पैशांचा ‘ताप’

धडधाकट गरिबी व लुळीपांगळी श्रीमंती असं शिकवणारे धडे अगदी वीसेक वर्षांपर्यंत आपण शिकलो. श्रीमंत असणं हा काहीतरी गुन्हा आहे, चुकीचं आहे असंच बालभारतीमधल्या धड्यांनी जणू आपल्यावर रुजवलं होतं. परंतु, गेल्या काही वर्षांत पारडं जणू पालटलं आणि श्रीमंती हे आयुष्यातलं एकमेव ध्येय असल्यासारखे आपण पैशाच्या मागे धावू लागलाे. पैसा हे आनंद/समाधानाचं साधन आहे, साध्य नव्हे हे सध्याच्या आत्यंतिक धावपळीत वावरणाऱ्या तरुण पिढीला शिकवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागणार आहे, असं चित्र आजूबाजूला दिसतंय. या वृत्तीचे परिणाम पुढच्या पिढीत दिसू लागल्याचं उदाहरण नुकतंच वाचनात आलं. अमेरिकेत एका १६ वर्षांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवताना चार जणांना चिरडलं, दोन वर्षांपूर्वीची ही घटना. त्याच्यावरचा खटला सुरू असताना एका समाजशास्त्रज्ञाने असं म्हटलं की, हा मुलगा अॅफ्लुएंझाचा बळी आहे. आता हा अॅफ्लुएंझा काय प्रकरण आहे. इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूचा ताप. तसा हा अॅफ्लुएंझा म्हणजे श्रीमंतीचा/पैशांचा ताप. आईबापाच्या श्रीमंतीमुळे या मुलाला काय चूक काय बरोबर कळत नव्हतं, त्यांनी त्याला शिकवणच अशी दिली होती की, काहीही केलंस तरी आम्ही ते सावरू. यामुळे त्याला ना लहान वयात दारू पिणं चुकीचं वाटलं, ना दारूच्या नशेत गाडी चालवणं. त्या मुलाने पोलिसांनी पकडलं तेव्हाही अापल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप वगैरे व्यक्त न करता, मी तर फक्त दोन बिअर घेतल्या होत्या, असं म्हटलं होतं.

चार माणसांचा मृत्यू आपल्या गाडीखाली आल्याने होणं ही या मुलाला क्षुल्लक बाब वाटली कारण लहानपणापासून त्याच्या आईवडिलांनी त्याच्या प्रत्येक चुकीवर पांघरूण घातलं होतं. हे पांघरूण होतं पैशाचं. एकदा शाळेत या मुलाची काही तक्रार आली, तर त्याच्या वडिलांनी शिक्षकांना जवळपास धमकीच दिली की, ते शाळाच विकत घेऊ शकतात.

आपल्याकडे याला पैशाचा माज म्हणतात. जो आजूबाजूला अनेक व्यक्तींमध्ये दिसत असतो. या व्यक्ती स्वत: खूप पैसे कमावणाऱ्या असतात किंवा त्यांचे आईबाप श्रीमंत असतात. सत्तेचाही असा माज आल्याचं आपण वारंवार पाहात असतो. आईवडील म्हणून आपण मुलांसमोर काय आदर्श ठेवतोय, भल्याबुऱ्याची योग्य परीक्षा त्यांना होतेय की नाही, याचा विचार कमीअधिक पैसा असलेल्या सर्वांनीच करायला हवा. पटतंय ना?

Comments