लुभावना लोणार

जानेवारीच्या सुरुवातीला माझा मावसभाऊ अभिजीत लोणारला गेला होता. तिकडचे काही फोटो त्याने आम्हा भावंडांच्या व्हाॅट्सअॅप ग्रूपवर टाकले. तोपर्यंत लोणारबद्दल ऐकून सगळेच होतो पण प्रत्यक्ष गेलेलं कोणीच नव्हतं आमच्यातलं. मी तर गेल्या पाच वर्षांत िकमान १५वेळा औरंगाबादला गेले असेन, पण पुढे जालना आणि लोणारपर्यंत जाणं झालं नव्हतं. शालेय अभ्यासक्रमात भूगोल शिकताना लोणार बुलडाणा जिल्ह्यात आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे वगैरे वाचलेलं होतं. दोनेक महिन्यांपूर्वी कोणीतरी फेसबुकवर नासाच्या वेबसाइटवरचा लोणारचा फोटो टाकला होता, हिरव्या कोंदणातला निळाशार खडा असावा असं ते दिसत होतं. तो मी शेअर केला होता. त्यामुळे लोणार आमच्या ताज्या आठवणींमध्ये होतं आणि अभिजीतच्या फोटोंमुळे तिथे जाण्याच्या विचारांना चालना मिळाली. मंजिरीने शेगाव आणि लोणार असं दोन दिवसांत होण्यासारखं आहे, असं सांगितलं. मग आम्ही ११ जण तयार झालो जायला. मुंबई शेगाव आणि जालना मुंबई अशी रेल्वेची तिकिटं काढली. मंजिरीने शेगावला आम्ही सगळे मावू अशी गाडी बुक केली. लोणारचं MTDC चं रिझाॅर्टही आॅनलाइन पैसे भरून बुक केलं. ऐन वेळी आमच्यातले दोन गडी गळाले, पण दोनच गळाले यावर समाधान मानून आम्ही निघालो.

प्रवास खडतर होणार की काय अशी शंका ठाणे स्थानकात शालिमार एक्स्प्रेसची वाट पाहातानाच आली होती. बोरिवलीहून मुलीला घेऊन येणारी राजश्री १०.१५ला ठाण्याला पोचली, गाडीची वेळ होती १०.२०. प्रत्यक्ष गाडी १० मिनिटं उशिरा आली तेवढा तिला दम खायला वेळ मिळाला इतकंच. स्लीपरची तिकिटं होती, डब्यात प्रचंड गर्दी होती अर्थात. आमच्या पायाशी, दोन बाकांच्या मध्ये, दारात जिथे जागा मिळेल तिथे माणसं होती. सकाळी ७.१०ला गाडी शेगावला पोचणार होती. परंतु जळगावनंतर गाडी थांबत थांबत चालली होती. भुसावळलाच साडेसहा वगैरे झाले असतील. बराच वेळ गाडी थांबली होती. लोक हळूहळू जागे होऊ लागले होते. एका माणसाचा फोन वाजला. तो जे बोलत होता, ते कानावर पडत होतं. ते ऐकून मी आणि श्रीरंग ताडकन उठलो. मालगाडी घसरलीय, सात तास उशीर होणार, हे ते शब्द.

तेवढ्यात भुसावळ रेल्वे स्थानकात होत असलेली उद्घोषणाही ऐकू येऊ लागली. भुसावळच्या पुढे मालगाडी घसरल्याने आमची ट्रेन भुसावळ ते नागपूर वेगळ्या मार्गाने चालवली जाणार होती. अर्थात शेगाव, अकोला, बडनेरा वगैरे स्थानकं ती घेणार नव्हती.

पटापट सामान आवरून आम्ही खाली उतरलो. हवेत छान गारवा होता. जागा पकडून सामान टाकलं. मंजिरीने गाडीवाल्याला फोन लावला आणि काय झालंय ते सांगितलं. तो गाडी शेगाव स्थानकात पाठवायच्याच तयारीत होता. त्याला गाडी भुसावळला आणायला सांगितलं. जाऊनयेऊन जवळपास तीन साडेतीन हजार रुपये अधिक लागणार होते. मी आणि श्रीरंग स्थानकाच्या बाहेर आलो तर समोरच एसटी स्थानक होतं. जत्रा भरली होती जणू त्या छोट्याशा आणि असुविधाजनक स्थानकावर. आमच्या गाडीतले अनेक प्रवासी शेगावलाच जाणारे होते. ते सगळेच तिथे जमले होते. एक गाडी आम्ही विचारली, तर त्याने चार हजार सांगितलेन. त्यामुळे आम्ही परत आलो. जवळ होतं ते खाल्लं. थोडा थोडा कंटाळा आला होता सर्वांनाच. प्रवासाची सुरुवातच अशी झाली होती ना.

