ताज्या ताज्या माळव्याचा भार

अनेक दिवसांनी निव्वळ भाजी आणायला म्हणून मुलुंड पश्चिमेच्या बाजारात गेले काल सकाळी, मी, माझी शेजारीण मीनल आणि तिचा दोन वर्षांचा छोट्या जयंत. तिला त्याला भाजी बाजारात फिरवून आणायचं होतं. मला ते विशेष वाटलं कारण बऱ्याच आयांसाठी मुलांना घेऊन भाजी आणायला जाणं ही मोठी त्रासाची गोष्ट असते, अगदीच घरी कोणी नसेल सांभाळायला तर या मुलांना बाजार फिरायला मिळणार. माॅलमध्ये भले दर वीकेंडला जातील. असो.
शाळेत असताना, रविवार संध्याकाळ आईबाबांसोबत बाजारात जायचा जणू नियमच होता. चालत चालत जायचं, वाटेत एक मोठ्ठी चिंच होती, कोवळा पाला असला तर बाबा तो काढून देत, तो खायचा. धाकटा भाऊ रस्ताभर बोलिंगची अॅक्शन करत असायचा, हे पक्कं आठवतंय. बाजारात भाज्या, फळं घ्यायची. कधीतरी हाॅटेलात जाऊन दोसा खायचा. या बाजाराच्या फेरीमुळे चांगल्या ताज्या भाज्या म्हणजे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे डोक्यात बसलंय फिट्ट. आमच्या घरातच खरं तर भाज्यावेडी माणसं होती. मोठे काका मनमाडला राहायचे, कामानिमित्त मुंबईत येत तेव्हा हमखास मोठी पिशवी भरून त्या त्या मोसमातल्या भाज्या असत. कधी टमाटे (हा खास त्यांचा शब्द), कधी मटार, कधी पालेभाज्या. एक काका वाईला असतो, तोही येताना एक पिशवी भाज्यांची असायचीच, अजूनही असते. महाबळेश्वरची केशरी गाजरं आणि बटाटे, कृ़ष्णाकाठची वांगी, चाकवत, आमच्याकडे ज्यांना काळे पोलीस म्हणतात ते काळे दाणे (घेवड्याचा एक प्रकार), पेरू असं काही. त्यामुळे भाजी आणायला जाणं हा माझ्यासाठी आवडीचा विषय, आता बास ओझं असं स्वत:लाच बजावून सांगावं लागतं दर वेळी.
गेल्या आठवड्यात या काकाश्रींनी चक्क चाकवत कुरियरने पाठवला. मुंबईत मिळत नाही सगळीकडे आणि आम्हाला अतिशय आवडतो म्हणून. काय झाला होता ताकातला चाकवत, आहाहा.

 काल सकाळी मुख्य उद्देश होता मटार आणि गाजरं आणणं. पण मटार काही फार चांगला नव्हता, एकच किलो घेतला. एक भाजीवाली बाई म्हणाली, रविवारी नसतो म्हणे. म्हणजे आता शनिवारी जाणं आलं. गाजरं मात्र होती छान गुलाबी. पालेभाज्या तर इतक्या होत्या, पण अंबाडी घेतली हिरवीगार. आवळे घेतले. फोडणीची खाराची मिरची करायची होती म्हणून मिरच्या नि लिंबं. चवळाईच्या शेंगा होत्या ताज्या, ती एक जुडी. संत्री तर आवश्यकच. आणि लालबुंद टोमॅटाे. नि कोथिंबीर.
जयंत सोबत असल्याने त्याला थोडी भाज्यांची नावं सांगत होतो. तशा त्याच्या ओळखीच्या होत्याच बऱ्याच. राधाचं घर ही त्याची आवडती पुस्तकं असल्याने त्यातल्या चित्रातनं अनेक भाज्या त्याला माहीत होत्या. लिंबं, आवळे त्याने टोपलीत भरून दिले भाजीवाल्याला. गाजर मिळालं एक त्याला बक्षीस, ते खात खात स्वारी फिरत होती.


घरी आल्यावर आईने मटार सोलून ठेवले. आवळ्याच्या निम्म्या फोडींना तिखटमीठमसाला लावून ठेवलं. उरलेल्यांवर साखर पेरून मायक्रोवेव्हमध्ये पाकवलं. गाजरं किसून हलवा केला. मिरच्यांचे बारीक तुकडे करून मोहरीमेथी फेसून लिंबं पिळून कालवून ठेवल्या. आठवड्याभरात होतील मुरून तयार.
अंबाडीच्या भाजीत तांदळाच्या कण्या घालतात आंबटपणा कमी करायला, पण मी जास्त तांदूळ घालून त्याचा अंबाडीभात केला सरळ. वरून लसूण व लाल मिरचीची फोडणी. आंबट लागलाच जरा, पण मजा आली गरमागरम खायला.
खूप दिवसांनी या भाज्यांमध्ये रमले. आता पुढची फेरी होईल उंधयूसाठी.

Comments