आई. भारतातली एक अघोषित देवता. तिने काय करायला हवं, कसं वागायला हवं,
याचे खूप जाचक नियम आहेत. घर, मुलं, नवरा यांच्या पलिकडे तिचं विश्व नसेल
तर सगळ्यात चांगलं. असलंच तर तिने ते शक्य तेवढं लहान, दूर अंतरावर ठेवावं,
ही अपेक्षा. याची दुसरी बाजू अशी दिसते की, जी स्त्री आई आहे, तीदेखील
स्वत:भोवती असं एक वर्तुळ आखून अवघडून का होईना त्यातच बसलेली असते. ती
आईच्या भूमिकेतून कधीच बाहेर पडत नाही, मुला/लीने पन्नाशी गाठलेली असली
तरी. तुझं कसं चुकतंय, कसं वागायला हवं, हे कर, ते करू नको, वगैरे ती
सांगायचं थांबतच नाही. आपल्या मुलांना लहानपणी पुरवलेलं संरक्षक कवच मुलं
मोठी झाली तरी आवश्यकच आहे, असंच तिला वाटत राहातं. मुलामुलींच्या संसारात,
वैयक्तिक जीवनात ती लुडबुड करतच राहते. मूल मोठं झालंय, असं तिला वाटत
नसलं तरी ते वाढायचं थांबलेलं नसतं. त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं, हे ती
बेदखल करून टाकते जणू.
आणि हीच आई कायम कुढत राहते की, मला माझ्यासाठी वेळच मिळत नाही. मला काही करायचं स्वातंत्र्यच नाही. कुठे जायचं म्हटलं तरी घरचं सगळं पाहूनच जाता येतं. मला माझी हौसमौज करताच येत नाही, वगैरे वगैरे...
स्वातंत्र्य मागायचं नसतं, मिळवायचं असतं, हे वाक्य शाळेतल्या फळ्याची शोभा वाढवण्यासाठी नाहीये. मुलांच्या प्रत्येक गोष्टीला फक्त मी जबाबदार नाही, असा विश्वास तिने स्वत: कमवावा लागताे. मुलांच्या हातून चुका होतात, ती पडतात, चिडतात, रडतात, ते साहजिक आहे, नाॅर्मल आहे, हे तिला मनापासून पटायला हवं. घर एक दिवस धुऊन पुसून लख्ख नाही केलं तरी चालतं, एखाद्या दिवशी जेवणात फक्त खिचडी, दही, लोणचं वाढलं तर कोणी उपाशी राहात नाही, एक दिवस सकाळी उशिरा जाग आली तर त्यात अपराधी वाटायची गरज नाही, घरातल्या वस्तूंची जागा बदलली तरी त्या सापडू शकतात, आमटीच्या नेहमीच्या पातेल्यात भाजी केली तर भाजीची चव बिघडत नाही, एखादा दिवस नवऱ्याला डबा नाही देता आला तर तो बाहेर जेवू शकतो, असं वाटून घ्यायचं स्वातंत्र्य तिचं तिने घ्यायचं आहे. ते तिला कोणीही देणार नाहीये.
परवा झालेल्या मदर्स डेच्या निमित्ताने हे इतकंच.
Comments
Post a Comment