संघर्ष

"अानंदी' प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूला आठवडा होतोय. तिचे आप्त, नातलग, मित्रमैत्रिणी यांच्या दु:खात तिचे प्रेक्षकही सहभागी आहेत. बालिका वधू या मालिकेमधून तिने आनंदीची सकारात्मक, प्रगतिशील व्यक्तिरेखा साकारली होती. ती नावाप्रमाणेच आनंदी होती व इतरांनाही आनंद देत असे. मात्र त्या मालिकेनंतर तिला तितक्या महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या नाहीत आणि तिला नैराश्याने ग्रासले असावे, असा अंदाज आहे. फसलेलं प्रेमप्रकरण, वा त्यातली फसवणूक हाही एक पैलू या दुर्घटनेला असू शकतो. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बाॅलिवूड, टीव्हीवरील कलाकारांची जीवनशैली, त्यांची अस्थिरता, यश न पचवता येणं वगैरे अनेक बाबींवर सगळीकडे चर्चा झाली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मुली जास्त असतात, त्यातही लहान गावांमधून आलेल्या अधिक, असेही बोलले गेले. यात अाणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो. भारतात बहुतांश घरांमध्ये मुलींवर प्रचंड बंधनं असतात. त्यांचे साधेसाधे निर्णयही घरातले पुरुष घेत असतात. अशा घरामधून बाहेर पडून अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठताना या मुलींनी किती नकारांना तोंड दिलं असेल, किती संघर्ष केला असेल, घरच्यांचं मन वळवण्याचा किती प्रयत्न केला असेल याची आपण कल्पनाच करू शकतो कदाचित. या प्रयत्नांना यश नाही आलं तर अनेक जणी पळूनही मुंबईत येतात. ज्यांच्या नशिबी होकार असतो, त्यांनाही ठाऊक असतं की, या होकारामागे अनेक अटी व शर्ती चिकटलेल्या आहेत. झळझळीत यश नाही मिळालं, तर आपल्या निर्णयावर टीकाच होणार आहे, याची जाणीव या मुलींना असतेच सतत. त्यामुळे अपयश पदरी आलं तर त्याची झळही अधिक तीव्रतेने पोचते या मुलींपर्यंत. इतके वाद घालून, भांडून आपण इथवर आलोय, पण पुढे काय, हा अंधारा बोगदा संपणार की नाही, अशी भीती त्यांना जरा जास्तच वाटत असते. याउप्पर, वरची सर्व कारणं आहेतच.
आपल्या मुलींशी आपण कसं वागतोय, त्यांचाही झगडा आपल्यामुळे अधिक तीव्र, अधिक झोंबणारा, अधिक ताण देणारा होतोय की, बाहेरच्या संघर्षात आपला भक्कम पाठिंबा त्यांना असल्याने त्या अधिक समर्थपणे त्या लढाया लढू शकतायत, याचा विचार आपण प्रत्येकानेच करायला हवाय. हो ना?

Comments