हा फरक जाणवतो का?

स्त्रिया आणि पुरुष साठीनंतर वा निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा, जीवनशैलीतील बदलाचा ज्या पद्धतीने स्वीकार करतात, त्यात फरक जाणवतो. स्त्रियांना नोकरीच्या वा संसाराच्या रगाड्यामुळे हुकलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करायच्या असतात तर पुरुष दिशाहीन झालेले असतात, असं सर्वसामान्य निरीक्षण आहे. याला अपवाद आहेतच. परंतु, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात, नवं काही शिकण्यात तरी स्त्रिया पुढे आहेत, असं मत मांडणारं हे टिपण.

माझ्या सासूला, जिजीला, अनेक दिवसांपासून स्मार्टफोन हवा होता. तिचा आताचा फोन टच अँड टाइप प्रकारचा होता, त्यामुळे टचफोन वापरायची तिला सवय होती. त्यात कॅमेराही होता, ती फोटोही काढत असे, विशेषत: ती निगुतीने वाढवत असलेल्या फुलांचे. पण काही महिन्यांपासून तिच्या ओळखीतल्या अनेकांनी तिला तुम्ही व्हाॅट्सअॅपवर आहात की नाही, असं विचारल्याने तिलाही स्मार्टफोन हवासा झाला. मी एखाद्या वेळी म्हटलं, जाऊया घ्यायला फोन तर म्हणायची, राहू दे गं. असं दोनतीनदा झालं. अखेर मागच्या रविवारी सकाळीच आम्ही बाहेर पडलो. मी विंडोज फोन वापरते, तिलाही लुमिया घ्यायचं ठरवलं. ज्या दुकानातून माझा फोन घेतला होता, (हो, दुकानच. मला आॅनलाइन खरेदीची अजून सवय नाही) तिथेच गेलो. तिथल्या मुलाने आधीच विचारलं, फोन कुणासाठी घ्यायचाय. जिजी, मला असं म्हणाल्यावर त्याने एक फोन दाखवला आणि त्याची टकळी सुरू झाली.
"सीनिअर सिटिझन्सना स्मार्टफोनचं वेड लागलंय, अॅट लीस्ट मुलुंडमधल्या लोकांबद्दल मी नक्की सांगू शकतो. इंटरनेट, व्हाॅट्सअॅप, स्काइप, कॅमेरा या सगळ्याने ते खूप एक्साइट झालेत. त्यांना काय करू नि काय नको असं झालंय. त्यांना खूप जाणून घेण्याची उत्सुकता तर आहेच, पण हे नव्याने हातात आलेलं तंत्रज्ञान वापरण्याचा उत्साहही खूप आहे.'
तो जे म्हणत होता, ते मला तंतोतंत पटतंय. माझी आई आणि जिजी दोघी या उत्साही पिढीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या. आई निवृत्तीनंतर विद्यापीठात जाऊन रीतसर कानडी शिकली, दहाएक वर्षांपूर्वी. घरी कानडी पेपर घेते, कानडी टीव्ही पाहते. हळुहळू ती कानडीतून मराठीत छोटे छोटे अनुवाद करू लागली. मग तिला आमच्या शेजारी एक कानडी मैत्रीण मिळाली, जिला आईच्या कानडी शिकण्याचं आणि अनुवादाचं कौतुक आहे. आता आईने अनुवाद केला की तिला नेऊन दाखवते. तिच्यामुळेच आईला कानडी बोलायची सवय होतेय, जे एरवी कठीण झालं असतं. गेल्या वर्षभरात आई संगणकावर देवनागरी टाइप करायला शिकली. घरी कोणी नसताना संगणक सुरू करून, फाइल क्रिएट करून त्यात टाइप करून ते सेव्ह करेपर्यंतचा टप्पा तिने गाठलाय. आता भावाने मॅकबुक घेतलंय, आणि तिच्या नातवाने तिला तेही शिकवण्याचा चंग बांधलाय. थोड्याच दिवसांत ती मॅकवरही देवनागरी टाइप करू लागेल, यात शंका नाही. ती एक लघुकादंबरी अनुवादतेय सध्या. तिची एक अनुवादित कथा मुक्त शब्द दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.
आई मोबाइल अनेक वर्षांपासून वापरतेय. एसएमएसचाही वापर ती बराच करते. जो माझे वडील करत नव्हते, वा सासरे करत नाहीत. सासऱ्यांना त्यांच्या वयाच्या, इतर अनेक पुरुष ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच मोबाइलवर फक्त काॅल करता येतो वा काॅल घेता येतो. नंबर सेव्हही करता येत नाही, वा सेव्ह केलेला नंबर शोधता वगैरे येत नाही.
परंतु, जिजी फोनचा उत्तम वापर करत होतीच, आता स्मार्टफोन हातात आल्यापासून तर तिचा वेळ कसा जातोय तिलाही कळत नाहीये. काल तर चक्क तिने फोनवरून फेसबुकचं स्टेटस अपडेट केलं, तेही देवनागरीत. देवनागरीचा कीबोर्डही तिची तीच शिकली. व्हाॅट्सअॅपवर आता मेसेजेस करायला शिकलीय. आज तिने तिचे फोटो डीपी लावलाय. जिजी संगणकावर फेसबुक वापरू शकते, गेम्स खेळू शकते तसंच यूट्यूबवर जाऊन तिच्या हुकलेल्या मालिकाही पाहू शकते.
मला हे फार लोभस वाटतं. या पिढीची जगण्याची, आयुष्य उपभोगण्याची लालसा महत्त्वाची आहे. त्या नोकरीतून निवृत्त झाल्यात पण आयुष्यातून नाही. स्वयंपाकघरात, घरातच तयार केलेल्या छोट्या बागेत त्यांचे अनेक प्रयोग सुरू असतात. मोबाइल, संगणक, फूड प्रोसेसर आदि उपकरणं त्या सहजी वापरतात. त्यांनी त्यांच्या सुनांबरोबर जुळवून घेतलंच आहे, पण नातवंडांशी त्यांचं खूप मैत्र आहे. त्या त्यांच्याकडून रोज काहीतरी नवीन शिकत असतात. चुकल्या तर नातवंडांचा ओरडा खातील, पण विचारत राहतील जे कळत नाहीये ते. सणावाराचाही यांचा उत्साह खूप आहे, जो प्रामुख्याने सणविशिष्ट पदार्थ करून खाऊ घालण्याचा आहे. खरेदीचा सोस आता फारसा उरलेला नाही. वाचन तर जोडीला आहेच.
हे असे उत्साही पुरुष माझ्या तरी पाहण्यात फारसे आलेले नाहीत. तुमच्या माहितीत असतील तर नक्की त्यांच्याबद्दल लिहा.

Comments