गाडी जवळ आल्याचा फोन आला आणि आम्ही एसटी स्थानकाजवळ जाऊन थांबलो, तिथे पार्किंगही होतं. तर ड्रायव्हरचा फोन, मी दुसऱ्या बाजूला आलोय, तिथे या. नाहीतर मला पाचसहा किमीचा फेरा पडेल. पुन्हा चंबूगबाळं आवरून आम्ही पलिकडे गेलो. भुसावळ स्थानक परिसर विस्तीर्ण आहे, त्यामुळे आम्हाला इकडून तिकडे जायलाच दहा मिनिटं लागली असतील जवळपास.

अखेर निघालो. बरोबर आणलं होतं ते खाल्लं. भेंड्या खेळलो थोडा वेळ. वाटेत अप्रतिम उसाचा रस प्याला. दोनच्या सुमारास शेगावला पोचलो. भक्त निवासात जेवून आनंद विहारमध्ये गेलो, तिथे ईमेल करून खोली ठेवली होती. अत्यंत स्वच्छ व सुंदर परिसर आहे तो. खोलीही छान होती. भरपूर पाणी होतं. आंघोळी करून मंदिरात जाऊन संध्याकाळी सातला लोणारकडे प्रस्थान ठेवलं. आमचा मूळ बेत तीनला निघून वाटेत मेहेकर पाहून दिवसाउजेडी लोणार गाठायचा होता, तो अंधार पडल्यावर आम्ही निघालाे होतो.
MTDC, Lonar
नऊच्या सुमारास एमटीडीसीला फोन करून कढी खिचडी तयार ठेवायला सांगितलं. दहाला पोचलो, सामान टाकून आधी जेवलो. गरमागरम खिचडी, चविष्ट कढी, पापड, आलूपालक व पोळ्या असं जेवून खोलीवर आलो. आम्ही डाॅर्मिटरी घेतली होती. छान होती, स्वच्छ. भरपूर पाणी होतं. सकाळी साडेसहाला निघायचं होतं, त्यामुळे तशी तयारी करून ठेवली आणि झोपलो. सकाळी साडेपाचपासून एकेक भिडू उठला, चहा आला. भरपूर खाऊ, पाणी, टोप्या, घेऊन बूट चढवले आणि निघालो.

आमच्यासोबत सुधाकर बुगदाणे येणार होते. ते लोणारचेच रहिवासी असून त्यांचा लोणार सरोवर परिसराचा अभ्यास असल्याचं हेमंत मोने यांच्याकडून मंजिरीला कळलं होतं. तिने एमटीडीसीतूनच त्यांचा नंबर शोधून त्यांना फोन करून ठेवला होता. त्यानुसार सर पावणेसातच्या सुमारास आले आणि आम्ही खाली उतरायला लागलो. वरूनच सरोवराचं दर्शन झालं होतं. अगदी समोर आणि थोडं डावीकडे दोन देवळांसारखं काही दिसत होतं. अच्छा, असं आहे हे.
पहिला थांबा

