प्रेरणादायी

पुरस्कार विजेत्या सक्षमा
 यंदाचा महिला दिन फारच वेगळा आणि स्फूर्ती देणारा ठरला. औरंगाबादच्या एमजीएम संस्थेने सक्षमा पुरस्कार मी व इतर चौघींना देण्याचे ठरवले. त्या कोण ते मला माहीत नव्हते, परंतु तिन्ही प्रमुख पाहुण्यांविषयी खूप ऐकलं/वाचलेलं होतं. डाॅ. रागिणी पारेख, मुमताज शेख आणि बालिका बिटले यांना भेटायला मिळेल म्हणून मी खूष होते. त्या तिघींच्या मुलाखतींतून त्यांचा प्रवास खूप छान उलगडला. साधारण तासभर वेळ मिळाल्याने तसं तपशीलवार बोलता आलं त्यांना. त्यांच्याकडे सांगण्यासारखंच एवढं आहे की, कितीही वेळ कमीच वाटावा.

डाॅ. पारेख मुंबईत श्रीमंत जैन घरात जन्मलेल्या. काॅन्व्हेंटमध्ये शिकलेल्या. एमबीबीएसनंतर गायनॅकाॅलाॅजी घ्यायचं मनात असूनही आईने त्यात मोडता घातला. कारण काय, तर गायनॅकला गर्भपात करावा लागतो. त्यामुळे त्या नेत्रशल्यचिकित्सक झाल्या आणि डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासोबत काम करू लागल्या. सुरुवातीला दोघांमध्ये खूप खडाजंगी झाली. परंतु हळुहळू दोघं रुळले आणि त्यांची टीमच तयार झाली. बाबा आमटे यांचा या दोघांवरही मोठा प्रभाव. त्यामुळे गरीब, दूरच्या भागांमधल्या आदिवासींना मदत करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार जवळपास दर शनिवार/रविवार डाॅ. पारेख नेत्र शल्य चिकित्सा शिबिरांमध्ये तासनतास उभं राहून शस्त्रक्रिया करत असतात. 'रुग्णाला दिसायला लागलं की, माझा थकवा पळून जातो. अनेकदा ते माझ्या गालावर हात फिरवतात, माझी पापी घेतात. असं वाटतं, इतकं प्रेम त्यांनी इतर कोणालाही केलं नसेल,' असं त्या सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी बोलकं असतं.

मुमताज शेख यांच्याबद्दल वाचलं होतं, परंतु त्यांना प्रत्यक्ष ऐकणं अर्थातच अधिक आनंददायी होतं. त्यांच्यातली ऊर्जा, चैतन्य त्यांच्या बोलण्यातनं अगदी सहजपणे आपल्यापर्यंत पोचत असतात. लहान वयात लग्न, सासरचाच कशाला, माहेरचाही छळ, घटस्फोट या सगळ्यातून बाहेर पडून मुमताजने कोरोच्या फेलोशिपच्या माध्यमातून महिलांसाठी पुरेशी, मोफत स्वच्छतागृहं, अंहं तिच्या शब्दांत सांगायचं तर मुताऱ्या, हवीत यासाठी मुंबईत एक मोठी चळवळ उभी केली. एकूण ३२ संघटनांची ही Right to Pee या नावाने प्रसिद्ध असलेली चळवळ आहे. इतर संघटनांमधल्या पुरुष सहकाऱ्यांनीही सुरुवातीला याची खिल्लीच उडवली होती, पण तरीही मुमताज आणि तिच्या असंख्य सहकाऱ्यांनी ही मागणी लावून धरली. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने महिला दिनी Right to Pee च्या टीमला विशेष पुरस्कार दिला. परंतु, गेल्या वर्षात काही कोटी रुपयांची तरतूद असूनही स्वच्छतागृहांवर एक पैसाही खर्च झाला नाही, तसंच यंदाच्या म्हणजे २०१६-१७च्या अर्थसंकल्पात एकाही पैशाची तरतूद करण्यात आलेली नाही, याचा निषेध म्हणून यंदाच्या महिला दिनी या टीमने तो पुरस्कार पालिकेला परत केला आहे. औरंगाबादेतल्या कार्यक्रमाच्या वेळीही मुमताजच्या डोक्यात मुंबईत काय होतंय, याचा विचार सुरू होताच.

