विनोद फाॅरवर्ड करताना...

विश्वचषक टी २० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विंडीजकडून भारत हरला, आणि वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना होणार हे निश्चित झालं. आणि व्हाॅट्सअॅप/ट्विटर/फेसबुकवर याविषयीच्या विनोद/मीमचा रतीब सुरू झाला. अनेक विनोद तुम्हीही वाचले असाल, हसलाही असाल. पण त्या विनोदांचा पाया काय होता, तो निखळ मनोरंजनात्मक होता की, रेसिस्ट, सेक्सिस्ट, पुरुषी विचारसरणीतुन आला होता, असा विचार केलाय का?
उदा. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास विंडीजकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर एक विनोद आला. "तरी सांगत होतो डेनाइट मॅच ठेवू नका, रात्रीचे दिसत नाहीत ते लोक.' किंवा "सेमीफायनल दिवसा घेण्याची मागणी, वेस्ट इंडीजचे खेळाडू रात्री दिसत नसल्याची तक्रार.' प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या रंगामुळे भारत हरला, इतकी वर्णद्वेषी पातळी या विनोदाने गाठली. आणि शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी याच वर्णद्वेषाविरुद्ध लढा दिला होता, ज्याचे आपण इतिहासात अजूनही गोडवे गातो.
विंडीज वि. इंग्लंड असा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनोद फिरू लागला, "ही काय फायनल असणार आहे. एका टीममध्ये सगळे गोरे आणि एका टीममध्ये सगळे काळे. क्रिकेट आहे का बुद्धिबळ?' पुन्हा खेळाडूंच्या वर्णाचा उल्लेख.
स्पर्धा सुरू झाली, विराट कोहली उत्तम खेळू लागला तेव्हाच त्याची नुकतीच ब्रेकअप झालेली मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या नावावरून आलेल्या विनोदांनी तर अतिशय खालची पातळी गाठली होती. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा हा एक ऐकला. "धोनीचा आॅस्ट्रेलियाला इशारा : हमारे पास भडका हुुआ आशिक है.' किंवा "एलआयसीचा ब्रँड अॅम्बॅसॅडर विराट. टॅगलाइन असेल, अनुष्का के साथ भी, अनुष्का के बाद भी.' बाकी अनेक विनोद असे होते जे अश्लीलतेकडे झुकणारे तर होतेच, परंतु एका स्त्रीबद्दल आपण काय बाेलतोय, याचा संपूर्ण ताळतंत्र सोडून केलेले होते. पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेतून ते तयार झालेले होते, अनुष्कावर वैयक्तिक व कमरेखालची टीका करणारे होते. विराटने स्वत:च असे विनोद करणाऱ्यांना ट्विटरवरून जबरदस्त टोला हाणला म्हणून बरं.
वेस्ट इंडीजच्या महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. त्यांच्या सामन्यानंतर पुरुषांचा सामना झाला. आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या under 19 संघाने विश्वचषक जिंकला होता. तर विनोद काय फिरू लागला? वेस्ट इंडीजने बायकापोरांसह विश्वचषक जिंकला. पुरुषांना असं वाटलं की, आता आपण जिंकायलाच हवं नाहीतर बायका आपल्याला धुणीभांडी करायला लावतील. याचा काय अर्थ होतो? क्रिकेट हा खेळ आहे, कोट्यवधी रसिकांना आनंद देणारा खेळ आहे. असे विनोद करून या आनंदात भेसळ झाल्यासारखी नाही वाटत का रसिकांना?
बायकांना तुच्छ लेखणं, त्यांच्यावर शारीरिक/लैंगिक विनोद करण्याने आपल्या पाैरुषत्वात भर पडते, असं अजूनही मोठ्या पुरुषवर्गाला वाटतंय, याचा हा पुरावा समजावा काय? वर्ण, लिंग, जात, यावरून विनोद करणं सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेपणाचं लक्षण आहे, आणि ते अजूनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर दिसतंय, नुसतं दिसत नाहीये, तर मिरवलं जातंय.
कोणताही विचार न करता, फाॅरवर्ड केल्या जाणाऱ्या विनोदांवरून हेच सिद्ध होतंय.

Comments