आमच्या गँगमध्ये वय वर्षं १२ (मुद्रा) ते ६० (कल्पनाताई) अशी मंडळी होती. मुद्राचा सुरुवातीलाच पाय घसरला आणि ती पाठीवर आपटली. पण फार काही झालं नाही तिला. ते पाहून ताई मात्र घाबरली आणि म्हणाली, मला नाही जमणार, तुम्ही जा, मी इथेच थांबते.  आम्ही तिला समजावलं आणि तिला घेऊनच पुढे चालू लागलो. दगडांची उतरणीची वाट ती, सोपी नव्हतीच. काहीतरी वेगळंं पाहायला मिळणारेय हे माहीत होतं म्हणून उत्सुकतेने चालत होतो. हवाही चांगली होती, अजून सूर्य वर आला नव्हता फार. सर वाटेत माहिती देतच होते. ऐकत ऐकत चालत होतो. अर्ध्या तासात एका खंडहराशी पोचलो. बऱ्यापैकी मोठं काळ्या दगडातलं देऊळ होतं, हेमाडपंथी बांधणीचं. या देवळाशी जरा टेकलो. सरांनी त्याची माहिती, सराेवराशी जोडलेल्या गोष्टी, पुराणकथा, विज्ञान सांगायला सुरुवात केली. आजूबाजूला मंदिराचा भाग असलेले दगडांचे तुकडे पडलेले होते. देऊळ तसं बऱ्या अवस्थेत होतं. ते पाहून निघतच होतो तो, समोर एका झाडावर चक्क पॅराडाइज फ्लायकॅचर हा पक्षी दिसला. आतापर्यंत केवळ फोटोतच पाहिलेला हा देखणा पक्षी दिसल्याने आम्ही सगळे जाम एक्साइट झालो. त्याचा फोटो काही काढता आला नाही. पुन्हा एकदा तो दिसला दुसऱ्या झाडावर. त्याची लांबलचक पांढरी शेपटी हेलकावे खाताना पाहून आपण किती नशीबवान असं वाटत होतं.


दहा मिनिटांनी आणखी एक भग्न देऊळ. भिंती नीट होत्या, आतलं कोसळलेलं होतं. तिथे पायरीवर सुंदर कोरीव काम आणि काहीतरी लिहिलेलं होतं. असंच कोरीव काम पुढेही अनेक ठिकाणी दिसलं. दहाएक मिनिटं चालल्यावर आणखी एक देऊळ. आता आम्ही जवळजवळ पाण्यापर्यंत पोचलो होतो. एक विचित्र सडका वास नाकात जम बसवू पाहात होता. या देवळापाशीही भग्नावशेष विखुरलेले होते. ते पाहाताना कोणी, कधी, कसं, का, बांधलं असेल हे सगळं असे विचार सगळ्यांच्याच मनात होते. जमिनीखाली ५०० फूट उतरणं आम्हाला हातात फार सामान नसताना कठीण वाटत होतं नि या अवजड शिळा इथवर आणून, त्यावर कोरीव काम करून अप्रतिम असं बांधकाम करणं कसं जमवलं असेल, हा प्रश्न अजूनही पडलेलाच आहे.

प्रश्न डोक्यात ठेवूनच तिथून निघालो. आता सूर्य वर येऊ लागला होता, आठ वाजून गेले होते. आम्ही आता पाण्याच्या अगदी जवळ आलो. समुद्राच्या किनाऱ्यावरनं चालतोय असं थोडंसं वाटत होतं. फरक एवढाच की, इथे समोरचा किनारा दिसत होता आणि पाणी संथ होतं. ब्राह्मणी बदकं, टिटव्या, मोर आणि काळताेंडी वानरं आमच्या सोबतीला होती. सरांनी सांगितल्याने त्या सडक्या वासाचा उगम कळला होता, सरोवराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन सल्फाइड वायू होता. नंतर कित्येक तास तो वास येतच राहिला. 
चालता चालता वाटेत आणखी काही भग्न देवळं दिसली. बहुतेकींमध्ये देव/देवता नव्हतीच. एका देवळात नंदी होता, पण शंकराचा पत्ता नव्हता. आता आम्ही सरोवराची अर्धी प्रदक्षिणा करून कमळजा मंदिराशी आलो. इथे काही भाविक आले होते. तिथे एक छोटासा स्टाॅल होता, जिथे बिस्किटं, पाणी उपलब्ध होतं. हे भाविक देवळाच्या जवळच्या शाॅर्टकटनं देवळात येऊन दर्शन घेऊन परत गेले होते. या देवळात नवरात्रात उत्सव असतो, असं नंतर वाचलं.

