नसलं तरी अजूनही घटस्फोटाकडे भुवया उंचावूनच बघितलं जातं. घटस्फोट होणं म्हणजे गुन्हा आहे, अपराध आहे, असाच समज आजही दिसून येतो. घटस्फोिटत महिलेकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं, हा या लेखाचा विषय नव्हे. परंतु, तेही लग्न टिकवून ठेवण्यामागचं, सहन करण्यामागचं, तडजोड करत राहण्यामागचं मोठं कारण असतं, हे नाकारून चालणार नाही.

म्हणजे शेकडो माणसं यात संबंधित असतात, त्यांच्यात हे नवराबायको गुंतलेले असतात. किंवा, या नवराबायकोत या सर्व आप्तेष्टांचा जीव गुंतलेला असतो. त्यामुळेही लग्न मोडणं कठीण होत असतं.

म्हणून आजवर मुली गप्प बसत आल्या. साखरपुड्याच्या वेळची एखादी घटना, एखादा महत्त्वाचा प्रसंग विसरणं, वेळ न पाळणं, शब्द न पाळणं, खोटं बोलणं, फसवणं या किंवा अशाच कारणांमुळे अनेकदा मुलींना, किंबहुना मुलांनाही, लग्नाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावासा वाटत असतो. परंतु, आता सगळी तयारी झालीय, पत्रिका वाटल्यात, पाहुणे आलेत, खरेदी झालीय वगैरे कारणांमुळे तो प्रत्यक्षात आणला जात नाही.

लोक काय म्हणतील, आपली छी-थू होईल, याचा सामािजक दबाव तर असतोच प्रचंड. पण म्हणून अनिश्चितता नसते, असं मानणं चुकीचं ठरेल. ती अत्यंत साहजिक आहे. 

मुलीसाठी - कारण ती आपलं घर सोडून दुसरीकडे जाणार असते, अनेक अर्थांनी तिचं आयुष्य बदलणार असतं. 
मुलासाठी - त्याच्या घरी एक परकी/ओळखीची मुलगी येणार असते, तिच्या भल्याबुऱ्याला तो जबाबदार धरला जाणार असतो. ती आपल्या घरी नीट रुळते की नाही, याचाही प्रचंड तणाव मुलांवर असतो.

लग्नापूर्वीची भेट, साखरपुडा, लग्नाची खरेदी, केळवणं, एकांतात झालेल्या भेटी, आवडीनिवडी, सवयी या सगळ्यांतून माणूस कळत असतो, कधी तो अावडू लागतो, तर कधी त्यातून शंका निर्माण होते. वाढदिवसाला फोन केला नाही म्हणून लग्न मोडणं, अनेकांना क्षुल्लक वाटू शकतं. परंतु, त्या व्यक्तीसाठी आपल्या स्पेशल माणसाचा असा फोन येणं महत्त्वाचं असेल, तर ते कारण क्षुल्लक नाही ठरत. कारण आयुष्यात असे अनेक वाढदिवस येणार असतात. प्रत्येक वेळी असा अपेक्षाभंग होणं सुखकारक ठरणार नसतं. हा असं कसं वागतो, ही असं कसं बोलू शकते, हे आपल्याला सहन करायला लागणार आहे, अशी भीती वाटू लागते. अाणि भीती, इतरांना कितीही वावदूक वा फुटकळ वा काल्पनिक वाटली तरी, त्या त्या व्यक्तीसाठी खरीच असते. त्या व्यक्तीने त्या भीतीचा स्वीकार करणं, तिच्याबद्दल बोलणं आणि ती पार करण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं. आता या भीतीबद्दल बोलणार कोणाशी? तर आई किंवा बाबांशी. क्वचितप्रसंगी ताई वा दादा, मित्रमैत्रीण किंवा आजीशी.

असं बोलता यावं लग्न ठरलेल्या मुलाला वा मुलीला, इतकं सकारात्मक, उबदार, आपुलकीचं वातावरण आपल्या घरात असायला हवं. संसार टिकवण्यापेक्षा आयुष्य महत्त्वाचं, हे आपण तिला सांगायला हवं. लग्न होणं, वैवाहिक जीवन हे आयुष्याचं एकमेव ध्येय असू शकत नाही. अर्थात तिला हेही सांगायला हवं की, खेळ सुरू व्हायच्या अाधी पूर्ण तयारी करून त्यात उतरलेलं चांगलं. नंतर त्याचे नियम बदलू शकतात, टीममधले सदस्य कमीजास्त होऊ शकतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं. संसाराचा खेळ दोघांनीच खेळायचा असतोही नि नसतोही. त्यात इतर सदस्य असतातही नि नसतातही. ते लक्षात घेऊनच पावलं टाकावी, हे बरं. अनिश्चितता आणि बांधिलकी या दोन्हींची सांगड घालणं उपजत येत नसतं, ते विचारपूर्वक घडवावं लागतं. त्यासाठी वेळ लागतो, प्रयत्न लागतात, इच्छा लागते आणि... प्रेम असावं लागतं. हो ना?
या सगळ्यासोबत, काहीही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा विश्वास तिला द्यायला हवा. आपल्याला परत जायला एक घर आहे, आपला स्वीकार करणारी माणसं आहेत, हा विश्वास असला की माणसाला सहन करायचीही शक्ती मिळते आणि तो परिस्थिती सुधारायचा अधिक प्रयत्न करतो. "मुंबई पुणे मुंबई २'मधला गौतम म्हणतो तसं, अनिश्चितता कायम राहणार आहे, आपण जिवंत माणसाबद्दल बाेलतोय, कायम खारटच राहणाऱ्या मिठाबद्दल नव्हे, याचं भान ठेवून निर्णय घ्यायला शिकवायला हवं. मुलींना आणि मुलांनाही.

Comments