Railkatha - 9 - Interesting conversations.


लोकलमध्ये कानावर पडणारी संभाषणं कधी मनोरंजक असतात, तर कधी विचारात पाडणारी. कधी मात्र चिंताजनक. त्यातली काही...

काल रात्री टिटवाळा फास्टमध्ये उभी होते, फारशी गर्दी नव्हती. समोर एक मुलगी इअरफोन घालून गाणं ऐकत होती. घाटकोपर गेल्यावर तिला एक फोन आला आणि ती इअरफोन काढून बोलू लागली. तिचा कुणाल नावाचा मित्र एकदोन दिवसांपासून गायब होता, त्याला बायको आणि लहान मूल असतानाही त्याने असा फालतूपणा कसा केला, असं ती पलिकडून बोलणाऱ्या मैत्रिणीला म्हणत होती. फालतूपणा, म्हणजे तो पळून गेला असावा बहुधा. मुलुंड येईपर्यंत मला एवढंच कानावर आलं. अजून अस्वस्थ वाटतंय की, तो नक्की पळून गेलाय, की बेपत्ता आहे? सापडला का?

पंधराएक दिवसांपूर्वी एक मुलगी माझ्या मागे उभी होती. तिने फोन लावला आणि विचारलं तुम्ही अमुकचे बाबा बोलताय का. समोरून हो आल्यावर म्हणाली, माझा धाकटा भाऊ आणि तुमची मुलगी यांचं अफेअर होतं. पण काही कारणाने माझ्या भावाने ब्रेकअप केलंय. तर ती काही ते मानायलाच तयार नाहीये. ती सारखी त्याला फोन करते, आता परीक्षा तोंडावर आलीय. तुम्ही प्लीज तिच्याशी बोला, तिला सांगा अभ्यासात लक्ष घाल. हवं तर आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकतो, पण प्लीज तिला तुम्ही समजवा, ती आमचं ऐकत नाहीये. ही मुलं बहुधा जळगावात मेडिकलचे विद्यार्थी होते.

ते ऐकूनही मी अस्वस्थ होते दोन दिवस. या मुलीच्या बापाने तिला खडसावलं असेल का, काय थेरं लावलीत ही म्हणून? ती समजली असेल का? ती तिच्या जिवाचं काही बरंवाईट तर करणार नाही?

दादर ठाणे लोकल. शेजारी दोघी बहिणी होत्या, एकीचा लहान मुलगा होता. त्याच्या डोक्यावरनं पदरासारखी ओढणी घालून त्याची आई म्हणू लागली, माझी शोनी मृण्मयी ती!

मी न राहवून विचारलंच तिला, त्याचं नाव काय आहे?

मृण्मय, ती म्हणाली.

लोकलमध्ये कानावर काय काय पडतं, ते लिहिलं तेव्हा काही जणांचं मत होतं की, त्याकडे सरळ दुर्लक्ष करावं. तर माझे पत्रकारितेतले ज्येष्ठ सहकारी दिवाकर देशपांडे म्हणाले की, पत्रकारांनी कान व डोळे उघडेच ठेवले पाहिजेत. मला ते जास्त पटतं. कधीकधी अशा संभाषणातून एखादी स्टोरी मिळू शकते.

सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. फर्स्ट क्लासच्या डब्यातून मी मुलुंडहून दादरला येत होते. समाेर बसलेली बाई पूर्ण अर्धा तास फोनवर होती, तिचं बोलणं मला सहज ऐकू येत होतं. त्यातून मला कळलं ते असं...

तिचा मुलगा मर्चंट नेव्हीत होता आणि पहिल्याच असाइनमेंटला काही महिन्यांपूर्वी शिपवर गेला होता. पॅसिफिक किंवा कुठे तरी लांब त्याचं शिप होतं. तिथे त्याला रॅगिंग होत होतं खूप आणि खाण्यापिण्याचंही गणित जमलेलं नव्हतं, काम अंगमेहनतीचं होतं बरंच. यामुळे त्याचे तब्येत बिघडली आणि त्याला भारतात यावं लागलं. तो रुग्णालयातनं घरी आला होता आणि विश्रांती घेत होता. त्याला अजिबात परत जायचं नव्हतं. पण, या आईचं म्हणणं होतं की, सुरुवातीला असं होतंच, परत होईलच असं नाही. त्याने जावं परत, असा तिचा आग्रह बोलण्यातनं स्पष्ट कळत होता. त्या मुलाचं काउन्सेलिंगही सुरू होतं. ती बहुधा त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत होती, आणि तिने या मुलाला समजून सांगावं, की परत जाणं कसं हिताचं आहे वगैरे.

मर्चंट नेव्हीचं, त्या गलेलठ्ठ पगाराचं आकर्षण अनेकांना असतं. परंतु ही परिस्थिती त्यातल्या किती जणांना माहीत असते? तेव्हा मला यावर काही लिहायची इच्छा होती, परंतु काही कारणाने ते जमलं नव्हतं.

Comments