सासवड साहित्य संमेलन २०१४

८७व्या साहित्य संमेलनाची काही क्षणचित्रं. ही समीक्षा नाही, निव्वळ निरीक्षणं आणि काही टिप्पण्या. यातून कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही.
पुण्याहून सासवडच्या दिशेने जाताना वाटेत एकही फ्लेक्स, दिशादर्शक नव्हता ज्यावरून हे कळावे की एवढा मोठा समारंभ पुण्यापासून २०/२५ किमी अंतरावर सुरू आहे. पहिली खूण होती फुरसुंगीच्या आसपास, सासवडच्या १४ किमी आधी. तोपर्यंत विचारत विचारत जाणे नशिबी होते.
संमेलनस्थळी सुरक्षा व्यवस्था होती का, असा प्रश्न पडावा. म्हणजे पोलिस नसल्याने सगळं कसं फ्रेंडली होतं, पण कुठेही मेटर डिटेक्टर नाही, बॅगांची तपासणी नाही, ओळख पटवणे काही नाही. म्हणजे तीन दिवस कोणत्या अघटिताविना पार पडले याला निव्वळ सुदैव म्हणावे लागेल. जयपूर लिटरेचर फेस्टिवलशी तुलना या ठिकाणी अटळ वाटते. तिथेही सुमारे पाच लाख माणसं येतात, पाच दिवसांमध्ये मिळून. परंतु, प्रत्येकाला, ओळखपत्र घेऊन, सुरक्षा तपासणीनंतरच प्रवेश मिळतो. त्या ओळखपत्रावरील बारकोड स्कॅन होतो, त्यामुळे येणाऱया व्यक्तींची निश्चित संख्या कळू शकते. तुम्हाला तिथे जेवायचे नसेल तर एकही पैसा मोजावा लागत नाही.
मुख्य मंडपात पुरुष व महिलांसाठी वेगळी सोय होती. पुरुष खुर्ची, महिला खुर्ची, प्रतिनिधी खुर्ची अशा स्पष्ट सूचना होत्या. अधिक बोलणे न लगे.
सासवडला झालेली गर्दी बहुधा संयोजकांना अपेक्षित नव्हती. त्यामुळे व्यवस्था कोलमडली का, पुस्तक प्रदर्शनातील स्टॉल्सच्या आडनिडय़ा रचनेमुळे पुस्तकप्रेमी निराश झाले का, माहीत नाही. पण एवढे लोक संमेलनाच्या ठिकाणी पोचले आणि सर्व कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली, हे महत्त्वाचे. गर्दीमुळे स्वच्छतागृहांचा विषय निघणे अपरिहार्य आहे. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे संख्येने बरीच होती, असा दावा आयोजक करू शकतात. परंतु, स्वच्छतागृहे म्हणजे फक्त आडोसा एवढा संकुचित अर्थ असेल तरच ते शक्य आहे. पाणी नाही, स्वच्छता कर्मचारी नाहीत, मग ते स्वच्छतागृह कसे राहील? खरे तर जिथे संमेलनाचा मुख्य मंडप होता, त्या मैदानाचे नावच आहे पालखी मैदान. सासवड हे पंढरपूरच्या वारीच्या वाटेवरचे गाव. या गावी, याच मैदानावर पालखीचा एका रात्रीचा मुक्काम असतो. म्हणजे तेव्हाही लाखो लोक गावात असतात. मग, या निमित्ताने काही कायमची शौचालये, स्वच्छतागृहे बांधता आली असती, जी वर्षानुवर्षे पंढरपूरच्या वारकऱयांनाही उपयोगी पडली असती.
सर्व संमेलनातून असते तशी येथेही खाऊच्या स्टॉल्सवर प्रचंड गर्दी होती. पदार्थही चटकदार, वैविध्यपूर्ण होते. परंतु बऱयापैकी महाग. साधी कॉफी २० रुपये तर चहा १० रुपये होता. तीन छोटय़ा इडल्यांसाठी ३० रुपये मोजावे लागत होते.
पुस्तकांच्या प्रदर्शनात शनिवारी दिवसभरात पायही ठेवण्याएवढी जागा नव्हती. त्यामुळे मुद्दाम प्रदर्शन पाहण्यासाठी व त्या क्षेत्रातील काही परिचितांना भेटण्यासाठी रविवारी गेलो असता, गर्दी सुरू होत होती. त्यामुळे फिरता आले परंतु स्टॉल्सची रचनाच इतकी विचित्र होती की माणसांना सहजी आतबाहेर करता येणे कठीण होते. त्यामुळे समोरच असलेल्या स्टॉल्सचाच फायदा झाला असावा.
