नैतिकतेची लक्ष्मणरेषा !

(२० मे २०१२ रोजी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीतला लेख.)

संस्कृती, नैतिकता, नीतिमत्ता, नीतिमूल्ये हे सध्या परवलीचे शब्द झाले आहेत. भारतीय संस्कृतीवर आक्रमण होत आहे, मूल्यांचा -हास होत आहे, पाश्चिमात्य संस्कृती वाढत चालली आहे, याविषयी सतत ऐकायला/वाचायला मिळत आहे. संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे, हे ठरवणा-या असतात कुणी संघटना. आणि हा जो काही -हास वगैरे होत आहे, तो महिलांमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या पेहरावामुळे, त्यांच्या ताठ मानेने जगण्यामुळे. जो उठतो तो महिलांनी साड्याच नेसाव्यात, परपुरुषांशी बोलू नये, नोकरी करत असाल तर वेळेत घरी यावे, या टाइपचे काहीतरी सुनावत असतो. त्यासाठी पुराणातले वा त्याहीपूर्वीचे दाखले देण्याची हल्ली जणू फॅशनच आली आहे. काही दिवसांपूर्वी घटस्फोटाच्या खटल्यावर निकाल देताना एका न्यायाधीश महोदयांनी अर्जदार महिलेला सीतेसारखे पतीच्या पाठोपाठ पोर्ट ब्लेअरला जाण्याचा सल्ला दिल्याचे वाचनात आले. त्याच सुमारास उत्तर प्रदेशातील सहारणपूरच्या एका अत्यंत वरिष्ठ पोलिस अधिका-याने कॅमे-यासमोर म्हटले की माझ्या बहिणीचे अपहरण झाले असते तर मी एक तर आत्महत्या केली असती किंवा तिला ठार मारून टाकले असते. बायका अमुक एक प्रकारचे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतो, असे तर जगभरातल्या अनेक पुरुषांचे ठाम मत असते. म्हणजे तिला पुत्राऐवजी कन्याप्राप्ती नव-याकडून आलेल्या गुणसूत्रांमुळे झालेली असली तरी आणि तिच्यावर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला असला तरी, दोष तिचाच असतो. तिची छेडछाड/बलात्कार झाला तर घराण्याची इज्जत लगेच धुळीला मिळते, इकडे पुत्ररत्नांनी किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी कितीही दिवे लावले तरीही.
पुराणातील वानगी देताना कोणी बायकांना उद्देशून हे म्हणत नाही की द्रौपदीसारखी सक्षम होऊन पाच पतींचा सांभाळ कर; पण प्रत्यक्षात मुलींचा जन्मदर घटण्याच्या परिस्थितीत घरातल्या सुनेचा उपभोग एकापेक्षा अधिक पुरुषांनी घेतला जाण्याची उदाहरणे कमी नाहीत. एक मात्र मानावेच लागेल, बाईने सीतेसारखे वागावे असे सांगणा-या आपल्या समाजातील अनेक पती, रामाने गर्भारशी असलेल्या सीतेला जसे परिटाच्या संशयावरून घराबाहेर काढले, तसे पत्नीला हाकलून देतात. म्हणजे आजचा पुरुष रामासारखा वागतोय म्हणून बाईने सीतेसारखे वागावे, असे हे ‘लॉजिक’ आहे की काय?

स्त्रीमुक्ती संघटनेच्या संस्थापक सदस्य शारदा साठे म्हणतात, ‘पुरुष वागत असेलही रामासारखा, बाईवर म्हणून तसे वागण्याची जबरदस्ती का असावी? आणि आजची सक्षम महिला सीतेसारखी वागतेच आहे. नव-याने हाकलून दिले तरी काबाडकष्ट करीत पोटच्या पोरांचा सांभाळ करतेच आहे, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अतिशय उत्तम रीतीने पार पाडतेच आहे. सीतेने नाही का आश्रमात राहून लव आणि कुश यांना मोठे केले?’

रेल्वेत तिकीट तपासनीसाचे काम करणा-या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला द्यायला पुरेसे पैसे नाहीत कारण माझ्या लिव्ह इन जोडीदाराला मला पैसे द्यावे लागतात, असे एका प्रकरणी न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायाधीशाने म्हटले की, तुझे काम आहे तिकिटे तपासण्याचे, लिव्ह इन जोडीदार ठेवण्याचे नव्हे.
कोणी त्याचे/तिचे काम करतो की नाही, कसे करतो, इतर काय करतो हे त्या/तिला शिकवणे हे न्यायालयाचे काम खचीतच नाही. न्यायालयाचे काम आहे निवाडा देणे, कायदा काय सांगतो ते स्पष्ट करणे. कोणी कसे वागावे, याबद्दलचे धडे जनतेला देण्यासाठी न्यायाधीशाची नियुक्ती होत नाही, हेही खरे. अर्थात, या एका वाक्यावरून न्यायाधीशांवर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही, कारण लाखो शब्दांच्या निकालातून दहा शब्द निवडून त्यांवर प्रतिक्रिया देणे चुकीचेच आहे; परंतु हे दहा शब्दच जनतेच्या समोर येतात. तिला त्यातून हाच संदेश जातो की, न्यायाधीशालाही असे वाटते की तमाम बायांनी सीतेसारखे वागावे. मग आपल्याकडच्या रामायण, महाभारत, पुराणकथांमधून आजच्या जीवनाची मूल्ये शोधणा-या जनतेने प्रत्यक्षात तसे वागणे सर्रास सुरू केले तर?

