सोलापूरशी सलगी

 पंधराएक दिवसांपूर्वीची गोष्ट. सोलापूरच्या सेवा सदन प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी येऊ शकाल का, असं विचारणारा फोन आला. मला जरा गंमत वाटली. मी आतापर्यंत कधीच अशी जाहीर कार्यक्रमात गेलेले नाही, बोललेले तर अजिबात नाही, तरीही का बोलवत असतील असं वाटलं. मग लक्षात आलं, दिव्य मराठी आणि मधुरिमाच्या लोकप्रियतेचा हा परिणाम आहे. मी हो म्हटलं. पण त्यांना काही अटी घातल्या होत्या. दहा मिनिटांच्या वर बोलणार नाही, मुली कंटाळलेल्या असतात, त्यांना अधिक पिडायचा काहीएक अधिकार नाही. तळहातापेक्षा मोठ्या आकाराची कोणतीही भेट व पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही. प्रशालेच्या प्राचार्य उषा हंचाटे यांनी अटी मान्य केल्या म्हणून जायचं नक्की केलं.
सोलापूरला मी पहिल्यांदा गेले तीच दिव्य मराठी लाँच होण्याच्या निमित्ताने. त्या शहरात कोणीएक ओळखीचं नव्हतं, अगदी आमच्या सहकाऱ्यांपैकीही. पण ते गाव मला पहिल्या भेटीतच आवडलं होतं. आणि गेल्या जवळपास चार वर्षांत काही व्यक्तींशी खूप छान मैत्री झालीय, त्यामुळे त्यांना मी दरवेळी सोलापूरला गेले की भेटत असते. काल व परवा दोन दिवस सोलापुरात होते. मंगळवारी दुपारी दत्त चौकातल्या शुभराय मठात असणाऱ्या उद्योगवर्धिनीत गेले. चंद्रिका चौहान या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. गुजराती पद्धतीची साडी, मराठीला किंचित गुजराती/राजस्थानी हेल. ताई बोलू लागल्या की समोरचा ऐकत राहतो. उद्योगवर्धिनीतर्फे गेल्या दहा वर्षांत शेकडो महिलांना रोजगार मिळालाय, आधार मिळालाय. सध्या सोलापुरातल्या जवळपास साडेतीनशे ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना इकडे तयार केलेले डबे रोज जातात. त्यातले बरेच रोटरी वा इतर संस्थांनी स्पाॅन्सर केले असले तरी पन्नासेक डबे संस्थेतर्फे जातात. खेरीज दिवाळी फराळ, सोलापुरातली प्रसिद्ध कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगा पोळ्या, कापडी पिशव्या यांचं काम सुरूच असतं सतत. अनेकींना शिवण, शोभेच्या वस्तू बनवणे, पापड करणे अशी कौशल्य शिकवलीही जातात. सध्या पालावरच्या शाळेसारखा उपक्रम सुरू आहे. ताई हे सगळं सांगत होत्या नि मी ऐकत होते. एवढी ऊर्जा त्यांच्यात कुठून येते, असं वाटत होतं. ताई फार शिकलेल्या नाहीत, पण प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि सतत काहीतरी करायची धडपड ही त्यांची जमेची बाजू. सर्व प्रकारच्या माणसांना सामावून घेत त्या पुढे जात असतात. सोलापूर भेटीतलं एक जेवण त्यांच्याकडे लागलेलं असतंच. पहिल्या मजल्यावरच्या मठातून पाखर संकुल हा निराधार मुलांसाठी उपक्रम चालवणाऱ्या शुभांगी बुवा आमच्या सोबत असतातच. त्यांचाही उत्साह वयाच्या साठीनंतरही वाखाणण्याजोगा. आयुष्य संकुलाला वाहून घेतलेलं. सध्या वीसहून अधिक मुलं संस्थेत आहेत, दत्तक प्रक्रियेची वाट पाहात. ताई सोलापुरातल्या इतरही लहान मुलांसाठी अनेक छोटे छोटे उपक्रम चालवत असतात.
संध्याकाळी सेवा सदनात गेले. रमाबाईंनी पुण्यात सेवासदन सुरू केल्यानंतर काही वर्षांनी सोलापुरात ही शाळा भरू लागली. नव्वदहून अधिक वर्षं झाली आहेत. कमी ते अत्यंत कमी उत्पन्न गटातल्या मुली प्रामुख्याने शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, वसतिगृहातही अनेक जणी राहतात, ज्या सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागांतून आलेल्या आहेत. मी गेल्यावर त्यांच्या पंतप्रधान विद्यार्थिनीने स्वागत केलं. ती दहावीत आहे, वसतिगृहात राहाते. तिची आईही शाळेतच शिकवते, परंतु ती तासभर अंतरावर असलेल्या गावाहून रोज येजा करते. पंतप्रधानांची निवड रीतसर निवडणुकीनंतर झालेली असते.
कार्यक्रम छोटासाच होता. त्यांच्या हस्तलिखिताचं प्रकाशन झालं. मी थेट माझ्या शाळेत पोचले. आम्हीही दरवर्षी हस्तलिखित करायचो. अक्षर चांगलं असल्याने अनेक पानं मी लिहून काढलीत. मी सात आठ मिनिटं मुलींशी गप्पा मारल्या. काहीतरी ग्यान देण्याचा प्रश्नच नव्हता, त्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची वाट पाहात होत्या. ज्या मुलीला स्टुडंट आॅफ द इयरची ढाल मिळाली, तिच्याशी बोलले नंतर. वडील मंडपाचं काम करतात, आई सावत्र. गेल्या वर्षी तिला शाळेतून काढून टाकायला आली होती ही आई, परंतु शिक्षकांनी समजावलं. दोघेही आले होते. काही मदत लागली तर नि:संकोच सांगा, यापेक्षा वेगळं मी तिला काय सांगणार होते?