आता थोडे बाल आनंद मेळाव्याविषयी. हा मेळावा म्हणजे आनंदच होता, काही अपवाद सोडले तर. सासवडचाच असलेला फूबाईफू फेम निलेश साबळे आणि अथर्व कर्वे यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. यंदा प्रथमच लहान मुलांसाठीचा कार्यक्रम मुख्य मंडपात झाला आणि त्याला प्रेक्षकांनी जबरदस्त हजेरी लावली होती. मात्र यातील काही कार्यक्रम निव्वळ अस्थानी होते. समूहनृत्य, गणेशवंदना(स्वागताध्यक्षांच्या पुतणीने केलेले नृत्य), औरंगजेबाचा एकपात्री प्रयोग जो वेळ संपल्यामुळे मध्येच बंद केला गेला, या कार्यक्रमांनी मनोरंजन लहानांचे तरी झाले असेल का अशी शंका आहे. याच दरम्यान स्वागताध्यक्षांच्या विहिणबाइभचा वाढदिवस स्टेजवर हॅपी बर्थडे टू यू म्हणून साजरा करण्यात आला. पुण्याच्या महापौरांनी फ.मुं.चे म.फुं. असे बारसे केले. संगीतकार वडील आणि त्याचा मुलगा व मुलीने गायलेली गाणी असाही एक कार्यक्रम अधूनमधून सुरूच होता. त्यातच मध्ये सारेगमफेम कार्तिकी गायकवाड आली, तिने तिची हमखास यशस्वी ‘घागर घेऊन’ आणि ‘नवरी नटली’ ही गाणी गायली आणि निघून गेली. भावेकाका ऊर्फ अनंत भावे यांनी चंद्रपूर संमेलनात सादर केलेल्याच दोन कविता येथेही सादर केल्या. त्यात कासव चाले हळुहळू मुलांच्या फारशी पचनी पडली नाही. पण लालम लालला मुलांनी बऱयापैकी प्रतिसाद दिला.
मात्र, याचदरम्यान एका नगरसेविकेने (यांचे नाव कोणी सांगितल्यास बरे होईल, मला समजू शकले नाही.) मुलांकडून व्हॉइस मॉडय़ुलेशनचा खूप मस्त वापर करून घेतला आणि पाच मिनिटंच का होईना मंडपात चैतन्य आणले. मसालेभात, आम्ही नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात या चार ओळी वेगवेगळय़ा पद्धतीने त्यांनी मुलांकडून म्हणून घेतल्या. त्यांचे कौतुक आहे.
राजीव तांबे यांनी सांगितलेल्या प्रेमळ भुताच्या गोष्टी बऱयाच आवडल्या असाव्यात कारण त्यानंतर लगेच रोहन प्रकाशनच्या स्टॉलवर या गोष्टींची पुस्तके घ्यायला झुंबड उडाल्याचे कळले.
मेळावा संपल्यानंतर लगेच झेंडूची फुले हा विडंबनगीतांचा कार्यक्रम होता. रामदास फुटाणे त्याचे अध्यक्ष होते. यातील राजकीय विडंबनांना जी तूफान दाद मिळाली त्यावरून लक्षात आले की आपण राजकीयदृष्टय़ा किती जागृत आहोत. नारायण सुमंत, बंडा जोशी, संदीप अवचट, संजय वरकड आदींनी विडंबनगीते गाऊन भरपूर टाळय़ा घेतल्या. त्यात लिंबोणीच्या झाडाखाली मित्र थांबला गं बाई, आज माझ्या पालकांना झोप का ग येत नाही, मंदा ही बावळी सान्यांची, कर्जात महाराष्ट्र माझा, आम्ही आडनावाचे शेतकरी रे, या कविता विशेष लक्षात राहणाऱया. पाटलीणबाइभच्या गळय़ात 16 तोळे सोने तर देशमुखीणबाइभच्या गळय़ात 18 तोळे सोनं. ‘गळय़ातल्या सोन्याचा हिशेब तोळय़ांवर आणि दोघी उठून सकाळी माळावर’ ही सुमंत यांची टिप्पणी हसवता हसवता गंभीर करून गेली.
अर्थात कमरेखालचे किंवा अगदीच पीजे पातळीवरचे विनोदही यात झाले परंतु ते अटळ म्हणावे लागेल. यात लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे सतत फुटाणे आवाहन करत होते की आमच्या काव्यात जी नावे येतायत त्याच्याबद्दल राग मानू नका, नावे घेतल्याशिवाय विडंबन होणार नाही, चिडू नका, निषेध वगैरे करू नका. महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांची नावे या कवितांमधून येत होती. त्यामुळे मोर्चा वगैरे नका काढू, असं सतत सांगावं लागत होतं. समाज किती असहिष्णु झालाय आणि कलावंतांना त्याची किती दहशत वाटते, याचेच हे लक्षण नव्हे का?
रजा घेऊन गेल्याने, एक दिवसभर संमेलन एन्जॉय करून रविवारी दुपारी मुंबईकडे परतताना, कात्रज बायपासच्या जवळ कुठेतरी एका पेट्रोल पंपाजवळ दहाबारा शेतकरी भाज्या व फळं घेऊन बसलेले दिसले. गाडी थांबवली. ताजे गुलाबी पेरू, अंजिरं, काटेरी वांगी, मटार, भेंडी, काळय़ा दाण्यांच्या शेंगा, पालक, कोथिंबीर, हरभऱयाचे घाटे असं खरेदी केली आणि परतलो. भाज्या मुंबईपेक्षा स्वस्त होत्याच परंतु आम्ही दिलेले सर्व पैसे थेट शेतकऱयाच्या हातात पडले होते, याचा आनंद वाटला.

Comments