सीता वनवासात गेली खरी; पण तिला न जाण्याचे स्वातंत्र्य होते का, याचा आपण विचार करायला पाहिजे, असे मत मावा या संघटनेचे प्रमुख हरीश सदानी यांनी व्यक्त केले. ‘तिला जर न जाण्याचा पर्याय असता, तरीसुद्धा ती रामापाठोपाठ वनवासात गेली असती का? आणि जर या घटस्फोटाच्या प्रकरणातील पत्नीची बदली झाली असती, तर न्यायाधीशांनी त्या पतीलाही असाच सल्ला दिला असता का?’ द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे महाभारत घडले असे म्हणून आजही समाज तिलाच जबाबदार धरतो, पण ते कोणी केले व का, याचा आपण विचार करत नाही, अशी पुष्टीही सदानी यांनी जोडली.

अ‍ॅडव्होकेट अस्मिता धुळप यांनी या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांना काहीसे जबाबदार ठरवले. ‘न्यायाधीश एखाद्या प्रकरणाचा निवाडा करताना खूप मोठे व विस्तृत जजमेंट देतात; पण वर्तमानपत्रं किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यातलं एखादंच वाक्य ठळकपणे दाखवलं जातं. सीतेविषयीचं वाक्य संदर्भाविना पाहिलं तर अर्थातच चुकीचं आहे; परंतु न्यायाधीशांनी तसं का आणि कोणत्या संदर्भाने म्हटलं आहे, ते पाहणं आवश्यक आहे. आणि घटस्फोटाचं तर प्रत्येक प्रकरण इतकं वेगळं असतं की सगळी प्रकरणं एकाच तराजूत तोलणं वा त्यावरून एखादा समान धागा शोधणं अयोग्य आहे,’ असे त्यांचे मत आहे. अनेक संघटना आजकाल असे ‘मॉरल पोलिस’ झालेल्या दिसतात. त्यात सर्वच धर्मांच्या मूलतत्त्ववादी संघटनांचा समावेश आहे. बुरख्यावरील सक्ती उठवण्यास विरोध असो वा महाविद्यालयात सलवार कमीझ घालण्याची सक्ती, या मॉरल पोलिसांचा थेट रोष असतो तो महिलांवर. जणू नीतिमत्तेचे पालन आणि तिचे संवर्धन ही एकट्या महिलांचीच जबाबदारी आहे. पण, जगाला नीतिमत्ता शिकवण्याचा अधिकार यांना कोणी दिला, हा प्रश्न उरतोच. कोणाला इजा पोचवू नये, कोणाला वाईट वाटेल असे वागू नये, खरे बोलावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, स्वच्छता ठेवावी, वगैरे नीतिमूल्यांबाबत वाद असण्याची गरजच नाही. परंतु कसे कपडे घालावे, कुंकू/बांगड्या/मंगळसूत्र हा जामानिमा करावा की नाही, किती वाजेपर्यंत घरी यावे, मित्रमैत्रिणींसोबत कशा गप्पा माराव्यात ही नीतिमूल्ये कशी होऊ शकतात? हा सर्व वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे आणि असला पाहिजे. परंतु हीच गफलत आपण नेहमी करत आलो आहोत. एखाद्या राजकारण्याने वा अभिनेत्याने कोणाशी लग्न करावे, कोणाशी संबंध ठेवावे याचा त्याच्या/तिच्या कामाशी खरे तर काहीच संबंध नाही. परंतु, अगदी हल्ली आमिर खानने ‘सत्यमेव जयते’मधून अत्यंत ज्वलंत अशा सामाजिक विषयांना हात घातल्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला व मुलांना कसे वा-यावर सोडले आहे, त्याला असा कार्यक्रम करण्याचा काय अधिकार, अशी चर्चा रंगू लागली आहे. जरी आमिरने त्याच्या पत्नीवर अन्याय केला आहे असे गृहीत धरले तरी त्याने जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांकडे आपण कानाडोळा करू शकत नाही. विवाहसंबंध हा इतका गहन नि गुंतागुंतीचा विषय आहे की त्यावरून कोणीच कोणाला नावे ठेवणे योग्य नाही. एरवी, कथित सोळा सहस्र नारींशी लग्न करणा-या श्रीकृष्णाचा आदर्श आपण कसा ठेवू शकतो? कृष्णभक्त म्हणतात की तुम्ही त्याच्या आयुष्यातले एवढेच का पाहता, त्याने सांगितलेल्या गीतेकडे पाहा. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला अनेक पैलू असतात आणि त्यातले सर्वच कौतुकास्पद नसले तरी जे चांगले ते घ्यावे, हे एका विशिष्ट परिस्थितीत आपण मान्य करतोच. म्हणूनच असे नैतिकतेचे धडे देताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की लक्ष्मणाने बजावूनही सीतेने लक्ष्मणरेखा ओलांडलीच होती. माननीय न्यायाधीशांना सीतेचा दाखला देताना अर्थातच ही सीता डोळ्यांसमोर नसावी.

Comments