कमळजा मंदिर फार पाहण्यासारखं नाही. पण तिथे चुंबकीय क्षेत्र शक्तिशाली आहे. सरांनी साेबत होकायंत्र आणलं होतं. देवळाच्या पायऱ्यांपाशी एका विशिष्ट जागी गेल्यावर ती १५ ते २० अंश हलली. तिथे सरांनी सरोवरातलं दाेन चमचे पाणी आणायला सांगितलं. त्या डबीत त्यांनी आणलेली हळद टाकून  हलवलं तर पाणी लालभडक होऊन गेलं. पाण्याच्या अल्क प्रवृत्तीचं ते निदर्शक होतं.

मंदिराच्या शेजारी असलेल्या झाडाच्या पारावर बसून आम्ही खाऊ बाहेर काढला. चिवडा, शंकरपाळे, दुधी वडी, चकल्या. त्या स्टाॅलवाल्याला चहा देणार का विचारल्यावर तो हो म्हणाला आणि आम्ही खूष झालो. खाता खाता भाषाशास्त्राविषयी चर्चा सुरू झाली. अजिता त्या विषयात एमए करतेय, ती आम्हाला मराठीत समजावून सांगत होती. null point, आफ्रिकेतला होपी समाज, बुद्धिझम असं कायकाय निघालं चर्चेत. फारच मजा आली. सरही मन लावून एेकत होते.

खाऊन पिऊन ताजेतवाने झालेलो आम्ही पुन्हा चालायला लागलो. वाटेत आणखी काही देवळं पाहिली. परिक्रमा पूर्ण होण्याच्या आधी एके ठिकाणी वर चढायला सुरुवात केली. (लोणार सरोवराचा वरचा जमिनीलगतचा परीघ सात किमी तर खालचा, पाण्यालगतचा परीघ चारसाडेचार किमी आहे.) इथे मध्येच एक झरा लागला. तिथे एक मंदिर होतं, त्याची डागडुजी चालली होती. काही पोरं झऱ्याखाली आंघोळ करत होती. तिथे आम्ही विसावलो, पाणी प्यायलाे आणि वर चढू लागलो. इथे पायऱ्या होत्या. चढ एकदम सरळ होता, आता ऊन्हही बरंच झालं होतं. अकरा वाजले होते. टेकत टेकत वर आलो. वर धार मंदिर आहे, पाण्याचं कुंड आहे, तिथे अनेक भाविक स्नान करत होते. इथे आम्ही जमिनीवर आलो.
बाहेर गाडी बोलवली होती, लोणार गावातल्या दोन मंदिरांत जायचं होतं. गाडीजवळ अननसवाला होता, ताजा अननस खाल्ला आणि गाडीत बसून गावाकडे निघालो. पहिलं आलं मोठा मारोती मंदिर. हा मारुती झोपलेला आहे, पण अगदी जमिनीला टेकून नव्हे, २५ ते ३० अंश वर त्याचं डोकं आहे. एका पायाने तो शनिला मारतोय, दुसरा पाय शनिच्या आईने धरला आहे आणि त्या पायाला नागाचे साडेतीन वेटोळे आहेत अशी ही मूर्ती. सातआठ फूट लांबीची. काळ्या रंगाची. इथेही चुंबकीय क्षेत्र आहे, सुई गरागरा फिरत होती.

मंदिराच्या बाहेर पारावर एक म्हातारी बसली होती. आम्हाला गोष्टी सांगू लागली. या मारुतीवर शेंदराचा लेप होता. तो काढला तर २२ क्विंटल भरला. मग मंदिराच्या शेजारी भलामोठा खड्डा खणून तो पुरला आणि त्यावर गहू लावला. त्या गव्हाच्या ताज्या ओंब्या तिने आमच्या हातावर ठेवल्या. मऊ कोवळे दाणे छान लागत होते. २२ क्विंटल शेंदराचं गणित करतच आम्ही गाडीत बसलो. आता गाडी सरांच्या घराजवळ थांबली. तिथे त्यांनी आम्हाला सरोवराच्या परिसरात नासाच्या पथकासोबत काम करताना सापडलेले वैशिष्ट्यपूर्ण दगड दाखवले. एक दगड पाण्यात तरंगणारा होता. बसाल्ट जातीचा, चंद्रावर सापडलाय तसा आणखी एक दगड होता.

