सोलापूर

सोलापूरच्या सेवा सदन प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. आठवी ते दहावीच्या पोरींची चिवचिव. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या मुलींची नटूनथटून तयारी, इकडेतिकडे धावाधाव. प्रत्यक्ष पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू होतो. दहावीतल्या मुलीचं नाव सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून जाहीर होतं. ती, तिची आई, वडील नि भाऊ व्यासपीठावर येऊन भलीमोठी ढाल स्वीकारतात. वडिलांच्या चेहऱ्यावर कृतकृत्यता असते. कारण, गेल्याच वर्षी काही कारणाने ते लेकीला शाळेतून काढण्याच्या विचारात असतात. शाळेतील शिक्षक त्यांना समजावतात, तिला शिकू द्या, असं परोपरीनं सांगतात. तिचं शिक्षण सुरू राहतं. आणि आज ती सर्वोत्तम विद्यार्थिनी झालेली असते.

दुसरी एक ११ वर्षांची चिमुरडी. आईविना पोर. वडिलांनी वसतिगृहात आणून ठेवली, तेव्हा लांबसडक केसांची वेणीही घालता येत नव्हती. फीदेखील जेमतेम भरू शकत होते वडील. पण तिला शिकायचं होतं, म्हणून ती तिथे राहतेय नेटाने. वसतिगृहातल्या जेवणाबद्दल तक्रार नाही तिची अजिबात. आता हळूहळू वेणीही घालता येतेय नीट. वडिलांना तिने तंबी दिलीय, ‘सारखासारखा फोन नका करू मॅडमना माझी चौकशी करायला, मी अगदी ठीक आहे. त्यांच्या फोनला पैसे नाही लागत का?’

कोणी स्केटिंग करणारी, कोणी बुद्धिबळ खेळणारी, कोणी भाषाप्रवीण, कोणी हस्तलिखिताचं समर्थ संपादन करणारी, कोणी विद्यार्थ्यांची प्रतिनिधी पंतप्रधान, कोणी वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी. तशीच ओंकार विद्यालयात भेटलेली दोन मुलांची आई. घर सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन ती दहावीची परीक्षा देतेय यंदा. अशा कित्येक गुणी मुली. बहुतेक सगळ्या संघर्ष करणाऱ्या. पण त्यांना याची जाणीवही नाही की, त्या लढतायत. त्यांचं शिक्षण ही इतरांसाठी दुय्यम बाब; पण त्या मुलींना शिकायचंय, हे नक्की. म्हणूनच तर त्या तशाही परिस्थितीत शाळेत येतायत, अभ्यास करतायत, पुढे शिकायचं स्वप्न पाहतायत. त्यांना आपण काय सांगू शकतो?

एवढंच की, कशाचीही मदत लागली तर मोकळ्या मनाने हाक मार, आम्ही आहोत. तू हाकच नाही मारलीस तर आम्हाला कळणार कसं की, तुला काही हवंय, तुला काही कमी पडतंय, काही खुपतंय. हाक मारलीस तर प्रतिसाद द्यायला आम्ही आहोतच. हो ना?

Comments