रंगांचा उधळुनिया पंखा

रंगपंचमीच्या निमित्ताने २ मार्च २०१२ रोजी लिहिलेला लेख.
अगदी लहान बाळाने (खरं तर, बाळाला) गुलाबी कपडे घातलेले असले की ती मुलगी आणि निळे कपडे असतील तर तो मुलगा, असं समजायचं असतं, ही माहिती आपल्याला दिली पाश्चिमात्यांनी. नाही तर आपली बाळं पांढरी मलमलची झबली घालायची इतकी वर्षं. हां, टोपडी किंवा कुंची मात्र मस्त रंगीत असायची. अजूनही गावाकडे गेलं की लहान बाळांच्या झालरी लावलेल्या कुंच्या किती मस्त दिसतात नं. तसंच निरनिराळ्या रंगांच्या कापडांचे तुकडे लावून कलात्मकरीत्या शिवलेली दुपटी. या रंगांची लहानपणापासूनच आपल्याला सवय होते. मग ‘कावळा कसा असतो? काळा. पोपट कसा? हिरवा. मोर कसा? निळा. ससा कसा? पांढरा,’ अशी रंगांची ओळख करून दिली जाते. बाळ थोडं मोठं होऊ लागलं की त्याला अमुक रंग खूप आवडतो, असं आईच्या लक्षात येतं.
थोडं मोठं झालं की मुलं एक खेळ खेळतात. आपणही तो खेळायचो, आठवतंय? ‘पिंकी पिंकी व्हिच कलर?’ असं मुलं ओरडून विचारायची. (माझ्या आठवणीत तरी कलर कलर असंच म्हणायचो, रंग रंग नाही. का बरे?) मग ज्याच्यावर राज्य असेल ती एका रंगाचं नाव घ्यायची. मग त्या रंगाच्या कोणत्याही वस्तूला हात लावायला मुलं पळायची. जिला त्या रंगाची कोणतीच वस्तू सापडायची नाही, ती आउट.
रंगांचा आपल्या अनेक सणांशी अगदी निकटचा संबंध आहे. म्हणजे एरवी अगदी प्रवेशबंदी असलेला काळाही संक्रांतीला नवविवाहितेच्या आणि लहान बाळांच्या अंगावर मानाने मिरवतो; पण या काळ्या साडीवर वा झबल्यावर पांढरी खडी हवीच. संक्रांतीनंतर लगेच येतो प्रजासत्ताक दिन. या दिवशी पांढरा, हिरवा, भगवा या रंगांची चलती असते. पांढ-या सलवार- कुडत्यावर हिरवी आणि भगवी किंवा लाल ओढणी हा जणू या दिवसाचा गणवेशच. आणि स्वातंत्र्यदिनाचाही. याच सुमारास येते वसंत पंचमी, ज्या दिवशी पिवळ्या रंगाचं अतोनात महत्त्व असतं. पेहराव तर पिवळा करायचाच; पण पक्वान्नही पिवळ्या रंगाचं करायचं.
मग व्हॅलेंटाइन डे येतो, तोही तरुणांसाठी एक सणच होऊन बसलाय आताशा. या दिवसाचा राजा गुलाबी रंग. संपूर्ण बाजार या निमित्ताने गुलाबी वस्तूंनी सजलेला असतो.
त्यानंतर येते होळी. या दिवशी बहुतेक जण जुनेच कपडे घालतात, जेणेकरून रंगांनी ते माखल्यावर टाकून देता येतात. पण काही हौशी कलाकार मात्र पांढरेशुभ्र कपडे घालतात, ज्यांवर रंग उधळलेले मनमोहक दिसतात. मग शीतल शिमगा येतो, उन्हाची तलखी जाणवायला लागलेली असते. अशा वेळी लहान मुलांना पांढरे कपडे घालून त्यावर केशराचे शिंतोडे उडवतात, म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही. त्याला गळ्यात साखरेच्या गाठ्या घालतात, ज्या चोखल्यावरही उन्हाचा तडाखा कमी भासतो. या वेळी आलेला उन्हाळा चांगला तीन महिने मुक्कामाला असतो. या वेळी शाळेत शास्त्राच्या पुस्तकात शिकलेली माहिती ‘उन्हाळ्यात पांढरे वा हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरावे, जेणेकरून सूर्याचे किरण परावर्तित होतात व उन्हाळा कमी जाणवतो. गडद रंगाचे कपडे सूर्यकिरण शोषून घेतात व अधिक गरम होते’ उपयोगी आणायची असते.