बालिकाचा संघर्षही लहान वयातच सुरू झालेला. माळशिरस तालुक्यातल्या लोणंद गावातील बिटले वस्तीत राहणाऱ्या बालिकाला सातवीपर्यंत गावातच शिकायला मिळालं. परंतु त्यासाठी रानातली आणि घरातली कामं पूर्ण करावी लागत. एकदा तर परीक्षेच्या वेळी तिच्या आईने पुस्तकं लपवून ठेवली आणि काम पूर्ण झाल्यावरच देण्याची अट घातली. तिचा मामा CRPF मध्ये होता, तो घरी आला असता त्याला तिची शिकायची इच्छा आणि घरातली प्रतिकूल परिस्थती लक्षात आली. दहावीला ती त्याच्या घरी राहून शिकली. दुसऱ्या गावात शाळेला पाठवायलाही आजोबांचा विरोध होता, मराठ्याची पोर अशी कशी जाणार, आपल्यात तशी पद्धत नाही वगैरे वगैरे.

पण बालिका शिकली, आता ती वाहतूक पोलिस शिपाई म्हणून पुण्यात कार्यरत आहे. तिचं पोस्टिंग बुधवार पेठेत असताना तिला शिक्षणाचं माहेरघर म्हणवलं जाणाऱ्या पुण्याची दुसरी बाजू पाहायला मिळाली. ज्या विश्रामबागवाड्यात मुलींना शाळेत येण्यासाठी अार्जवं केली जायची, त्याच्याच परिसरात देहविक्रयासाठी मुलींवर जबरदस्ती केली जाते, ते पाहून तिच्यातलं कविमन जागं झालं. मॅगझिनीतून सुटलेली गोळी या नावाचा तिचा कवितासंग्रह काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. बालिकाच्या बोलण्यात अजून सोलापुरी लहेजा आहे, अगदी अार्जवी, भिडणाऱ्या सुरात ती बोलत असते. पाठीवर रुळणारा एक शेपटा, कुडता आणि लेगी अशा साध्या वेशातली बालिका आणि तितकीच साधी मुमताज दोघींशी मैत्री करावीशी वाटली लगेच.


इतर पुरस्कार ज्यांना मिळाले त्याही महिला अर्थातच स्फूर्तीदायी होत्या. पहिल्या मंदाबाई मगर. २४ वर्षांचा मुलगा राम काही महिन्यांपूर्वी आजारी होता व कितीही पैसे खर्च केले तरी तो वाचणार नाही, अशी कल्पना डाॅक्टरांनी दिल्यानंतर मंदाबाईंच्या भावाने त्याचे अवयव दान करूया असं सुचवलं. मंदाबाईंनी त्याला मान्यता दिली आणि रामच्या या अवयवांमुळे चार व्यक्तींना जीवदान मिळालं. मेहेकर तालुक्यातल्या मंदाबाईंना राम आणि त्याची जुळी बहीण अशी दोन मुलं. मुलं ७ महिन्यांची असताना पतीचं निधन झालं. त्यानंतर या मुलांना त्यांनी मजुरी करून वाढवलं. आणि हाताशी आलेला मुलगा अचानक निघून गेला. मंदाबाई म्हणाल्या, कोणत्याच माउलीवर पोटचं मूल गमावण्याची वेळ कधी येऊ नये, पण आलीच तर अवयवदानाचा विचार तिने नक्की केला पाहिजे. त्यांना रडू न आवरणं साहजिकच होतं, पण उपस्थितांचेही डोळे पाणावलेच.

सोनाली राऊत. शेतकऱ्याची मुलगी आणि सून. शेतात राबण्याशिवाय पर्यायच नाही. तरीही तिला शिकायचं होतं. पती आणि सासूसासऱ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सोनालीने एमपीएससी पार केली. विक्रीकर निरीक्षक म्हणून तिला लवकरच पोस्टिंग मिळतंय. दोन लहान लेकरांचीही काळजी घरच्यांनी घेतली म्हणूनच मी एवढा पल्ला गाठू शकले, आता यूपीएससीची तयारी करायचीय असं ती म्हणाली.

सुनीता बनकर या एमजीएमच्याच बालवाडीतील मावशी. रडक्या पोरांना हमखास शांत करू शकणारी सुनीतामावशी. त्या इंग्रजीही शिकू लागल्यात आणि थोडा वेळ मुलांना कविता वगैरे म्हणून वर्गही सांभाळू शकतात.

प्रियांका भामरे ही पोस्टवुमन. जेमतेम २२/२३ वर्षांची असेल. तीही पुढे शिकतेय, पण सध्या ही नोकरी मिळालीय ती आनंदाने करतेय.

महिला दिनाला कोणी काही नावं ठेवोत, मला मात्र या दिवसाच्या निमित्ताने अनेक चैतन्याने सळसळणाऱ्या महिलांशी बोलता आलं, ऐकता आलं याचा आनंद वाटतो.

Comments