Railkatha 10 - a lawyer selling her books in the train

फार दिवसांनी ट्रेनमध्ये एक गंमतीशीर व्यक्ती भेटली. ५५ ते ६० दरम्यानच्या या बाई कल्याण कुर्ला लोकलमध्ये होत्या. मी मुलुंडला त्यांच्या समोर जाऊन बसले. त्या शेजारच्या मुलीला गाणं आणि पेटीच्या क्लासबद्दल माहिती देत होत्या. माझी ती अमुक आहे, ती तुला गाणं शिकवेल, तिची सून पेटी शिकवेल, वगैर वगैरे. ती मुलगी विक्रोळीला उतरली.

मग यांनी मला विचारलं, कुठे उतरणार?

आता हा काही सीट क्लेमचा प्रश्न नव्हता, म्हणून प्रश्नांकित चेहऱ्यानं मी सांगितलं विद्याविहार.

ही लोकल नवीनच आहे ना, कुर्ल्याला कोणत्या प्लॅटफाॅर्मवर जाते माहीत नाही, म्हणून विचारतेय.
म्हटलं मला माहीत नाही पण दोनवर जात असावी.
नाही, मला दादरला जायचंय ना पुढे...
मग मला त्यांनी विचारलं, पुस्तकं पाहायला आवडतील का?
नाही म्हणवेना मला.
त्यांनी त्यांच्या फाटक्या कापडी पिशवीतून चारपाच पुस्तकं हातात दिली. कायद्यावरची होती. त्या वकील होत्या आणि ती त्यांनीच लिहिलेली होती. सत्य घटनांवर आधारित दोन कादंबऱ्या आणि विवाहविषयक कायद्यांसंबंधी दोन पुस्तकं होती. मी चाळून त्यांना परत केली.
माझीच आहेत ती, मी दुकानापेक्षा कमी किमतीत देते.
हं.
तुम्ही काय करता?
पत्रकार आहे
कुठे नोकरी करता?
दिव्य मराठी
अं?
दिव्य मराठी
किती वर्षं झाली?
पाच
अमुक अमुकला ओळखता का?
नाही
ती लोकसत्ता, सकाळमध्ये नेहमी लिहायची, म्हणजे बरीच वर्षं झाली, तुमच्या आधी असेल. माझी मुलगी.
मी २४ वर्षं नोकरी करतेय या क्षेत्रात
ओह, कुठे?
म.टा., टाइम्स वगैरे...
अमुकला ओळखता का? त्यांनीच सकाळमध्ये माझं सदर प्रकाशित केलं होतं.
हो, ओळखते.
बरं, माझी मुलगी खूप लिहित असते. पण तिने नोकरी केली नाही कध्धी. फ्रीलान्स फक्त...
विद्याविहार येईस्तो हे पुराण सुरू राहिलं.
माझ्या मागनं त्याही उतरल्या तिथेच. मग आम्ही मागून आलेल्या सीएसटी लोकलमध्ये चढलो. मी दारापाशी उभी राहिले, त्या आत गेल्या.
कुर्ल्याला त्यांना बसायला मिळालं. शेजारची बाई पुस्तक वाचत होती म्हणताच यांनी पुन्हा पुस्तकं काढली बाहेर, तिला दिली.
पाच मिनिटांनी बघते तर शंभराच्या नोटेच्या बदल्यात एक पुस्तक विकलं गेलं होतं.
मला समहाउ फार केविलवाणं वाटलं ते सगळं.

Comments