नि:शस्त्र चळवळ

पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. माहीमला बेडेकर सदनात माईमावशी राहायची. ग्राहक पंचायतीच्या गटाची ती सदस्य होती. तिचं घर तळमजल्यावर असल्याने अनेकदा तिच्याच घरी सामान उतरायचं. तेव्हा धान्य पोत्यातनं यायचं, तेल १५ लिटर/किलाेच्या डब्यातनं. मग प्रत्येक सदस्याचं जेवढं सामान यादीत असेल त्यानुसार ते मोठ्या तराजूवर तोलून पिशवीत भरायचं. तेलाचा डबाही तीनचार जणांमध्ये वाटून घ्यायचा. आम्ही तिच्याकडे दर सुटीत राहायला जात असू. त्यातच सामान यायचा दिवस असेल तर प्रचंड एक्सायटेड असायचो आम्ही. टेम्पो कधी येणार याची उत्सुकता सकाळपासून असायची. मग तो आला की सामान उतरवायचं, घरात आणायचं. मग पोती उघडून तराजूत तोलायचं, पिशव्यांमध्ये भरायचं असा हा काही तास चालणारा उपक्रम असायचा.

चारेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या मुलुंडच्या काॅलनीत ग्राहक संघाचा गट सुरू करायचा विचार नवीन राहायला आलेल्या जोशीआजींनी मांडला. रास्त दरात, स्वच्छ, चांगल्या प्रतीची धान्यं, डाळी, साबण, पुस्तकं, स्वयंपाकघरातील भांडी, वह्या, साॅसेस, चटण्या, लोणची, पिठं इत्यादि मिळवायची ग्राहक पंचायतीचा ग्राहक संघ ही उत्तम सोय आहे. परंतु, त्याला काही व्यक्तींनी वेळ देणं आवश्यक असतं. संघाच्या एका गटासाठी सात ते आठ किमान सदस्य लागतात. ते गोळा करणं, त्यांच्याकडून वेळेवर सामानाच्या याद्या घेणं, वेळेवर बिलाचे पैसे/चेक येतील याची काळजी घेणं, सामानाच्या पिशव्या धुऊन दिल्या जातात की नाही ते पाहणं, याद्या नि पैसे ठरावीक दिवशी ठरलेल्या ठिकाणी नेऊन देणं या सगळ्या कामांसाठी वेळ व बांधीलकी लागते. ती असेल तर आणि तरच संघाचा फायदा घेता येतो. आमच्या काॅलनीत असा गट सुरू झाला, अजूनही तो नीट सुरू आहे. पण त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींची बांधीलकी वेगवेगळी आहे, त्यामुळे किती समस्या येऊ शकतात हे लक्षात येतंय.

या पार्श्वभूमीवर मावशीच्या या कामाचं महत्त्व ठसठशीतपणे जाणवतं. तिचा मूळ स्वभाव चिकाटीचा, सहन करण्याचा, सांभाळून घेण्याचा. फोन नसताना तिने इतक्या सदस्यांना कसं बांधून ठेवलं असेल? दर महिन्यात घरी सामान आल्यानंतर होणारा पसारा, गोंधळ, केरकचरा, सामान कमीजास्त होणं, सदस्यांचे वाद तिने कसे निस्तरले असतील? आपण करतोय तीही एक चळवळ आहे, पण नि:शस्त्र, हे तिला कधी जाणवलं असेल का? एका मोठ्या समाजकार्यात तिचा तो मोठा हातभार होता हे लक्षात आलं असेल का? बहुधा नाहीच. She was a silent warrior.

आज मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्यांपैकी ज्येष्ठ नागरिक सदस्य किती आहेत, याची आकडेवारी मला ठाऊक नाही, परंतु त्यांची संख्या मोठी असणार नक्कीच. ज्येष्ठ नागरिक आहे, म्हणजे हाताशी वेळ आहे, हा समज आता अत्यंत अॅक्टिव्ह असणाऱ्या या व्यक्तींमुळे चुकीचा ठरतोय. त्यामुळे, निव्वळ या कामावर प्रेम, निष्ठा असल्याखेरीज ते झेपणारं नाही.

मावशीचा संघ बंद पडायची वेळ काही महिन्यांपूर्वी आली होती. ती अतिशय अस्वस्थ होती ते कळल्यावर. परंतु तेे तसं झालं नाही. संघ सुरू राहिला.

आता मावशी नाही. पण ग्राहक चळवळ तिच्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांमुळे सुरू राहील, राहिली पाहिजे. त्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकच असलं पाहिजे असं नाही, आपल्या व्यग्र दिनक्रमातून या चळवळीला हातभार कसा लावता येईल, याचा आपण सगळ्यांनीच विचार करूया.

Comments

  1. ग्राहक संघ केवळ सोय न राहता ती आमची जीवनशैली झाली …अगदी ऑन लाईन खरेदीतही ग्राहकची फुटपट्टी मनात असतेच. तेलाचं वाटप हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल . ग्राहकच्या मासिकात आईचे काही लेखही आले होते.

    ReplyDelete
  2. अरे वा, लेख आल्याचं नाही माहीत मला.
    ग्राहकची फूटपट्टी अर्थातच आवश्यक, सर्व ठिकाणी.

    ReplyDelete
  3. contribution, commitment and consistency are 3C which needed to continue any grahak sangha

    ReplyDelete
  4. अगदी खरं दादा, आपल्या पिढीला ते कितपत जमेल याची शंका वाटते.

    ReplyDelete

Post a Comment