नंतर मी कार्यक्रम पाहायला थांबले. खूप धमाल आली. एकही रेकाॅर्ड डान्स म्हणावा असा, म्हणजे लव्ह साँगवरचा नव्हता. जितक्या जास्त मुलींना संधी देणं शक्य नव्हतं, तितक्या मुली मंचावर होत्या. जेव्हा या मुलींच्या सहा शिक्षिका गणेशवंदनेसाठी कथ्थकच्या वेषात मंचावर आल्या तेव्हा मुलींनी शाळा डोक्यावर घेतली. त्यांच्यासाठी हे सरप्राइज होतं. मला या शिक्षिकांचं कौतुक वाटलं. शिकवायचं, घर सांभाळायचं, मुलींचे नाच बसवायचे आणि त्यावर स्वत: तयारी करायची, हे सोपं नव्हे.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सहकारी माधवी कुलकर्णी हिच्यासोबत मी सोलापुरातल्या प्रसिद्ध अशा नापासांच्या शाळेत ऊर्फ ओंकार विद्यालयात गेले. संस्थेतील प्रमुख शिक्षिका शीला पत्की, सेवा सदनच्या विद्यार्थिनी व निवृत्त मुख्याध्यापक. नकलाकार, कवीही. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी नववी नापास विद्यार्थ्यांना दहावी पास होण्याची संधी मिळवून देण्यासाठी ही शाळा सुरू केली. सोलापुरातील अनेक मंडळींनी त्यांना आर्थिक साह्य तर केलंच परंतु अनेक शिक्षिकांनी या मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. आज शाळेची स्वत:ची जागा आहे, पन्नास मुलं दहावीची तयार करत आहेत. त्यात दहाबारा मुलीही आहेत. एक मुलगी तर दोन मुलांची आई आहे, त्यांचा अभ्यास सांभाळून स्वत:च्या दहावीची तयारी करतेय. अनेकांना शाळा काही कारणांनी मध्येच सोडावी लागली आहे. शीलाताईंनी या कामाला वाहून घेतलंच आहे, पण त्यांच्यात एक चैतन्य, रसरशीतपणा आहे, जो आनंददायी आहे. त्यांच्यात कुठेही गंभीर आव नाही, हसत खेळत, खिल्ली उडवत त्यांचं काम सुरू असतं. त्यांचे वडील मोठे नकलाकार होते, त्यांनीही २५ वर्षं नकलांचे व जादूचे कार्यक्रम केलेले आहेत. तडवळकर ट्रस्टच्या सोबत हे काम चालतं.
काटीकर आजी आणि अरुणाताई गप्पा मारताना
मुलांशी गप्पा मारून आम्ही निघालो. अरुणा व प्रकाश बुरटे यांच्याकडे जेवायला जायचं होतं. दोघेही फेमिनिस्ट, अत्यंत साधी राहणी. उत्तम वाचक, व लेखक. अरुणाताई अनेक वर्षांपासून चळवळीत काम करणाऱ्या. त्यांचं घर अतिशय कम्फर्टेबल, ऊबदार आहे. साधंच करते जेवण म्हणता म्हणता भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, पोळ्या, मुटके आणि दुधीहलवा असं जेवलो. गप्पा मारता मारता डुलकी काढली. चहा पिऊन दोघी गेले डाॅ. प्रतिभा काटीकरांकडे. काटीकर आजी अरुणाताईंच्या सेवासदनमधल्या शिक्षिका, नंतर मला वाटतं त्या काॅलेजात इंग्रजीही शिकवायच्या. त्यांचा मुलगा प्रसन्न सोलापुरातला मोठा आॅर्थोपेडिक सर्जन, सून मनीषा अॅनास्थेटिस्ट. आजींशी ओळख झाली ती त्यांनी अनुवादित केलेला एक काॅलम दीड वर्षं मधुरिमामध्ये प्रसिद्ध केला त्यामुळे. त्यांचा जन्म गुजरातेतला, शालेय शिक्षण तिथेच झालं. पुढचं शिक्षण पुण्यात. आणि नंतरचं वास्तव्य सोलापुरात. आजी गुजराती, हिंदी व इंग्रजीतून मराठी अनुवाद करतात, तेही पुस्तकांचे. शोभा बोंद्रे यांच्या Not only Potels या पुस्तकाचा त्यांनी गुजरातीत अनुवाद केला आहे. चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांच्या The palace of illusions चा मराठी अनुवाद लवकरच मंजुल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होतोय. त्यांचा पुढचा अनुवादही सुरू आहे, हे सारं वयाच्या ७५नंतर. त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांचे अनुभव ऐकायलाही सुख वाटतं बघा. त्यांच्या मुलाशी व सुनेशीही छान गप्पा होतात. मधुरिमामध्ये नियमित लिहिणाऱ्या दोन डाॅक्टर या दोघांच्या बॅचमेट्स असल्याचं कळलं.
अशा रीतीने खूप मस्त जगणाऱ्या, स्वत:पलिकडे पाहून कार्यरत राहणाऱ्या माणसांना भेटून मी परतले. दर वेळी वाटतं तसं याही वेळी वाटलं, आपण काहीच करत नाही यार!

Comments