गुढीपाडव्याला शक्यतो लाल रंगाच्या विविध छटांच्या कापडांचीच गुढी उभारली जाते. अनेक घरांमध्ये तर भगवी गुढीही उभारतात.
नवरात्राच्या नऊ दिवसांत कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नऊ रंगांच्या साड्या नेसवल्या जातात आणि गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या तमाम महिला त्याच रंगांच्या साड्या नेसतात. त्यामुळे जुन्या साड्या कपाटातून बाहेर पडतात, असा सर्वांचाच अनुभव.
दिवाळीत सर्वत्र नवीन, चमकदार, छान कपड्यांची चलती असते, कोणता ठरावीक रंग असतो असे नाही. लगेच येणा-या नाताळात मात्र लालभडक रंगाचा प्रभाव दिसून येतो.
भारतात व इतरही अनेक देशांमध्ये विवाहाप्रसंगीच्या पेहरावाचे रंगही ठरलेले असतात. बहुतांश ख्रिस्ती वधू पांढरा वा पांढ-याच्या जवळपासच्या छटांचा ‘गाउन’ घालतात. उत्तर व मध्य भारतात लाल साडी वा लेहेंगाच लागतो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व समाजांमध्ये वधूवस्त्र हे पिवळेच असते. आणि तिची एकतरी हिरवी साडी असतेच. मुलाच्या मुंजीत, सगळ्यात शेवटी देवदर्शनाला जाताना पांढरा पेहराव करतात ब-याच कुटुंबांमध्ये. तामिळ वधू राणी रंगाची नऊवार नेसते, तर मल्याळी वधू पांढरी,
सोनेरी काठाची. बंगाली वधूही पांढरीच पण लाल काठाची साडी नेसते. अनेक घरांमध्ये मुलाच्या बारशाला त्याच्या आईने काळी साडी नेसण्याची प्रथा आहे.
शोकवस्त्र भारतात बहुतांशी पांढरे, परंतु ख्रिस्ती लोकांमध्ये काळेच असते.
आणखी सांगण्याजोगी रंगसंगती असते आपल्या जेवणात. पांढराशुभ्र भात, त्यावर पिवळेधम्मक वरण आणि त्यावर तूप आबालवृद्धांचे आवडते. तर तांदूळ, गाजर, फरसबी यांमुळे तिरंगी दिसणारा पुलाव, पिवळ्याधम्मक पोह्यांवर हिरवी कोथिंबीर आणि पांढ-या खोब-याची पखरण, गुलाबी सोलकढी, पांढरा आणि तांबडा रस्सा, हिरवा पालक नि पांढरे पनीर, या पदार्थांना त्यांच्या रंगसंगतीमुळे अधिक चव येते, हे निश्चित. अनेक भाज्या एकत्र असणारे सलाड, अनेक फळांचे फ्रूट सलाड, त्यावरचे लालचुटूक डाळिंबाचे दाणे... अहाहा! वर्णनानेच तोंडाला पाणी सुटते ना?
अशा रीतीने जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळे रंग आपली साथ देत असतात. या रंगांचे सेलिब्रेशन अनेक हिंदी-मराठी गाण्यांमधून खूप छान केलेले आहे. रंगुनि रंगात सा-या रंग माझा वेगळा, रंगभरे मौसम से, दुनिया रंगरंगीली बाबा, रंगीला रे, रंग दे चुनरिया, रंग दे मुझे रंग दे, इत्यादी अनेक गाण्यांमधून आपण ते सतत ऐकत असतो. येणा-या रंगपंचमीच्या निमित्ताने या रंगभ-या दुनियेला सलाम.

Comments