एकुशे नि नकुशा

गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन व मराठी भाषा दिन असे दोन वेगवेगळे दिवस साजरे झाले. आपल्यासाठी, म्हणजे मराठी ही मातृभाषा असणाऱ्यांसाठी, दुप्पट मजा होती. जगातील अनेक भाषा मृत्युपंथाला लागल्या आहेत, त्या जिवंत राहाव्या, वाढाव्या, यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक विभागाने, म्हणजे युनेस्कोने, १९९९मध्ये २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. २१ फेब्रुवारी का? तर पाकिस्तानची पूर्व आणि पश्चिम अशी फाळणी होण्यापूर्वी उर्दू आपल्यावर लादण्यात येतेय, अशी भावना पूर्व पाकिस्तान, म्हणजे आताच्या बांगलादेशातील, युवकांची झाली. त्यांनी १९५२मध्ये बांग्ला भाषेसाठी प्रचंड निदर्शनं केली, त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात काही विद्यार्थी मरण पावले. अर्थात याची अशी आंतरराष्ट्रीय दखल घ्यायला जवळपास ५० वर्षं गेली तरी भाषा किती महत्त्वाची असते, तेच यातून अधोरेखित होतं. बांग्ला भाषेत २१ला म्हणतात एकुशे. बांगलादेशात अनेक एकुशे पुरस्कारही दिले जातात.
आपल्याकडे मात्र मराठी नकुशा होऊ लागलीय की काय, अशी एक भीती आहे. मराठी कमी बोलली/लिहिली/वाचली जातेय, असं चित्र तरी समोर दिसतंय. चित्र एवढ्यासाठी की, खरंच मराठी भाषकांची संख्या कमी होतेय का, याची आकडेवारी आपल्यासमोर नाही. किंवा संख्या कमी होतेय ती मराठी बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची की वाचणाऱ्यांची, हा प्रश्नही उरतोच. मराठी टिकून कशी राहील, हा प्रश्नही आहेच. अधिक बोलली गेली तर, लिहिली तर, की वाचली गेली तर? आपण यातलं काय काय करतो, यातलं काही तरी करतो का? आपल्याला खरंच मराठी जगाच्या अंतापर्यंत वगैरे टिकून राहायला हवी आहे का, मग आपण ती बोलतो तरी का, लिहिणं वाचणं सोडा एक वेळ. आपली मुलं किती मराठी बोलतात, कुठल्या माध्यमाच्या शाळेत जातात, मराठी पुस्तक सोडा मराठी चित्रपट पाहतात का, वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं स्वत:जवळ तरी द्यायला हवीत. म्हणजे कोणावर भाषा टिकून राहण्यासाठी गोळी नको झेलायला.
या दोन दिवसांप्रमाणेच परवाच्या रविवारी झालाय राष्ट्रीय विज्ञान दिन. आता मराठी आणि विज्ञान असाही विचार करू शकतो. महिलांचा विज्ञानाशी संबंध कितपत आहे, हेही पाहू शकतो आजूबाजूला. मुलींना विज्ञान शिकायला प्रोत्साहन देतोय का आपण? विशुद्ध विज्ञानशाखांमध्ये किती मुली शिकतात, संशोधक बनतात, शिकल्या तरी त्याच क्षेत्रात नोकरी करतात का? उत्तरं सापडलीच तर आम्हालाही कळवा.

Comments