सोनल, एफवाय बीकाॅमची विद्यार्थिनी. फार अभ्यासू नाही, पण अगदीच
उनाडही नाही. आईवडिलांवर फार अवलंबून नसलेली. आईवडीलही तिच्या छोट्या
छोट्या गोष्टीत दखल न घालणारे. तिची चाचणी परीक्षा सुरू होती, इंटर्नल. चार
दिवस होती परीक्षा. तिसऱ्या दिवशी रात्री आईने विचारलं, किती वाजता आहे
पेपर उद्या?
रोजच्यासारखा, साडेआठ.
खाऊन जाणारेस काही की डबा देऊ?
डबा दे, दोसा चालेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी सातला उठून सोनल पटापट तयार झाली. काॅलेज जवळच
होतं. आठला पाच मिनिटं होती, ती चहा पीत असताना मित्राचा फोन आला, अगं कुठे
आहेस?
घरी. येतेच आहे.
घरी. येतेच आहे.
अगं, पण तू पेपरला का नाही आलीस?
अरे, येतेय आता, साडेआठचा ना पेपर?
अगं, आज सव्वासातचा होता, मी तुला काल म्हटलंही होतं, उद्या अगदी पहिला पेपर आहे आपला.
ओह शिट.
चहा टाकून सोनल काॅलेजला पळाली. काॅलेजला पोहोचल्यावर खरंच आपला पेपर हुकलाय, हे तिला कळलं आणि तिने घरी फोन केला. मुसमुसत म्हणाली, आई, पेपर गेला माझा, आता केटी लागणार.
आधी शांत हो. साडेआठचा पेपर नीट दे. मग एखाद्या शिक्षकांना जाऊन भेट आणि विचार काय करायचं ते. आता आधी शांत होऊन आहे तो पेपर लिही.
घरी आई बाबाला म्हणाली, म्हणजे आता मला पूर्वीसारखं परीक्षेचं वेळापत्रक कॅलेंडरवर लिहून ठेवायला हवं, अशी गडबड होता कामा नये. मी पाहिलंच नव्हतं वेळापत्रक, फक्त किती वाजता आणि कोणता पेपर आहे, ते विचारलं होतं.
ती आता १८ वर्षांची आहे, इतक्या छोट्या जबाबदाऱ्या ती सांभाळू शकते. ती चुकलीय, हे आपण मान्य करायचं आणि तिच्या पाठीशी उभं राहायचं. जे काही होईल ते स्वीकारायचं. इतकं काही आकाश कोसळत नाहीये. यातूनच ती शिकेल ना?
अरे पण, एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळी असं झालं तर?
ते तू पाहूनही होऊ शकतंच. कितीही काळजी घेतली तरी ऐन वेळी काही गडबड होऊ शकतेच की. तिला हे कळणं जास्त आवश्यक आहे. जगात सगळ्या गोष्टींना पर्याय असतोच, आपण त्यांचीही जाण ठेवूनच प्रतिक्रिया द्यायला हवी.
तुम्ही काेणाची बाजू घ्याल? आईची की बाबाची? आणि सोनलशी कसं बोलाल या विषयावर?
Comments
Post a Comment