 तिथून चालतच आम्ही दैत्यसूदन मंदिरापाशी आलो. मंदिर डोळ्यांच्या टप्प्यात आलं तसा विश्वासच बसेना, हे एवढं अप्रतिम बांधकाम या छोट्याशा दुर्लक्षित गावात आहे म्हणून. रणरणतं ऊन्ह हाेतं तरी ओढल्यासारखे आम्ही मंदिरापाशी गेलो. डाव्या हाताला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, ते बंद होतं. तिथे एक म्हातारा सावलीला लवंडला होता. उजव्या हाताला दैत्यसूदन विष्णूचं भलंमोठं मंदिर. कोरीव कामाने भरलेलं. सात स्तरांचा पाया. सात पिढ्यांचं द्योतक. पायऱ्या चढून गेल्यावर मोकळी जागा आणि मग मंदिराचं प्रवेशद्वार. सर खाली उभं राहून माहिती देत होते. मी वर आले आणि दारात उभी राहून आत पाहू लागले तर आतमध्ये समोर माणूस उभा पाहून एक क्षण दचकलेच. धोतर नेसलेला, उपरणं खांद्यावर घेतलेला हा माणूस नाही तर तोच विष्णू आहे असं दुसऱ्याच क्षणाला लक्षात आलं पण तो एक क्षण मी चकले होते हे नक्की.

 आत गेलो. गाभाऱ्यात वर घुमटाकार जागेत अत्यंत बारीक नक्षीकाम आहे. एकेका चित्रात एकेक कथा दाखवलेली आहे. ते पाहतानाही मनात तोच प्रश्न, हे कसं केलं असेल? सर कथा सांगत होते आणि आम्ही मुग्ध होऊन ऐकत होतो.

मग बाहेर आलो आणि बाहेरचं कोरीव काम, त्यावरच्या मूर्ती, त्यातल्या कथा ऐकू/पाहू लागलो. आपल्या झळांनी पृथ्वीला इजा होऊ नये म्हणून जोडे घातलेल्या सूर्याची मूर्ती भारी आवडली. खजुराहो शैलीतल्याही काही मूर्ती आहेत. बलरामाचं शिल्प आहे एक.

सव्वा वाजला होता. आम्ही वेगळ्याच विश्वात पोचलो होतो. पण भुकेचीही जाणीव होऊ लागली हाेती, विशेषत: मुलांना. मग आवरतं घेतलं आणि गाडीत बसलो. अथर्व नावाच्या हाॅटेलमध्ये जेवून डाॅर्मिटरीत परतलो. आंघोळी केल्या, बॅगा भरल्या आणि पाचच्या सुमारास जालन्याच्या दिशेने निघालो. आता ब्रँड्सच्या नावांच्या भेंड्या खेळलो. मधुबन रेस्तराँमध्ये थोडं थोडं खाल्लं, थोडं पॅक करून घेतलं आणि रेल्वे स्थानकात आलो. साडेआठला नंदीग्राम एक्स्प्रेस होती. वेळेवर आली. प्रचंड गर्दीतून वाट काढत कसेबसे डब्यात घुसलो. तीन वेगवेगळ्या ठिकाणचे बर्थ होते. मांडवली वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता, खाली पाय ठेवायला जागा नव्हती. जेमतेम आपापल्या जागांवर पोचलो.

पहाटे साडेपाचच्या सुमारास ठाण्याला उतरलो आणि आपापल्या घरी गेलो.

लोणारमध्ये घालवलेला अर्धाच दिवस. परंतु तो इतका अविस्मरणीय होता की, खडतर प्रवासाच्या आठवणी पार खोल गेल्या.

ता.क.  आमच्यासोबत सात तास अथक उत्साहाने फिरणाऱ्या सरांचं वय आहे फक्त ७१ वर्षं.

Comments

  1. दोन दिवसांतील लहान - मोठ्या सर्व घटना तू छान टिपल्या आहेस.
    बुगदाणे सरांच्या सर्वकष माहितीमुळे आपल्या लोणार भेटीला चार चांद लागले.
    इतिहास, भूगोल, विज्ञान आणि पुराणकालीन ठोस संदर्भांमुळे ती एक शैक्षणिक सहलच झाली.

    ReplyDelete
  2. हो, इतकं काही असेल याची मला कल्पना नव्हती.

    ReplyDelete
  3. I have heard abt ur Lonar visit from Rajashree...
    But your detailing is awesome...

    Nandu

    ReplyDelete

Post a Comment